संपादकीय......
सुप्रियाच्या हातात शरद पवारांचा निर्णय
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक08/07/2026 :
“सुप्रियाने ठरवायचे की सत्तेत राहायचे की विरोधी बाकावर बसायचे”, हे अतिशय फेमस वाक्य खुद्द शरद पवार यांचे आहे. अजितदादा पवार यांच्या गटाने जेव्हा उठाव केला, तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे एकमेकांमध्ये विलिनीकरण करायचे, वेगळ्याने स्वबळावर निवडणूक लढायची की काँग्रेस आघाडीसोबत जायचे? हे शरद पवारांचे ठरेना. आतापर्यंत ते स्वतःचे निर्णय स्वतः घेत असत. त्यांच्या डोक्यात काय चाललेय, हे कधीच कोणालाच कळत नाही. शरद पवारांची कन्या सुप्रियाताई अथवा पत्नी प्रतिभाताई यांना देखील शरद पवारांच्या मनातले कधी समजले नाही. आता मात्र काळ बदलला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वेसर्वा सुप्रिया सुळे यांनीच व्हावे, अशी शरद पवारांची तीव्र इच्छा आहे. शरद पवारांनी जरी तसे बोलून दाखविले नसले तरी त्यांचे प्रत्येक पाऊल त्याच दिशेने पडते. सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण होईल का? शरद पवारांचा पक्ष एनडीएला म्हणजे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देईल का? याच चर्चांचा जोर आहे. तेवढीच तुफान चर्चा मुंबईत या विषयावर सुरू आहे. कारणही तसेच आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समर्थक सांगलीचे जयंत पाटील आणि केंद्रात जाऊन यशस्वी राजकीय वाटचाल करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलात गुप्त बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? हे कुणालाही समजले नाही. पण चर्चा होताच शरद पवार एनडीएकडे झुकणार का? याचे मात्र तर्कवितर्क लावले जाऊ लागले. शरद पवार नेहमी पेच निर्माण करतात. एकाच वेळी त्यांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवले. एकीकडे राहुल गांधी यांच्या पक्षाकडे त्यांचा कल जास्त असल्याचे दाखवतात, तर दुसरीकडे भाजपासोबत जाण्याच्या वावड्या उठविल्या जातात. भाजपाच्या तोडफोडीच्या राजकारणात उध्दवजी ठाकरे यांचे खासदार गळाला लावल्यानंतर भाजपा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे पाहील, याची भीती निर्माण झाली आहे. शरद पवार सावध आहेत. आपले आठ खासदार आणि आमदार फुटू नयेत म्हणून आपापसात सतत चर्चा सुरू आहे. पण पडद्यामागे शरद पवार आणि भाजपाचे काय समीकरण सुरू आहे, हे मात्र सांगता येणार नाही! शरद पवारांना त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टिकवायचा आहे. तसे करताना शरद पवारांना वैचारिक बांधिलकी जपायची गरज नाही. भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू होते, पण अचानक हे इनकमिंग थांबले आणि उध्दवजींच्या सर्व खासदारांना एकनाथजींच्या शिवसेनेकडे वळविले गेले. भाजपाचे दरवाजे बंद झाले, अशी चर्चा सुरू होती. तेवढ्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काही अपवादात्मक परिस्थितीत आमचे दरवाजे पुन्हा उघडू शकतील!” याचाच अर्थ हे विधान शरद पवारांसंदर्भात होते. जर शरद पवार एनडीएसोबत गेले आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर तमाम विरोधकांचा कणा मोडेल. ते तटस्थ राहिले तर आपल्या पक्षातील