अस्थिरोगतज्ञ डॉ. के. एच. संचेती यांचा वाढदिवस
जन्म - २४ जुलै १९३६ (पुणे)
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/7/2026 :
अस्थिरोग क्षेत्रात डॉ. के. एच. संचेती यांनी १२ डिसेंबर १९६५ रोजी काम करण्यास सुरुवात केली. १९६५ मध्ये संचेती हॉस्पिटल सुरु झाले. तेव्हा पासून अविरतपणे त्यांनी ५५,००० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. २४ जुलै २०२१ रोजी वाढदिवसाच्या दिवशी शेवटची शस्त्रक्रिया त्यांनी केली. त्यानंतर मात्र ते फक्त रुग्णांची तपासणी व उपचार मात्र अविरत सुरूच ठेवणार आहेत. डॉ.संचेती हे अस्थिरोगतज्ञ व संचेती हॉस्पिटलचे संस्थापक. वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पुण्याचे नाव देशभर पोहचविणारे डॉ. कांतीलाल हस्तीमल संचेती उर्फ डॉ. के.एच. संचेती हे पुण्यातील अस्थिरोगतज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊनही जिद्दीने वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम अस्थिरोगतज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. मूळचे पुणेकरच असलेले डॉ.संचेती यांचा एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे किराण्याचे दुकान. पुण्याच्या नारायण पेठेत ते लहानचे मोठे झाले. त्यांची आई सकाळी चार वाजता उठून पिठीसाखर दळायची. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट घ्यायची. आईचे कष्ट आणि वडिलांची सचोटी, प्रामाणिकपणाचे संस्कार हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी परीश्रम घ्यावे लागले. ते अभ्यासात फार काही हुशार नव्हते. त्यांना मॅट्रीकच्या परीक्षेला फक्त ४६ टक्के मार्क पडले होते. पण त्यांची कष्टाची तयारी होती. पण आताची बारावी म्हणजे त्यावेळच्या इंटर सायन्स परीक्षेत डिस्टिंक्शन मिळवले. त्यांचे शाळेतील दोन मित्र डॉ. अशोक कुकडे आणि डॉ. विजय कर्णिक जवळच रहात असत. पुढे त्यांनी तिघांनाही बी.जे. मेडिकलला सरळ प्रवेश मिळाला. त्यांनतर डॉ. संचेती यांनी आर्थोपेडिक सर्जन व्हायचे पक्के केले. पुण्यातला पहिला आर्थोपेडिक सर्जन म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण करून, जंगली महाराज रस्त्यावर भाड्याचा दवाखाना घेतला. १० खाटांचा दवाखाना होता. प्रॅक्टिस करत असताना खूप प्रकारच्या आजारांवर उपचार केले. पुढे एफ.सी.पी.एस. (आर्थो), ए.एस (आर्थो), एफ.सी.आर.एम.एडिनवर्ग (यूके), एफ.ए.सी.एस. डीलिट त्यांनी मिळवली. स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी डॉ. संचेती परदेशात जाऊन तिथले तंत्रज्ञान शिकून घेतात. त्यांनी ऑर्थो या विषयात पीएचडी केली. पुढे हॉस्पिटलसाठी जागा घेतली. जिथे आज संचेती हॉस्पिटल उभे आहे. तिथे १९६५ सालापासून ते प्रॅक्टिस करत आहेत. याला ५५ वर्षे झाली आहेत. ‘संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन’ ही संस्था दक्षिण-पूर्व आशियातील सर्वांत मोठे ‘सिंगल स्पेशॅलिटी हॉस्पिटल’ म्हणून ओळखली जाते. आजही वयाच्या ८५व्या वर्षी ते रोजचे ४० ते ५० रुग्ण तपासतात.
