मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/06/2026 :
'कौतुक करणे' आणि 'नावे ठेवणे' या दोन पूर्णपणे परस्परविरोधी गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी करताना त्यांचा कुठेही अतिरेक होऊ नये, याची समाजात प्रत्येकानेच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
एखाद्याचे कौतुक करताना ते कधीही प्रमाणापेक्षा जास्त नसावे; कारण पात्रतेपेक्षा जास्त कौतुक झाले, तर संबंधित व्यक्तीवर त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच, आपण जेव्हा कोणाला नावे ठेवतो, म्हणजेच त्याचे दोष दाखवून देतो, तेव्हा ते दाखवण्याची पद्धत देखील नेहमी योग्य आणि सुसंस्कृत असावी.
विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत, योग्य कारणासाठी आणि योग्य प्रमाणातच त्यांचे कौतुक करावे; कारण अति कौतुकाने मुले बऱ्याचदा प्रमाणाबाहेर लाडावून जातात आणि त्यामुळे त्यांची अपेक्षित प्रगती खुंटते. याउलट, चारचौघांसमोर मुलांना सारखे अपमानित केले किंवा टोकले, तर त्यांचे मानसिक खच्चीकरण होते आणि त्यांचा आत्मविश्वास ढासळतो.
आजचा संकल्प
पालक म्हणून आपल्या पाल्याचे अति लाड करणे किंवा त्यांचा अति अपमान करणे, या दोन्ही गोष्टी मुलांच्या भविष्यासाठी चुकीच्या आहेत याचे आपण नेहमी भान ठेवूया. त्यांना सकारात्मक व योग्य पद्धतीने वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या