वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 05/07/2026 :
आज अचानक मनात एक विचार आला आणि मी शांत झालो. प्रश्न साधा होता पण खोल होता.
"मी समोरच्यासाठी फक्त एक गरज आहे की खरोखर गरजेचा आहे?" हा प्रश्न जेव्हा मनात डोकावतो, तेव्हा आजूबाजूची परिस्थिती आणि नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.
मला जाणवलं की, आपण कोणाची तरी गरज असणं यात एक प्रकारचा वापर होण्याचा वास येतो. काम निघेपर्यंत विचारपूस होणं आणि गरज संपली की विस्मृतीच्या पडद्याआड जाणं, हे अनुभवलं की मन अस्वस्थ होतं. पण कोणासाठी तरी गरजेचं असणं ही पूर्णपणे वेगळी भावना आहे. ते अन्नातील मिठासारखं असतं; ज्याची किंमत त्याच्या नसण्याने जास्त जाणवते.
हा प्रश्न मनात निर्माण झाल्यानंतरची माझी स्थिती मोठी विलक्षण होती. सुरुवातीला थोडा संभ्रम झाला, कदाचित थोडं दुःखही झालं. पण नंतर एक स्पष्टता येत गेली. मला उमजलं की, मी कोणासाठी फक्त Priority आहे आणि कोणासाठी फक्त एक Option ही जाणीव कडू असली तरी ती मला मुक्त करणारी ठरली.
आज हा माझ्या अनुभवातील लेख लिहिताना मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते, आपण जगासाठी गरज असू किंवा गरजेचे, त्यापेक्षा आपण स्वतःसाठी किती गरजेचे आहोत, हे ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी मी स्वतःची किंमत ओळखली, त्या दिवशी दुसऱ्याच्या वागण्याने मनाची होणारी तगमग थांबली.
शेवटी इतकंच म्हणेन, कोणाची तरी तात्पुरती गरज बनून राहण्यापेक्षा, स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत जपणं आणि कोणाचं तरी 'हक्काचं माणूस' होणं यातच खरं समाधान आहे.
©️श्रद्धा धनेश.

0 टिप्पण्या