वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
वृत्त एकसत्ता न्यूज
पंढरपूर दिनांक 25/7/2026 :
नीरा नदीच्या पात्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वीर धरण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आज दि. २५ जुलै २०२६ रोजी दुपारी २.०० वाजल्यानंतर पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे.
वीर धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले असल्याने अतिरिक्त पाण्याचा साठा करणे शक्य नाही. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दि. २२ जुलै २०२६ रोजी ४६०० क्युसेकने सुरू झालेला विसर्ग दि. २४ जुलै २०२६ पासून १५ हजार क्युसेक करण्यात आला असून तो आता २५ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पाण्याचा निचरा नीरा नदीमार्गे भीमा नदीत होत असून त्याचा थेट परिणाम चंद्रभागेच्या पातळीवर होणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपूर शहरातील भाविक-वारकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज दुपारी २ नंतर पाणीपातळीत सातत्याने वाढ होणार असल्याने कोणत्याही नागरिकाने नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन अधीक्षक अभियंता, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण (पाटबंधारे विभाग) सोलापूर यांनी केले आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागा किनारी आणि वाळवंटात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
******
0 टिप्पण्या