🔵 नंदन नीलेकणी आणि इस्रोचे माजी अध्यक्ष सोमनाथ बदलणार देशाची परीक्षा पद्धत, उच्चस्तरीय 'टास्क फोर्स' स्थापन!

 🔵 नंदन नीलेकणी आणि इस्रोचे माजी अध्यक्ष सोमनाथ बदलणार देशाची परीक्षा पद्धत, उच्चस्तरीय 'टास्क फोर्स' स्थापन!

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 27/7/2026 :

नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परीक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आल्याची घोषणा केली. यासाठी 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली.

'हे कृती दल अभ्यास करून केंद्र सरकारला अहवाल सादर करेल,' अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'एक्स'वर पोस्ट केलेल्या व्हिडीओ संदेशाद्वारे दिली. 'या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्याचे काम केले जाईल,' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

🟣'टास्क फोर्स' परीक्षा सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल

'विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी केंद्र सरकार सातत्याने अनेक पावले उचलत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे तुरुंगात खितपत पडले आहेत. आम्ही 'फास्ट ट्रॅक' न्यायालये स्थापन केली आहेत. संसदेतही सोमवारी कठोर कायदेशीर तरतुदी असलेला नवा कायदा करण्याच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत. मात्र, भविष्यासाठी विचार करावा लागेल. परीक्षा व्यवस्था विश्वासार्ह, पारदर्शक असावी आणि यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. हे लक्षात घेऊन जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञानतज्ज्ञ नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कृती दल स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. हा 'टास्क फोर्स' परीक्षा सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल,' असे मोदी यांनी नमूद केले. नीलेकणी यांनी 'आधार' (यूआयडीएआय) संस्थापक अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

🟠 यांचाही समावेश

नंदन निलेकणी यांच्यासह इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ, गुप्तचर विभागाचे माजी संचालक तपन डेका, आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल आणि लॉजिस्टिक्स तज्ज्ञ अमृतलाल मीणा यांचा या कार्यदलात समावेश आहे. देशातील परीक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि संरचनात्मक सुधारणा घडवून आणणे, हे या कार्यदलाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, रविवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. ग्राहक संवर्धन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. 'शिक्षण हा आपल्यासाठी नवी विषय आहे,' असे त्यांनी पदभार स्वीकारल्यावर नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या