आमदार-खासदारांना सुरक्षित व एकत्रित ठेवणे कठीण जाईल. आमदार-खासदार फुटतील, याची भीती आणि टांगती तलवार सतत मानेवर राहील. जर शरद पवार गटाने भाजपासोबत जाणे पत्करले तर समर्थकांना सीबीआय, ईडी, आयकर विभागासारख्या चौकशांच्या फेऱ्यांमधून राजाश्रय मिळेल. हा व्यवहारिक मार्ग शरद पवार पत्करतील, असेच अनेकांना वाटते. पण आडवी येते ती सुप्रिया! सुप्रियाताईंना भाजपाबरोबर जायचे नाही, सुप्रियाताईंना त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या हिंमतीवर आणि स्वबळावर मोठा करायचा आहे. केवळ कन्येच्या लाडाकरिता शरद पवार थांबले आहेत, पण बिकट परिस्थितीत त्यांची पावले एनडीएच्या दिशेने कधीही वळतील. जयंत पाटील व तावडे यांची चर्चा हीच झाली असेल का? जेव्हा अजितदादा पवार यांनी भाजपाबरोबर जाऊन सत्तेत सहभागी व्हायचे ठरविले होते, तेव्हा अजितदादा पवार म्हणाले होते की, “आम्ही भाजपाच्या घरापर्यंत गेलो, बेल वाजवली आणि मागे वळून पाहतो तर काय? शरद पवार मागच्या मागे निघून गेले होते! मग आमच्याकडे दोनच पर्याय होते. एक म्हणजे दरवाजाच्या आत जाऊन सत्तेत सहभागी व्हायचे, नाहीतर डाव फसला म्हणून परत यायचे. आम्ही सत्तेत सहभागी झालो. सुप्रियाकरिता शरद पवार परतले होते!” तेव्हापासून ही बाब सुप्रियाताईंच्या मनात खोलवर रुतून बसली. सर्व गोष्टींना, राग लोभाला काळ हेच औषध असते. सुप्रियाताई यांनी नागपूरच्या लाखानी कुटुंबाला आपली लाडकी कन्या दिली. रेवतीचा विवाह ज्यावेळी झाला, त्याचवेळी लाखानी हे विधानपरिषदेचे आमदार झाले. लोकांनी टीका केली. स्वतः पुरोगामी म्हणणारे राष्ट्रवादीचे नेते हे नागपूरला जाऊन रा.स्व.संघाची पॅण्ट घालून फिरल्याची टीका झाली. सुप्रियाताई वारंवार म्हणाल्या की, “हा राजकीय निर्णय नव्हता, हा कौटुंबिक मामला होता.” पण ऐकतंय कोण? आता परत तीच वेळ आली आहे. निर्णय घ्यायचा एनडीएसोबत की युपीएसोबत? सुप्रियाताईंनी ठरवायचे की, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करायचे, एनडीएसोबत जायचे की स्वतःच्याच पक्षाची तोडफोड उघड्या डोळ्यांनी पाहायची. निर्णय सुप्रियाताईंच्या हातात आहे. कारण शरद पवार थकले आहेत! व्हिलचेअरवर बसून नातीचा विवाह पाहून खऱ्या अर्थाने व मनाने निवृत्त झाले आहेत. जर भाजपासोबत जायचे ठरले तर सुप्रियाताईंचे केंद्रात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद नक्की, शिवाय शरद पवार यांना राष्ट्रीय दर्जाचे स्थान मिळेल! 2029 च्या निवडणुकीत सुप्रियाताईंची बारामतीची उमेदवारी आणि त्याकरिता भाजपाची साथही असेल. व्यावहारिकदृष्ट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपासोबत जाणे, आताच्या काळात योग्य दिसते, पण अनुभवाने श्रेष्ठ बनलेले शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय? हे सांगता येणार नाही. शरद पवार हे दोन्ही दगडावर पाय ठेवून आहेत. ते काँग्रेसच्याही जवळ आहेत आणि भाजपाबरोबर सत्तेत सामील होऊ, अशा चाली देखील खेळत आहेत! सोनी टीव्हीवर शिवाजी साटम यांचा ‘सीआयडी’ सीरियल लागत असे. खुद्द शिवाजी साटम यांना देखील शरद पवारांचे हे कोडे सोडविता येणार नाही. कारण शरद पवारांनी आपले सर्व निर्णय आपल्या कन्येच्या हाती दिले आहेत.
रोहिणी खाडिलकर-पोतनीस
98210 56246


0 टिप्पण्या