डॉ. संचेती यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांशी ते दोन मिनिटे बोलतात. चटकन एक विनोद सांगतात, हे त्यांना खूप आवडतं. त्यांच्या वेदनेवर हलकीशी ही फुंकरच असते. जेव्हा १९६५ साली त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा हिंदुस्थानातील पोलिओचा प्रादुर्भाव उच्चांकावर होता. त्यांनी अपंग व पोलिओग्रस्त मुलांसाठी वैद्यकीय सेवा करायचे ठरवले. मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील अनेक गरजू मुलांवर उपाचार केले. त्यांनी केलेल्या जवळपास ४३७ शिबिरातून लाखाहून अधिक मुलांना उपचार मिळाले आहेत. त्यांनी बारा हजार ५० शस्त्रक्रिया करून लहान मुलांचे अपंगत्व बरे केले. गरजू मुलांना वीस हजार २०० कॅलिपर्स विनामोबदला दिले आहेत. १९७२ साली त्यांनी संचेती हॉस्पिटल फॉर ऑर्थोपेडिक ऍण्ड रिहेबिलिटेशनची स्थापना केली. आज २०० खाटांचे ऑर्थोपेडिक व ट्रॉमाची विशेष सेवा देणारे हॉस्पिटल आहे. हिंदुस्थानातील पहिल्या तीन मानांकित हॉस्पिटल मध्ये त्यांची गणना होते. पोलिओ निर्मूलना नंतर त्यांनी संधिवाताने ग्रस्त वृद्ध रुग्णांच्या उपचारावर लक्ष केंद्रित केले. संधिवाताने ग्रस्त रुग्णांसाठी वाजवी दरातील त्यांच्या उपयोगी असे हिंदुस्थानी बनावटीचे गुडघा आणि खुब्याचे इम्पांल्ट डिझाईन केले. वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणाचे महत्त्व आणि गरज जाणून त्यांनी संचेती हेल्थकेअर अकाडमीची स्थापना केली आहे. एवढेच नाही तर डॉ.संचेती यांना हॉस्पिटल डिझायनिंगची आवड आहे. त्यांनी अनेक हॉस्पिटलला याबाबतीत कन्सलटन्सी दिली आहे. अध्यायन हा त्यांचा आवडीचा छंद आहे. त्यांनी ३०० पेक्षा जास्त अस्थिरोगतज्ञांना गेल्या ५० वर्षांत शिकविले. शिस्त, रुग्णसेवेचे तत्पर पालन, वेळेचे काटेकोर पालन करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे.
डॉ. संचेती यांनी भारतातील सामान्य आणि गरजू लोकांसाठी अस्थिरोग साधनांची निर्मिती केली. ‘इंडस’ या देशातील पहिल्या भारतीय बनावटीच्या गुडघेरोपण यंत्रणेचे ते जनक आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे आणि भारतीय संरक्षणदलाचे ते मानद अस्थिशल्य चिकित्सक आहेत. बऱ्याच वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्था मध्ये त्यांनी उच्चपदे भूषवली आहेत. ‘अस्थिरोगातील पुनर्वसन’ आणि ‘वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन’ या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या भरीव योगदानासाठी भारत सरकार तर्फे त्यांना १९९१ मध्ये ‘पद्मश्री’; २००३ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१२ मध्ये ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; तसेच २०१३ मध्ये डीलिट ही सन्माननीय पदवी प्रदान करून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच त्यांना २०१७ मध्ये पुण्यातील मानाचा पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल,पुणे) यांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार मिळाला आहे. 'नियतीला घडवताना' हे त्यांनी आत्मचरित्र लिहिले असून एखादा माणूस आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गगनाला कशी गवसणी घालतो ते हे पुस्तक सांगते आणि तसे काम करण्याची प्रेरणाही देते. डॉ.संचेती यांचा वारसा त्यांचे चिरंजीव डॉ. पराग संचेती यशस्वीरीत्या पुढे नेत आहेत. नुकतेच अस्थिरोगतज्ञ डॉ. पराग संचेती यांना युनिव्हर्सिटी ऑफ डंडी स्कॉटलंड कडून ‘डॉक्टर्स ऑफ लॉज’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. त्यांच्या कन्या सोनल संचेती या आर्किटेक्ट असून आपले पती राहुल गोरे यांच्या बरोबर त्यांनी 'ओपोलिस' ही 'मल्टिडिसिप्लिनरी डिझाईन प्रॅक्टिस' सुरू केली. वास्तुरचना, अंतर्गत सजावट आणि विविध शहरी प्रकल्प यांवर ते मोठ्या प्रमाणावर काम करतात. त्यांची मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी कार्यालये आहेत. त्यांना वास्तुरचनेतील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
==================

0 टिप्पण्या