शासकीय योजना, प्रशिक्षणामधून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक रोखावी - संजय वाघमोडे,
वृत्त एक सत्ता न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी दि.9/7/2026 : गावांमध्ये फळबाग लागवड प्रशिक्षण, शेळी मेंढी पालन प्रशिक्षण, गांडूळ खत प्रशिक्षण, मच्छपालन, शिलाई मशीन प्रशिक्षण, जनावरासाठी गोठा, इ. शासकीय योजनेत ५० टक्के, ७५ टक्के सबसिडी मिळवून देतो असे सांगून ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षण, या माध्यमातून लोकांच्याकडून (१६००/) सोळाशे रुपये पासून (५०००/-) रुपये पर्यंत पैसे गोळा केले जातात. काहींच्या कडून योजना मंजूर करून देतो म्हणून पन्नास हजार रुपये फसवणूक केली जात आहे. फसवणूक करणारे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच ग्रामसेवक यांना भेटून ग्रामपंचायतचे पत्र घेऊन गावागावात फिरत आहेत. याबाबत अशा फसवणूकीस शेतकरी पशुपालक मेंढपाळ बळी पडतात. तरी अशी फसवणूक होऊ नये व अशा लोकांना ग्रामपंचायत ने पत्र देऊ नये याबाबत यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले . सदर निवेदनाची प्रत जयवंत उगळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) व डॉ बाबर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग कोल्हापूर यांना देण्यात आली आहे.
यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि शासनाच्या विविध योजना अनुदानावर सुरू आहेत. अशा अनुदानित योजनासाठी प्रशिक्षणासाठी अट घालण्यात आली आहे. याचा फायदा घेऊन काही लोक स्वयंसेवी संस्थाच्या नावाने समूहाने जिल्ह्यात फिरत आहेत. हे लोक ग्रामपंचायत मध्ये जातात व जिल्हा परिषद, पंचायत समिती, शासनाकडून आम्ही आलो आहे. ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध अनुदानित योजना साठी प्रशिक्षण प्रमाणपत्र गरजेचे असल्याने सदर योजनेचे प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही घेऊन गावातील गरजू लोकांना सदर व्यवसायाचे प्रशिक्षण व योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे घेऊन सदर लाभार्थ्यांना आम्ही योजना मिळवून देऊ असेही सांगत आहेत व सदर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या सहीचे पत्र घेऊन ते गावागावात फिरून लाभार्थ्यांना शोधून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत नोंदणी फी शंभर रुपये प्रशिक्षणासाठी १६००/- रुपये तसेच अनुदान योजनेसाठी लागणारा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देण्याची व अनुदान मिळवून देण्यासाठी वेगळी फि असे सांगून लोकांची फसवणूक करत आहेत. ग्रामसेवक व सरपंच यांच्या सही चे लेटर पाहिल्यानंतर गावातील इच्छुक लाभार्थी हे पैसे भरून बळी पडत आहेत. त्यांची फसवणूक होत आहे. शासनाच्या अनुदानित योजना साठी शासनाच्या अधिकृत प्रशिक्षण संस्थेचेच प्रमाणपत्र आवश्यक असल्याने लोकांची फसवणूक होत आहे तसेच शासनाच्या सर्व योजना या आँनलाईन पध्दतीने व पारदर्शक असल्याने लोकांची फसवणूक होत आहे अशा तक्रारी येत आहेत.
कृपया आपणास विनंती की असे कोणतेही प्रशिक्षण घेण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समिती किंवा जिल्हास्तरावर संबंधित खातेप्रमुख यांच्याकडून सबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किंवा लोकांची खातरजमा केल्याशिवाय अशा लोकांना सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या कडून पत्र देण्यात येऊ नये म्हणजे सर्वसामान्य लोकांची फसवणूक होणार नाही. जर असे कोणी पत्र देत असतील किंवा असे लोक गावागावातून फिरत असतील तर आपल्या पशुसंवर्धन कृषी इत्यादी खात्याची पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे करावे किंवा अशा फसवणूक करणाऱ्या लोकांच्या वर रीतसर आपल्या मार्फत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात यावेत जेणेकरून सर्वसामान्य लोकांची फसवणूक होणार नाही याबाबत काळजी घेण्यात यावी. व ग्रामपंचायतीमध्ये अशा नियमबाह्य प्रशिक्षण व ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांनी अशा लोकांना प्रशिक्षण घेण्यासाठी व पैसे गोळा करण्यासाठी पत्र देऊ नये याबाबत आपल्या स्तरावरून काळजी घेण्यात यावी. जर असे प्रशिक्षण आयोजित करावयाचे असल्यास मान्यता प्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून संबंधित प्रशिक्षण मोफत देण्यात यावे. येणारा खर्च १५ वित्त आयोगातून करण्यात यावा. जेणेकरून गोरगरीब,महिला, अपंग इत्यादीं लाभार्थी यांची फसवणूक होणार नाही.
शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, संजय वाघमोडे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष सुभाष वग्रे, संपर्क प्रमुख दत्तात्रय मुडळे, जिल्हाध्यक्ष हेमंत बोडके, जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, पन्हाळा तालुका अध्यक्ष अतुल धनगर इत्यादी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

0 टिप्पण्या