जंतर-मंतरवर २३ दिवस उपोषण करणारी नेहा बोरा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/7/2026 :
पेपर लीक, परीक्षा भ्रष्टाचार आणि शिक्षणाच्या संकटाविरुद्ध उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा एक ठाम, संयमी आणि प्रभावी आवाज! नेहा, 'ऑल इंडिया स्टूडंट्स असोसिएशन (AISA)' ची राष्ट्रीय अध्यक्षा आहे.
अवघ्या २९ वर्षांच्या नेहाने दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासाने तिला जात, वर्ग, लिंगभेद, सामाजिक सत्ता आणि संस्थात्मक भेदभाव यांसारख्या प्रश्नांशी जोडले. सध्या नेहा जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्समध्ये पीएचडीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थीनी आहे.
जंतर-मंतर वरील आंदोलन एकट्या अभिजीत दिपकेचे, सीजेपीचे किंवा सोनम वांगचूकचे नव्हते. तर अशा अनेक विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांचे होते. यावर भाष्य करताना 'सरकारी भाडे के टट्टे' (हा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्याचा शब्द) म्हणतात, "जर मुद्दा नीट परिक्षेचा होता तर आंदोलक फक्त 'नीट'चे विद्यार्थी हवे होते."
यावर जेन-झी चे उत्तर आहे, "बिगर भाजपाशासित राज्यात एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्यावर सगळे भाजपवाले मोर्चा काढतात आंदोलन करतात त्या सर्वांवर बलात्कार झालेला असतो का?"
जेव्हा प्रश्न न्यायाचा, भविष्याचा असतो, तेव्हा आंदोलनात सर्व स्तरातील जनतेने सहभागी होणे आवश्यक असते. नेहाने देखील तेच केले. ती केवळ सहभागी झाली नाही. तर ती या आंदोलनाचा कणखर आवाज बनली. व्यासपीठावर तिने केलेले भाषण हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील भावना, संताप आणि न्यायाची अपेक्षा स्पष्ट शब्दांत मांडणारे ठरले.
उद्दाम, उन्मत्त, मस्तवाल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यावर नेहा लोकसभेचे प्रतिपक्ष नेते राहुल गांधींना भेटली. यावेळी बोलताना नेहाने स्पष्ट केले की, "शिक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत माझी सर्वात अर्थपूर्ण चर्चा फक्त राहुल गांधींसोबत झाली."
यावेळी राहुलने स्वतः माईक नेहाच्या हातात दिला आणि राहुल बाजूला झाला. राहुलला भान होते की, या आंदोलनाचे खरे नेतृत्व विद्यार्थ्यांचेच आहे. राहुल या आंदोलनाच्या श्रेयवादात कुठेही नाही. तसेच नेहा देखील कुठेही श्रेय घेताना दिसत नाही. या वयात या मुलीची अशी प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे.
नेहाच्या बोलण्यात सातत्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता दिसते. कर्ज काढून मुलांना शिकवणारी कुटुंबे, वर्षानुवर्षे मेहनत करणारे विद्यार्थी आणि निष्पक्ष संधीची अपेक्षा करणारी एक संपूर्ण पिढी निराश झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेहा आणि तिच्या सहकाऱ्यांनी सातत्यपूर्ण, संयमी आंदोलन उभे केले व यशस्वी केले.
विद्यार्थी आंदोलनाला नेहमीच 'राजकीय' ठरवून त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न होतो. पण नेहा बोरा सारखी विद्यार्थिनी या आरोपाचा ठिकऱ्या उडवते. या देशात आता काहीच होणार नाही! अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा, नेहा बोरा सारख्या तरुणांच्या संयमी लढ्याने स्पष्टवक्तेपणाने, आशेचा किरण दिसला. तिच्या २३ दिवसांच्या उपोषणाने केवळ शरीराचेच नव्हे, तर विद्यार्थी चळवळीचे नैतिक बळही दाखवून दिले.
नेहा विचारते "शिक्षण घेणारा युवा न्याय मागायला कोठे व कसा जाईल?" हा प्रश्न फक्त सरकारला नव्हे, तर संपूर्ण समाजाला विचारते. विद्यार्थी आंदोलनाच्या या नव्या लाटेत नेहा बोरा संयमी आणि हजरजबाबी चेहरा झालेली आहे. जंतर मंतर मैदानावरील आंदोलनांच्या इतिहासात नेहाचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.
तुषार गायकवाड

0 टिप्पण्या