क्रूरतेची परिसीमा!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/7/2026 :
आज लोकसभेत दिल्लीत पैलेट गनचा जो वापर केला गेला त्याबद्दल गदारोळ माजला.
याबद्दल एवढी टीका का होत आहे? याचे कारण या गनच्या वापराने जे परिणाम होतात त्यामुळे ही टीका होत आहे.
हिंसक गर्दी पांगवण्यासाठी किंवा उपद्रवी घटकांना नियंत्रित करण्यासाठी या गनचा दुर्मिळ परिस्थितीत वापर केला जातो. या बंदुकीच्या काडतुसामध्ये शिशाचे किंवा धातूचे शेकडो लहान गोल छर्रे भरलेले असतात. बंदूक झाडल्यावर हे शेकडो लहान छर्रे एकाच वेळी वेगाने बाहेर पडतात आणि हवेत पसरतात. याचे परिणाम अत्यंत गंभीर आणि कित्येकदा कायमस्वरूपी अपंगत्व आणणारे ठरू शकतात. हवेत पसरणारे हे छर्रे थेट चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर आदळल्यास डोळ्याच्या बाहुलीला छिद्र पडते. यामुळे डोळ्यांची दृष्टी कायमची जाण्याचा धोका असतो. याशिवाय हे लहान छर्रे त्वचा भेदून स्नायू आणि मांसल भागात आत रुततात. छर्रे खूप बारीक आणि जास्त संख्येने असल्याने ते शस्त्रक्रिया करून एक एक बाहेर काढणे अत्यंत कठीण व वेदनादायी असते. शरीरात राहून गेलेल्या शिशाच्या छर्र्यांमुळे विषबाधा किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो. या गन व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी खिळे लावलेल्या काठ्या देखील वापरल्या.
आता ही गन वापरली गेली तेव्हा समोर कोण होते? समोर होता कोवळ्या विद्यार्थ्यांचा जमाव! त्यांना अशा प्रकारे कायमचे जायबंदी करण्यासाठी ही गन वापरली गेली. विचार करा. शेकडो बारीक छर्रे विद्यार्थ्यांच्या जमावावर बंदुकीतून झाडण्यासाठी कोणती मानसिकता लागत असेल? कोवळ्या मुला-मुलींना खिळे लावलेल्या काठ्या मारणारे लोक किती क्रूर असतील? या लोकांना कायमचा धडा शिकवा असे आदेश असल्याशिवाय हे होणार नाही. असे आदेश राजकीय सत्तेत बसलेले लोकच देऊ शकतात. असे आदेश देणारे राजकीय नेते कोण आहेत हे कधीच सिद्ध होत नाही, कारण हे तोंडी आणि अतिवरिष्ठ पातळीच्या अधिकाऱ्यांना दिले जातात.
या पैलेट गनचा वापर दिल्लीत कधीही झालेला नाही. महाराष्ट्रातही तसे ऐकण्यात नाही. फार पूर्वी काश्मीरमध्ये हिंसक जमावावर असा वापर केला गेला होता आणि त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले होते एवढा हा गनचा वापर दुर्मिळ आहे. आणि ही गन दिल्लीत निशस्त्र विद्यार्थ्यांवर वापरण्यात आली.
याशिवाय बिहारमधील सिवानमध्ये चक्क AK ४७ मधून गोळ्या झाडण्यात आल्या. युद्धात किंवा दहशतवादी हल्ल्याला तोंड देताना ही वापरली जाते. या गनला weapon of mass killing म्हणतात, कारण एका फैरीत अनेक गोळ्या झाडल्या जवळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी करण्याची या बंदुकीची क्षमता आहे. मुंबईकरांना आठवेल की अजमल कसाबने मुंबईकरांच्या सामूहिक हत्याकांडासाठी ही बंदूक वापरली होती. पण तो तर पाकिस्तानी दहशतवादी होता. आपल्या पोलिसांनी आपल्याच विद्यार्थ्यांवर ती वापरावी?
आजच्या बातमीनुसार एका पत्रकाराने जो दगड भरलेला ट्रक सापडला होता या प्रकरणाची चौकशी केली आणि सिद्ध झाले की तो ट्रक दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच जप्त केला होता आणि तो त्यांच्याच ताब्यात होता व तो इकडे आणून ठेवला गेला. एवढी भयंकर कारस्थाने करण्याची सरकारला गरज का पडावी? यापुढे या सरकारची विश्वासार्हता काय राहील? ज्या तरुण पीढीविरुद्ध अशी शस्त्रे वापरली गेली आणि अशी कारस्थाने केली गेली, ती पिढी हे सहजासहजी विसरेल काय? याचे परिणाम सरकारला आणि सत्ताधारी पक्षाला भोगावेच लागतील.

0 टिप्पण्या