यशवंत क्रांतीच्या वतीने मेंढपाळांना ओळखपत्र वाटप
वृत्त एकसत्ता न्यूज
आष्टा / प्रतिनिधी : भटकंती करणाऱ्या मेंढपाळ यांच्याकडे मेंढपाळ असलेला कोणताही पुरावा नसल्याने त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची अडचण ओळखून यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने मेंढपाळाला ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. या सर्व मेंढपाळांना लवकरच शासनाची ओळखपत्र मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही यशवंत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी शुभ मंदिर येथे मेंढपाळ मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले. कार्यक्रमास सुभाष वगरे शाहुवाडी तालुका अअध्यक्ष, राजाराम हजारे शेंदूर शाखाध्यक्ष, भीमराव गावडे शाखा अध्यक्ष, बिरू अनुसे शाखाध्यक्ष वाठार , संदिप गावडे, तानाजी टकले यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
संजय वाघमोडे बोलताना पुढे म्हणाले की राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसाय हा पुर्णपणे स्थलांतरित पध्दतीने केला जातो. मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पाण्याच्या शोधात साधारणपणे माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासून भटकंती करीत असतात. भटकंती काळात मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पिण्याचे पाण्याच्या शोधात रानवाटेने, जंगलातून त्याच्या कुटुंबासमवेत स्थलांतरण करीत असतात व त्यांच्या मुळस्थानी पाऊस होऊन मेंढ्यांना चारा उपलब्ध झाल्यास साधारणपणे माहे जुन ते जुलै महिन्यामध्ये मेंढपाळ त्यांच्या मुळ ठिकाणी परत येतात. तर काही मेंढपाळ जास्त पावसाच्या प्रदेशातून कमी पावसाच्या प्रदेशात स्थलांतर करत असताना. मेंढी पालन हा व्यवसाय अवर्षण प्रवण भागामध्ये प्रामुख्याने केला जात असल्यामुळे काही भागात पाऊस फार अत्यल्प होत असतो अशावेळी पावसाळी हंगामामध्ये सुद्धा चारा उपलब्ध होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कित्येक मेंढपाळांची भटकंती ही वर्षभर सुरूच असते. भटकंती काळात मेंढपाळांच्या मुक्कामाचे ठिकाण लोकवस्तीपासून लांब रानामध्ये कुठेतरी असते, म्हणजेच त्यांचा संपर्क पशुवैद्यकीय दवाखान्याशी सहसा येत नाही तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या यंत्रणेला सुद्धा भटकंती काळामध्ये मेंढपाळापर्यन्त पोहचण्याकरिता अडचणी येत असतात. त्यामुळे मेंढपाळांच्या मेंढ्यांमध्ये आजार उद्भवल्यास त्यांच्या पर्यन्त पशुवैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध होत नाही व यामुळे मेंढयामध्ये मोठ्या प्रमाणात मरतुक होऊन मेंढपाळांचे आर्थिक नुकसान होते.
भटकंतीच्या काळात मेंढपाळांना चाऱ्याच्या शोधाकरिता फार हालअपेष्टा सोसाव्या लागतात. भटकंती काळात खरीप हंगामामधील शेतकऱ्यांच्या शेती मधील पीक काढल्यानंतर जे पिकांचेअवशेष शिल्लक राहतात त्यामध्ये चराई करून मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यांचे पोट भरतात.
अशा परिस्थितीमध्ये मेंढपाळांकडे ते स्वत मेंढपाळ असल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यामध्ये गैरसमज निर्माण होतो व त्यामुळे मेंढपाळ आणि स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होऊन स्थानिक गावकऱ्यामार्फत 'भटकंतीकरीत असलेल्या मेंढपाळांना मारहाण होत असल्याच्या घटना वारंवार उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बरेच ठिकाणी भटकंती करिता असताना मेंढपाळ असल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नसल्याने त्यांना चोर समजून मारहाण करण्यात येते. यामध्ये मेंढपाळांकडे मेंढपाळ असल्याची ओळख नसल्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणे मार्फत सुद्धा मेंढपाळांना सुरक्षा देण्याकरिता टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते. यासोबतच मेंढपाळांकडे ते स्वतः मेंढपाळ असून मेंढ्यांच्या चाऱ्याकरिता भटकंती करीत असल्याचा कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे त्यांना भटकंतीमार्गावरील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुवैद्यकीय सुविधा, वन विभागामार्फत जंगली प्राण्यापासून संरक्षण, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य सुविधा तसेच पोलीस यंत्रणेमार्फत संरक्षण इत्यादी सुविधा मिळवतांना मेंढपाळांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. याकरिता मेंढपाळांना ते स्वत भटकंती करणारे मेंढपाळ असल्याचा पुरावा म्हणून त्यांना ओळख-प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
राज्यातील मेंढपाळांना ओळखपत्र देण्याबाबत यशवंत क्रांती संघटनेचे माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून जे मेंढपाळ यशवंत क्रांती शी जोडले गेले आहेत त्यांना यशवंत क्रांती च्या वतीने ओळख पत्र देण्यात येत आहेत..
कार्यक्रमास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ बहुसंख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या