मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/06/2026 :
आपल्या संस्कृतीत प्रत्येक व्यक्तीवर योग्य संस्कार व्हावेत, यासाठी सर्व कार्यक्रम विधिपूर्वक करण्याची सुंदर परंपरा आहे. जन्माला येण्यापूर्वीच्या गर्भसंस्कारांपासून ते मृत्यूनंतरच्या अंत्यसंस्कारांपर्यंत आपला हा जीवनप्रवास सुरू असतो. या जन्म-मृत्यूच्या प्रवासादरम्यान देखील अनेक संस्कार विधिवत केले जातात.
परंतु, हल्ली हे कौटुंबिक कार्यक्रम होतात खरे, पण त्यामध्ये मूळ विधीपेक्षा इतर बाह्य गोष्टींनाच जास्त महत्त्व दिले जाते. आता या विधींना एका *'इव्हेंट'* चे स्वरूप आले आहे. जास्तीत जास्त पैसे खर्च करून स्वतःचा मोठेपणा मिरवणे, दिखावा करणे आणि कार्यक्रमाचा केवळ भपका वाढवणे, यावरच जास्त भर दिला जातो.
खरे तर, काही कौटुंबिक विधी हे अत्यंत भावनिक आणि पवित्र असतात. पण त्याचे असे व्यापारीकरण करून आपणच त्या गोष्टी हास्यास्पद बनवत आहोत, हे कुठेतरी थांबले पाहिजे. हजारोंच्या संख्येने लोकांना बोलावून केवळ गर्दी आणि गोंधळ करण्यापेक्षा, त्या विधींमागील मूळ उद्दिष्ट आणि अर्थ काय आहे, हे समजून घेतले पाहिजे.
आजचा संकल्प
विधिवत करायच्या कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात केवळ नटणे-मिरवणे आणि दिखावा करणे याला महत्त्व न देता, त्या विधींचे खरे धार्मिक व मानसिक महत्त्व आपण समजावून घेऊया आणि त्या संस्कारांचे पवित्र्य मनोभावे जपूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या