गुरुपौर्णिमा अर्थात 'व्यासपौर्णिमा'

 गुरुपौर्णिमा अर्थात 'व्यासपौर्णिमा'

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 28/7/2026 :

उद्या गुरुपौर्णिमा. त्या निमित्ताने आजचा पोस्टप्रपंच. गुरुपर्णिमा म्हणजे गुरूंच्या प्रती सदैव मनात असलेली आदराची भावना प्रकट करण्याचा दिवस.     

   गुरू कोणाला म्हणावे? , माझ्या मते वय, लिंग, जात धर्म, पंथ ह्याचा विचारही न करता आपल्याला सन्मार्गाची योग्य वाट दाखविणाऱ्या व्यक्ती म्हणजे आपले गुरू.  अगदीं अक्षर ओळख होताना लिखाणाचा श्रीगणेशा गिरवायला शिकविण्यापासून ते आजपर्यंत वयाने लहान असूनही आधुनिक तंत्रज्ञान मला शिकविणाऱ्या माझ्या समस्त गुरूंना प्रणाम      

    आध्यात्मिक उन्नती कशी करावी हे शिकविणाऱ्या महान व्यक्तीपासून ते कुठलेही स्तोम, अवडंबर न माजवता विज्ञानाची कास धरून प्रगती करायला शिकविणाऱ्या माझ्या समस्त गुरूंना नमस्कार.     

  विदर्भात गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रामीण भागात आखाडी हा सण साजरा करतात.  आखाडीला माहेरवाशिणी साठी आणि गुरूंना नैवेद्य म्हणून हमखास पुरणपोळीचा बेत असतो. ह्या दिवशी देवघर फुलांनी सजलेलं, गुरूंच्या फोटोला सुंगांधित फुलांचे हार, पुरणपोळी आणि नैवेद्याच्या पदार्थांचा घमघमाट, घरचे सगळे जण एकोप्याने कामात गुंतलेले हे दृश्य घरातील प्रसन्नता वाढवितात.   

       सर्वप्रथम आपल्याला अडचणींच्या वेळी न मागताही धाऊन येणाऱ्या त्या परमेश्वराचे शतशः आभार. प्रत्येक वेळी धाऊन स्वतः न येता त्यासाठी पूर्वसंचिता प्रमाणे आपल्या जीवनात गुरूंचे स्थान निर्माण करुन ह्या वेळोवेळी मदतीला धाऊन येणाऱ्या, जीवनात कायम सकारात्मक राहून सदैव आनंद शोधून, मानून नित्य समाधानी राहण्यास शिकविणाऱ्या गुरूंना प्रणाम. प्रत्यक्ष आज प्रकर्षाने मला माझ्या शालेय जीवनात, महाविद्यालयीन जीवनात, प्रत्यक्ष आयुष्य जगताना कामात येणारे ज्ञान देणाऱ्या व्यक्ती, तसेच अगदीं जन्मापासून प्रत्येक बारीकसारीक गोष्ट शिकविणारी माझी आई, बँकिंग चे ज्ञान देऊन मला माझ्या पायावर उभे राहण्यास मदत करणाऱ्या माझ्या बँकिंग गुरूंना पण माझे गुरुपौर्णिमेच्या निमित्याने विनम्र अभिवादन.  

           ह्या सगळ्या गुरूबरोबर अजून एक अतिमहत्वाच्या गुरूंना विसरून चालणार नाही . हा गुरू म्हणजे स्वतः, आणि आजवर आलेले आपले स्वतःचे अनुभव. हे अनुभव पण आपल्याला भविष्यासाठी खूप साऱ्या शिकवणीची तरतूद करुन ठेवतात. म्हणून स्वतः आपण देखील आपले गुरूच असतो.

  आषाढ ,श्रावण हे मराठी महिने बहुतेकांचे आवडते महिने. नुकत्याचं शाळा सुरू होतात, घरी एकटी पडणारी मुलं आता समवयस्क मुलांमध्ये रममाण होतात, नवी पुस्तकं, नवा अभ्यास ह्यातं खरोखरच गुंगून जातात, हे महिने शेतकऱ्यांचे पण आवडते, सध्या त्यांच्याकडे कामांची लगबग असते, त्यांना घडीची फुरसत नसते, मस्त हिरवगार नुकतीच उगवण झालेले पीक त्यांना दिवसाढवळ्या शेतात बसून उघड्या डोळ्यांनी स्वप्नं, उद्याची आशा दाखवीत असतात. आता सुरू होणाऱ्या सणासुदीं च्या दिवसांमुळे गृहीणींना तर घडीभराची फुरसत नसते, रोजची दैनंदिन कामं आणि येणाऱ्या सणांची तयारी ह्यात तिला दिवसही कमी पडतो.   

 ह्या महिन्यांच्या सुरवासुरवातीला येणारा प्रमुख सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. ह्या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे . महाभारतातील महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. त्यांनी  वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ,ज्यामध्ये  धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. महान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा नावाची कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास. पुढे सत्यवती मग  हस्तिनापूरची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले. ऋषि पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते

         गुरुपौर्णिमेचा महिमा बौद्ध धर्मात सुद्धा सांगितला आहे. बोधी प्राप्ती नंतर बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेश सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना दिला. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षु म्हणून ओळखले जाते. आषाढ़ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षुंना पहिला धर्मोपदेश दिला ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस,म्यानमार आणि वेगवेगळ्या देशामंध्ये साजरी केली जाते   

         व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणा-या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते. आपले समस्त शिक्षक, आध्यात्मिक गुरू , कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. 

      आजच्या गुरुपौर्णिमेचेच्या निमित्ताने माझे पहिले गुरु माझे आईबाबा, नंतर बालवाडी पासून ते महाविद्यालयापर्यंत माझी वैचारिक जडणघडण करणारे माझे शिक्षकवृंद, मला समज देणारे आध्यात्मिक गुरु ह्यांना मनोमन वंदन. बरेच वेळा कटू अनुभव पण आपल्याला खूप काही शिकवून जातात जणू ते पण आपल्या भावी आयुष्यात खूप समज देतात, अनुभव देतात. आणि हे कायम स्मरणात राहणारे अनुभव पण आपले एकप्रकारे गुरुच असतात बरं.

       गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा ,

                गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।

कल्याणी बापट (केळकर) 

बडनेरा, अमरावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या