✍️ पत्रकारिता म्हणजे समाजाला न दिसणारे वास्तव जनतेसमोर आणणे असते;
अन्यायग्रस्तांच्या आवाजाला व्यासपीठ देणे असते.
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/7/2026 :
IBN लोकमतच्या पत्रकार प्रियंका लाठी यांनी वारीचे वृत्तांकन करताना अशाच एका वृद्ध वारकऱ्याशी संवाद साधला. सुरुवातीला ती फक्त एक साधी मुलाखत होती. पण काही क्षणांत ती संपुर्ण महाराष्ट्राच्या अंतःकरणाला भिडणारी जीवनकहाणी बनली.
त्या आजोबांनी सांगितलेली व्यथा अंगावर काटा आणणारी होती.
बाबांचा एक मुलगा दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झालाय...
दुसरा मुलगा अपघातात गेला...
तर पत्नी आजारपणाने सोडून गेली...
आणि जवळच्याच कोण्यातरी नातेवाईकांनी तब्बल २० एकर जमीन लुबाडली...
इतके सारे आघात सहन करूनही ते आजोबा विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी वारी करत होते. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू केवळ दुःखाचे नव्हते, तर आयुष्यभर मनात साचलेल्या वेदनांचे होते.
कदाचित त्या बाबांना त्यांच्या वेदना ऐकून घेणारा कोणीच मिळाला नव्हता. पण त्या दिवशी प्रियंका लाठी या पत्रकाराने केवळ प्रश्न विचारले नाहीत. तर माणुसकीने त्यांचे दुःख ऐकले. आत्मीयतेने संवाद साधला. त्यांना आपल्या घरातील नातवंडासारखी आपुलकी दिली.
पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या दाखवणे नसते.
पत्रकारिता म्हणजे समाजाला न दिसणारे वास्तव जनतेसमोर आणणे असते.
अन्यायग्रस्तांच्या आवाजाला व्यासपीठ देणे असते.
वारी संपल्यानंतरही प्रियंका राठी त्या आजोबांच्या गावी जाऊन ग्राउंड रिपोर्ट करण्याचा निर्धार करत आहेत. हे केवळ वृत्तांकन नाही. ही संवेदनशील पत्रकारितेची खरी ओळख आहे.
देव प्रत्येकाच्या मदतीला प्रत्यक्ष येत नाही, असे म्हणतात. परंतु तो एखाद्या माणसाला निमित्त बनवतो. कदाचित त्या दिवशी विठ्ठलाने त्या बाबांच्या अश्रूंना जगासमोर आणण्यासाठी प्रियंका राठी यांचीच निवड केली असावी.
आज समाजातील लाखो लोक त्या आजोबांना मदत करण्यासाठी पुढे येतील, यात शंका नाही. पण यासोबतच त्या भागातील शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनीही पुढाकार घेऊन त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा ही विनंती.
एक गोष्ट मात्र या घटनेने पुन्हा सिद्ध केली. रक्ताची नाती कधी कधी दुरावतात.
पण माणुसकीचे नाते कधीच तुटत नाही.
प्रियंका लाठी यांच्या पत्रकारितेला मनापासुन सलाम, ताई तुमच्या कॅमेऱ्याने केवळ एक व्हिडिओ टिपले नाही.
तर एका वारकऱ्याच्या मनात दडलेल्या आयुष्यभराच्या वेदनांना आवाज टिपलाय.
संकलन : प्रविण सरवदे, कराड

0 टिप्पण्या