हे भयंकर आहे
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/07/ 2026 :
हे आहेत एस. लक्ष्मी नारायणन, देशाचे माजी गृहसचिव. त्यांनी राम मंदिराला तब्बल दीड क्विंटल वजनाचे सोन्याची पाने असलेले रामचरितमानस दान केले होते. ते गायब झाल्याचा त्यांचा दावा आहे.
सुब्रमण्यम लक्ष्मी नारायणन हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य आहेत. त्यांच्या आईने सुमारे पंधरा वर्षे वैधव्य सोसलेय. त्यांनी आपले सर्व दागिने सुनेला दिले. त्यांच्या निधनानंतर, त्यांनी ते दागिने प्रभू रामाच्या चरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आईचे दागिने आणि काही इतर पैसे वापरून सोन्याचे रामचरितमानस दान केले. त्यांना त्याची कोणतीही पावती देण्यात आली नाही. मग एके दिवशी त्यांना सांगण्यात आले की त्यांनी दान केलेले रामचरितमानस गायब झाले आहे.
भगवान विष्णूंच्या आरतीतील, "तुम्हें मेरा प्रसाद, मुझे क्या पसंद आएगा?" या ओळींनी प्रेरित होऊन, 1970 च्या आयएएस तुकडीचे माजी केंद्रीय गृहसचिव एस. लक्ष्मी नारायणन यांनी आपली आयुष्यभराची कमाई रामलल्लाला समर्पित केली. ह्या दानाचे श्रेय सार्वजनिकरित्या घ्यायचे नाही, असे त्यांनी आधी ठरवले होते मात्र नंतर त्या दानाचे महत्व आणि स्वरूप पाहून ही माहिती त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये सार्वजनिक केली.
भगवान रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेनंतर, 5 कोटी रुपये खर्च करून तब्बल 151 किलोग्रॅम वजनाचे रामचरितमानस अर्पण करण्याचे वचन दिले होते ते त्यांनी वेळेत पूर्ण केले. प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसमोरच हा सुवर्णग्रंथ स्थापित केला गेला. 10902 श्लोक असलेल्या या महाकाव्याचे प्रत्येक पान तांब्यापासून तयार केले होते. ही पाने 24 कॅरेट सोन्यात बुडवून त्यावर सोन्याचा मुलामा दिलेल्या अक्षरांनी रामायण कोरले होते. आता हे गायब झाले आहे अशी तक्रार लक्ष्मी नारायणन ह्यांनी नोंदवली आहे.
या महत्त्वाकांक्षी दानासाठी 140 किलोग्रॅम तांबे आणि सात किलोग्रॅम सोने लागले, तसेच सजावटीसाठी चार किलो वजनाचे इतर धातूही (जसे की चांदी) वापरले गेले. या अद्वितीय ग्रंथाच्या निर्मितीसाठी निधी उभारण्याकरिता, नारायणन यांनी आपली सर्व मालमत्ता विकली आणि सगळी बँक खाती रिकामी केली. यातून निर्माण होणारी 'राम चरित मानस' ही रचना भक्तिभावाने रामलल्लांच्या चरणी अर्पण केली. आपल्या पत्नीसोबत अयोध्या भेटीदरम्यान, नारायणन यांनी हे दान करण्याच्या आपल्या इच्छेबाबत राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यांनी परवानगी दिल्यानंतरच लक्ष्मी नारायण ह्यांनी सुवर्णग्रंथ निर्मितीस प्रारंभ केला होता, हे विशेष आहे!
ते अनेक वेळा अयोध्येला गेले. चंपत राय ह्यांनी त्यांना कधी कधी चार चार तास बसवून ठेवले आणि नंतर थातुर मातुर उत्तरे देऊन वाटे लावले! तासंतास वाट पाहिल्यानंतर ते चंपत राय यांना भेटले आणि त्यांनी तक्रार केली. चंपत यांनी विचारले, "मी हे असेच हेलपाटे घालत राहू का?" त्यावर ते म्हणाले, "तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही ते गर्भगृहात ठेवाल, मग आता तुम्ही ते का काढून टाकले?"
त्यावर चंपत म्हणाले, "मी जे सांगेन तेच होईल. पुढे जा, तुम्हाला जे करायचे आहे ते करा." त्यानंतर एस लक्ष्मी नारायणन यांनी असंख्य पत्रे लिहिली, सर्वतोपरी प्रयत्न केले आणि अनेक अधिकाऱ्यांकडे अपील केले, पण बेपत्ता झालेला रामचरितमानस सुवर्ण ग्रंथ कधीच सापडला नाही.
