मुलांची मानसिकता व एकाग्रता यासाठी योगाभ्यास
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/06/2026 :
व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत असतानाच त्याच्या जडणघडणीमध्ये शालेय जीवनाचा कालखंड हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या कालखंडामध्ये शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या विकासाचे मुख्य साधन आहे या विकासाच्या साधनेत योग हे शास्त्र म्हणून वापरले गेले तर शालेय जीवनापासूनच त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. विद्यार्थ्यांच्या जीवनातील निरनिराळ्या स्थित्यंतरात निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्याकरता त्यांची शारीरिक व मानसिक उन्नती होण्याकरता त्यांच्यावर चांगले संस्कार होण्याकरता शालेय शिक्षणात योग शास्त्राचा समावेश व्हावा हा एक प्रभावी मार्ग आहे.
योग शास्त्रामध्ये फक्त शारीरिक व्याधींचाच विचार केला जात नाही तर मानसिक स्वास्थ्याचाही विचार केला जातो. स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन वास करते. आजच्या स्पर्धेच्या युगात शालेय विद्यार्थ्यांसाठी हे वचन १०० टक्के लागू होते.
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. पालकांच्या अवास्तव अपेक्षा, परीक्षा ,मार्कस, स्पर्धा यामुळे विद्यार्थ्यांमध्ये Anxiety म्हणजेच चिंता, काळजी,घबराहट,भविष्यात काहीतरी वाईट घडेल या भीतीने मनात सतत राहणारी अस्वस्थता, सतत नकारात्मक विचार ,एकाग्र न होणे तसेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास किंवा मोबाईल स्क्रीन मुळे ७० टक्के विद्यार्थ्यांची झोप पुरेशी होत नाही त्यामुळे चिडचिडपणा, विसरभोळेपणा वाढत चाललेला आहे. यामध्ये अधिक भर तर मोबाईलची. गेम्स,रिल्स यामुळे एकाग्रता/लक्ष ८ सेकंदापेक्षा कमी टिकते.अभ्यासात मन लागत नाही. शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे तास कमी झाले, काही शाळांमध्ये मैदानेच नाहीत त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होऊन लठ्ठपणा, पाठ दुखी व आळस वाढत चालला आहे.
योग म्हणजे फक्त व्यायाम नाही तर श्वासाच्या माध्यमातून मन व शरीर एकत्र जोडणारी क्रिया आहे. मन आणि शरीराचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात *मन करा रे प्रसन्न ,सर्व सिद्धीचे कारण I* कारण यश,सिद्धी, सुख- समाधान या सगळ्यांचे एकमेव कारण मनच आहे.परंतु भारत सरकारच्या क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो कारण मन अप्रसन्न आहे.मार्क, नोकरी, स्पर्धा यांच्या तणावात सिद्धी तर दूरच परंतु विद्यार्थ्यांना जगणेच नकोसे वाटू लागले आहे. त्यामुळे मन प्रसन्न,आनंदी असेल तर शरीर कार्यक्षम राहते यासाठी योगाभ्यासाची अत्यंत आवश्यकता आहे.
सूर्यनमस्कार मुळे शरीर बळकट होते.बळकट शरीरात आत्मविश्वास आपोआप येऊन सकारात्मकता येते.
योगाभ्यासामुळे कपाळाचे अगदी मागे डोळ्याच्या वर असलेला भाग प्रिफंटल कोर्टेक्स ज्याला मेंदूचा बॉस म्हणतात. तो सक्रिय होऊन चंचल मनाला शांत करून अचूक निर्णय घेण्यास भाग पाडतो. जसे की आता रिल्स बघू की अभ्यास करू हे ठरवणे, वर्गात शिक्षक बोलत असताना लक्ष देणे म्हणजेच एकाग्र होणे, राग आला तरी ओरडणे टाळणे, जंक फूड खाण्याची इच्छा रोखणे ,अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे, भविष्याचे नियोजन करणे, इतरांशी कशी वागावे, योग्य-आयोग्य समजणे.
अनुलोम विलोम,भ्रमरी, ओंकार,ध्यान यासारख्या योग साधनेमुळे कॉर्टिसॉल हे तणावाचे हार्मोन कमी होऊन मुलांच्या मनामध्ये परीक्षेची असलेली 60 टक्के भीती कमी होते.त्याच बरोबर सेरिटोनिन हे आनंद व समाधान निर्माण करणारे हार्मोन तयार होते.तसेच मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात 15 टक्के वाढ होते त्यामुळे राग व चिडचिड कमी होऊन स्मरणशक्ती वाढते.
दिल्लीच्या एम्स या संस्थेच्या संशोधनानुसार रोज 30 मिनिटे योग करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मार्क्स 18%नी वाढले व शाळेतील गैरहजरी 40% ने कमी झाली.
श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आम्ही इयत्ता 10वीच्या 58 विद्यार्थ्यांचा योगाभ्यास रोज 45 मिनिटे त्यांच्याकडून करून घेतल्यानंतर त्यांच्या मानसिकतेमध्ये 30.6% एकाग्रतेमध्ये 28.1% आणि आत्मविश्वासामध्ये 32.1% वाढ झाली म्हणजेच योगाभ्यासामुळे शालेय किशोरवयीन मुलांच्या मानसिकता, एकाग्रता आणि आत्मविश्वासांमध्ये सकारात्मक परिणाम झालेला दिसून आला. शिक्षणात योगशास्त्र या विषयाचा अंतर्भाव करून जागतिक योग दिन 21 जून निमित्त प्रत्येक शाळेने योग तासिका सुरू केली तर उद्याचा भारत घडवणारी पिढी तणावमुक्त, एकाग्र व बलवान होईल.
प्रा. धनंजय शामराव देशमुख
(एम ए योगशास्त्र), अकलूज

0 टिप्पण्या