प्रिय पालकहो,

 प्रिय पालकहो,

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/06/2026 :

मुलांना जन्म देणे सोपे आहे, पण त्यांना योग्य संस्कार, चांगले शिक्षण आणि उत्तम चारित्र्य देऊन समाजासाठी आदर्श नागरिक घडवणे ही मोठी जबाबदारी आहे. आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल आहे, पण अनेकदा त्यांच्या मनात योग्य दिशा नसते. म्हणूनच पालक आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन मुलांचे भविष्य घडवणे काळाची गरज बनली आहे.

शाळेत मुलांना विद्यार्थी म्हणून पाठवा. घरातील प्रतिष्ठा, पैसा, राजकीय ओळखी, नातेवाईकांची मोठी नावे किंवा सामाजिक स्थान यांचा शाळेतील शिक्षणाशी काहीही संबंध नसतो. शाळेत प्रत्येक मूल हे फक्त विद्यार्थी असते आणि त्याचे मूल्यमापन त्याच्या वर्तन, शिस्त, अभ्यास आणि संस्कारांवर होत असते.

*मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी खालील बाबींकडे विशेष लक्ष द्या,*

◆मुलांची केशभूषा साधी, स्वच्छ व शिस्तबद्ध असावी.

◆महागडे बूट, कपडे, घड्याळे व दिखाऊ वस्तूंपासून दूर ठेवा.

◆शालेय गणवेशाबाहेरील अनावश्यक खर्च टाळा.

◆वह्या, पुस्तके आणि साहित्य आवश्यक तेवढेच घ्या.

◆मुलांना "अमुकचा मुलगा" म्हणून नव्हे तर "विद्यार्थी" म्हणून शाळेत पाठवा.

◆मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेम्सच्या अतिरेकी वापरापासून दूर ठेवा.

◆चुकीचे लाड, हट्ट आणि अवास्तव मागण्या पूर्ण करू नका.

◆मुलांच्या मित्रपरिवाराची माहिती ठेवा.

◆मुलं खरोखर शाळेत जातात का याची वेळोवेळी खात्री करा.

◆व्यसनाधीनतेच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष ठेवा.

◆प्रत्येक गोष्ट सहज मिळत नाही हे मुलांना समजू द्या.

◆पैशाचे महत्त्व आणि कष्टाचे मूल्य शिकवा.

◆गरजेपेक्षा जास्त पैसे मुलांच्या हातात देऊ नका.

◆मुलांना फक्त शिक्षित नव्हे तर सुशिक्षित बनवण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा.

◆दररोज किमान एक तास मुलांसोबत संवाद साधा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या.

◆चुकीच्या सहवासापासून मुलांना दूर ठेवा.

◆महिन्यातून किमान दोन वेळा शिक्षकांशी संपर्क साधा.

◆शिक्षकांचा आदर करायला मुलांना शिकवा आणि स्वतःही आदर्श घाला.

◆मुलांच्या प्रत्येक तक्रारीवर लगेच विश्वास न ठेवता सत्य जाणून घ्या.

◆शिक्षकांशी विनाकारण वाद घालू नका.

◆शिक्षकांची भूमिका समजून घ्या. त्यांचा उद्देश मुलांचे नुकसान नव्हे तर भविष्य घडवणे असतो.

प्रिय पालकहो, लक्षात ठेवा...

आज तुम्ही मुलांसाठी वेळ दिला नाही, तर उद्या आयुष्यभर त्यांच्यासाठी चिंता करण्याची वेळ येऊ शकते.

आज तुम्ही त्यांना संस्कार दिले नाहीत, तर उद्या समाज त्यांना शिक्षा देईल.

आज तुम्ही त्यांच्यावर प्रेमाने लक्ष ठेवले नाही, तर उद्या चुकीच्या लोकांचा प्रभाव त्यांच्यावर पडू शकतो.

आई आणि शिक्षक हे मुलाच्या जीवनातील दोन महान शिल्पकार आहेत. एक घरात संस्कार घडवतो तर दुसरा शाळेत व्यक्तिमत्त्व घडवतो. या दोघांच्या एकत्रित प्रयत्नातूनच एक जबाबदार, सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक निर्माण होतो.

चला तर मग, आपण सर्व मिळून आपल्या मुलांना चांगले माणूस, चांगले नागरिक आणि देशाचे जबाबदार भविष्य बनवूया.

मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार द्या, सुविधा पेक्षा शिस्त द्या आणि वस्तूं पेक्षा वेळ द्या.

आओ मिलकर स्कूल चले हम.

प्रा. विनायक वाडकर 

📞 9960026444

पुणे / कोल्हापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या