त्यांच्या कोणत्याही पत्राला उत्तर दिले गेले नाही. त्यांना कसलीही माहिती देण्यात आली नाही. आता त्यांना जाणून घ्यायचे आहे की, त्यांनी दान दिलेले रामचरितमानस कुठे गेलेय. त्यांनी चोरीचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (SIT) सुद्धा पत्र लिहिले आहे.
आपली पत्नी सरस्वती नारायणन ह्यांच्यासमवेत ते अयोध्येला आले होते, तेव्हा आपल्या दानामागची भूमिका सांगताना ते भावुक झाले होते.
त्यांनी सांगितलं होतं की -
"आमचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे आहे. गरोदरपणात, आईने दिल्लीतील बिर्ला मंदिरात, जे लक्ष्मी नारायण मंदिर म्हणूनही ओळखले जाते, तिथे प्रार्थना केली होती की, जर मुलगा झाला, तर ती त्याचे नाव लक्ष्मी नारायण ठेवेल. आईने आपला शब्द पाळला व माझे नाव लक्ष्मी नारायण ठेवण्यात आले! आपल्या जन्मापासूनच देवाने आपल्याला आयुष्यभर भरघोस आशीर्वाद दिला आहे.
मी प्रमुख पदे भूषवली आहेत आणि माझे आयुष्य समृद्ध राहिले आहे. निवृत्तीनंतरही माझे उत्पन्न भरीव आहे. असे असूनही, मी साध्या आवडीनिवडी असलेला आणि मूलभूत गरजांमध्ये समाधानी असलेला माणूस आहे. माझी पेन्शन बऱ्याच अंशी तशीच आहे. देवाने मला जे दिले आहे, ते परत देण्यावर माझा विश्वास आहे. दानधर्माच्या नावाखाली पैसे गोळा करण्यापेक्षा आपले पुस्तक देवाच्या चरणी अर्पण करणे मला अधिक अर्थपूर्ण वाटते!"
चोरीच्या कथित घटनेचे त्यांना आता विलक्षण दुःख वाटते! राम मंदिरात ठाण मांडून बसलेल्या चोरांनी अशा किती जणांच्या श्रद्धेवर डाका घातला असेल याची कल्पना करवत नाही!
तरीही काही अंधभक्तांना लक्ष्मी नारायण खोटं बोलत आहेत असं वाटत असेल तर त्यांनी लक्ष्मी नारायण यांच्याविषयीची माहिती घेतली तर लक्षात येईल की, ह्या माणसाचे अख्खे कुटुंब रामभक्त ईश्वरउपासक आहे! आणि ते असे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या समग्र कुटुंबाची संपत्ती ह्या दानासाठी वापरली होती!
आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या वेबपोर्टलवर 22 नोव्हेंबर 2023 रोजी एस लक्ष्मी नारायण ह्यांनी दान केलेल्या सोनेरी रामचरित मानस विषयीची बातमी वाचून खात्री करून घेऊ शकता! मग खात्री पटेल की, हा माणूस खोटे बोलत नसेल, हा काही चंपत नाही! असो!
रामाच्या नावावर केली गेलेली ही लूट पाहून अयोध्येतले प्रभू राम पुन्हा वनवासाला गेले असतील. असो! त्यांच्या नावावर निवडणूक तर लढवून झालीय! आपल्याला काय त्यांचे! सब चंगा सी!
आपल्याला जे दान द्यायचे आहे ते एखाद्या शाळेला, एखाद्या संशोधन केंद्राला, निधीअभावी कोमेजून जाणाऱ्या एखाद्या एनजीओला, अन्न पाणी वारा ऊन ह्या समस्यांचा सामना करणाऱ्या एखाद्या वन्य जीवाला किंवा जीवन मरणाची लढाई लढणाऱ्या परंतु पैशाअभावी उपचार घेऊ शकत नसलेल्या गरजू रुग्णांना हे पैसे दिले तर त्यांच्यात वसलेल्या खऱ्या ईश्वराची सेवा होईल, असे एस. लक्ष्मी नारायणन असोत किंवा आणखी कोणत्याही जातीधर्माच्या अन्य कोणत्याही माणसाला का वाटत नसेल? पुनश्च असो..
- समीर गायकवाड
नोंद - काही दिवसापुर्वी एका पोस्ट वाचण्यात आली होती की, खरे चोर पकडले जातील मात्र तुम्ही चंपत राय ह्यांना दूषणे देऊ नका. ही तक्रार समोर आल्यावर त्यांचे मत काय असेल?

0 टिप्पण्या