सोनम वांगचुकना हटवण्यासाठी ३० सेकंदाचा प्लॅन, पहाटे ३ पासून हालचाली; साध्या वेशात पोलीस, चादरीचा पडदा लावून उचललं!

 


सोनम वांगचुकना हटवण्यासाठी ३० सेकंदाचा प्लॅन, पहाटे ३ पासून हालचाली; साध्या वेशात पोलीस, चादरीचा पडदा लावून उचललं!

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 18/7/2026 :

*Police Planned Early Morning Shift of Sonam Wangchuk :* गेल्या २१ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केंद्र सरकारकडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीने केला आहे. 

दरम्यान, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या प्लॅनिंगची चर्चा होत आहे. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवण्यासाठी शुक्रवारपासूनच तयारी केली जात होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हा प्लॅन गुप्त ठेवला होता. 

सोनम वांगचुक यांना हटवण्यासाठी ऑपरेशनमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही संसदेत मॉक ड्रिल असल्याचं सांगण्यात आलं होतं. जेव्हा जंतर मंतरवर सर्व पोलीस पोहोचले तेव्हा सोनम वांगचुक यांना हटवायचं असल्याचं समजलं. वरिष्ठांनी इशारा करताच फक्त ३० सेकंदात साध्या वेशातील अधिकारी, डॉक्टर आणि पोलीस व्यासपीठाजवळ गेले. तिथं चहूबाजूंनी सोनम वांगचुक यांना घेरण्यात आलं होतं.



*पहाटे ३ वाजल्यापासून सुरुवात*

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना पहाटे ३ वाजता संसद मार्ग पोलीस ठाण्याजवळ फौजफाट्यासह येण्यास सांगितलं. संसद भवनात मॉक ड्रिल असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. जेव्हा पोलीस तीन वाजता संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा तिथून मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेलं. याठिकाणी जिल्ह्यातील तिन्ही डीसीपी हजर होते.

*३० सेकंद*

पोलिसांना सांगण्यात आलं की, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करायचं आहे. त्यासाठी ३० सेकंदाचा वेळ असेल. यानंतर सर्वांना जंतर मंतरवर पाठवण्यात आलं. रात्रीच बॅरिकेड्स हटवून कुणालाही आत प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली. सोनम वांगचुक यांना हटवताना परिसरात जॅमर लावले होते. ज्यामुळे तातडीने कुणालाही संपर्क करता आला नाही.

*🔶दीपके जाताच हालचाली*

रुग्णवाहिका सुरुवातीला केरल भवनजवळ थांबवली होती. तर बाहेरून आलेल्या पोलिसांचा फौजफाटा जंतर मंतरच्या दोन्ही बाजूला तैनात केला होता. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अभिजीत दीपके फ्रेश व्हायला जातो याची माहिती पोलिसांना होती. त्याच वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इशारा करताच पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यासपीठाला घेरलं. पोलीस साध्या वेशात व्यासपीठावर गेले आणि सोनम वांगचुक यांना घेऊन मागच्या बाजूने उतरले.

*चादरीचा पडदा*

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून उचलून नेण्यासाठी काही साध्या वेशातील पोलीसही होते. तसंच आंदोलनस्थळाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. राखीव पोलीस दलाचीही यावेळी मदत घेण्यात आली. यावेळी जंतर मंतरला पोलीस छावणीचं स्वरुप आलं होतं. आंदोलकांना बाजूला हटवून सोनम वांगचूक यांच्या चारही बाजूने पांढऱ्या चादरीचा पडदा करून उचलून रुग्णवाहिकेत बसवलं आणि तिथून रुग्णालयात नेण्यात आलं.

====================




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या