१७ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये भरलेला प्रचंड द्वेष
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/07/2026 :
१७ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये गांधी, नेहरू यांच्याविषयी प्रचंड द्वेष भरलेला दिसतो. यातील बहुतांश लोक आंबेडकरांनादेखील तिरस्काराने पाहतात. सोशल मीडिया विशेषतः ट्विटर आणि यूट्युबवर ही घृणा मोठ्या प्रमाणात दिसते.
यूट्युबवरील संबंधित व्हिडियोचे कॉमेंट बॉक्स पाहिले तर त्यात गांधी, नेहरूंना प्रचंड शिवीगाळ होत असलेली आढळते. याउलट सावरकर, नथुराम, गोळवलकर व तत्सम ब्राह्मणी नेत्यांचं प्रचंड गौरवीकरण होताना दिसते.
विखार पसवरणारी ही पिढी गेल्या १०-१२ वर्षांत तयार झालेली आहे. २०१४ साली पौगंड अवस्थेत असलेल्या मंडळीवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या मेंदूवर द्वेष मोहिमेच्या वाहकांनी प्रचंड काम केलं आहे.
नवतरुणांची माहितीची भूक चुकीचं व अर्धसत्य सांगून तथा बुद्धिभेद घडवून भागवली गेली. त्यामुळेच गेली काही वर्ष ही मंडळी सतत परधर्म द्वेष व स्वातंत्र्य लढ्यातील सेनानीविषयी प्रचंड घृणा बाळगते.
यांना खरं ऐकायचंच नसतं. कारण त्यांना भरवलं गेलं आहे की, आम्ही सांगतो तेच खरे व इतर ‘सब झूठ...’ त्यामुळे डोळ्यांनी पाहिलेलंही त्यांना खरं वाटत नाही. अनुभवजन्य सत्याला नाकारणारी भारतातील ही एकमेव पिढी असावी. परिणामी ही मंडळी प्रचंड विखारी झालेली दिसते.
अज्ञानता असली किंवा माहीत नसलं तरी वाद घालायला ही तत्पर असतात. काहीही करून धुडगूस व उपद्रव माजवणे त्यांचा उद्देश असतो. अभ्यासकांची ज्ञानसाधना, चिंतन, तप, अभ्यास व विचारप्रक्रियेत माती कालवून ते आनंदी होतात.
ही मंडळी विद्वान, लेखक, विचारवंत व अभ्यासकांवर गलिच्छ भाषेत चिखलफेक करते. संबंधित विद्वान लेखकांनी वर्षानुवर्ष खपून लिहिलेले लेख, पुस्तक विखार बाळगणाऱ्या तरुणांनी पाहिलेलीही नसते.. वस्तुत: त्यांना पहायची देखील नसते. आपल्या अंधज्ञानाला तडा जाणारे एखादे विधान पुढे आलं की ही मंडळी तुटून पडते.
मराठी प्रदेशातील भालचंद्र नेमाडे, सुरेश द्वादशीवार, रावसाहेब कसबे, आ.ह. साळुंखे, शरद पाटील व इतर मंडळींना सोशल मीडियावर प्रचंड शिवीगाळ होते, असं माझ्या पाहण्यात आलेलं आहे.
अगदी हेच हिंदी-इंग्रजी भाषेतील विद्वान अभ्यासक-लेखकांच्या बाबतीत होतं.
सर्वाधिक टीका होणारे दोन ग्रहस्थ मला दिसतात.. १) महात्मा गांधी.. ३) नेहरू..
यांच्या विषयी एक वाक्यही ट्रोलर्स मंडळींना चांगलं ऐकायचं नसतं. कारण या थोर मानवांबद्दल सर्वाधिक गलिच्छ भाषेत लिहिलं व प्रचारित केलं गेलेलं आहे. त्यामुळे दुष्प्रचारावर पोसलेल्या भक्ट्रोल मंडळींना अनुभवजन्य खरंही.. खोटे, फेक, प्रपोगंडा वाटते.
ही दुष्प्रचारक मंडळी आपल्या भोवती विणलेल्या मृगजळात इतकी रमली आहे की सत्य ही आता त्यांना आभास वाटू लागला आहे.
हे काय होतंय?
सोशल मीडिया रिएक्शनरी असल्याने किंवा पेड ट्रोलर्समुळे मला हा भ्रम झालेला असावा.
पण एक मात्र खरं आहे की परधर्म द्वेष तथा विखार बाळगणारी ही बहुतांश मंडळी बहुजन जात-समुदायातील आहे.. हे झोंबी झालेले दिसतात.
छूSSS म्हणताच ते दाखवलेल्या शत्रूपक्षावर तुटून पडतात. याचं व्यावहारिक स्वरूप पश्चिम बंगालमध्ये दिसून येते.
सत्तेवर येताच बंगालमध्ये सामाजिक, राष्ट्रीय प्रतीकांची मोडतोड झाली.. विरोधी नेत्यांना घरात घुसून मारहाण झाली. त्यांची नग्न मिरवणूक काढली गेली. मिरवणूकीत जय क्षीरामच्या घोषणा देत हिंसक कारवाया केल्या जात आहेत.
टीएमसीच्या खासदार मोहुआ मोईत्रा यांच्यावर केलेला हल्ला विखाराचं खूप भयानक चित्र सादर करतो. बाहेर जमलेला जमाव व त्यांची प्रतिक्रिया भविष्यकालीन भारताच्या दृष्टीने धोक्याची घंटा वाटते.
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची केलेली विटंबना पाहून मन व्यथित होतं. हे पाहताना नव्या पिढीबद्दल काळजीही वाटली.
कदाचित येत्या पाच-सात वर्षात ही मंडळी आपण कुठे चुकलो? याचं आत्मचिंतन करेल. परंतु गेलेली वेळ परत येणार नाही.
सत्य आणि असत्यामध्ये एक भेद रेषा असते.. ती रेषा कोणा एका घटकासाठी फायदा उत्पन्न करते तर बहुतांश साठी त्यातून नुकसान हाती येतं.
फायदा आणि तोटा याची तुलना केली तर सुद्बुद्धी येऊ शकते.
-कलीम अज़ीम, पुणे
===================

0 टिप्पण्या