क्यो मरने घबडाता बंदे, मरना एक खुशाली है !


क्यो मरने घबडाता बंदे, मरना एक खुशाली है !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/06/2026 :

मृत्यू हे सृष्टीचे एक अंतिम आणि अटळ सत्य आहे. जन्म घेतलेल्या प्रत्येक सजीवाला केव्हा ना केव्हा मरण हे अटळ आहे. निसर्गाच्या या चक्राला कोणीही बदलू शकत नाही. मृत्यूच्या या सत्यामुळेच माणसाला जीवनाचे खरे महत्व आणि सार्थकता समजून घेता येते. मृत्यू हा येतोच हे माहित असताना आपण एवढी ओढाताण का करतो? मृत्यूची वाट पाहणे हे आपल्या आयुष्याचा अर्थ असू शकत नाही. आयुष्य जगायला एक ध्येय असते. उदाः- एका राजाला झोपेत असताना स्वप्न पडले. त्याला त्याचा मृत्यू दिसला. त्या मृत्यूने राजाला महिना, तारीख, वेळ सांगितली आणि याच दिवशी तुला मी घ्यायला येईल. राजा सकाळी उठून सर्व मंत्री, प्रधानजी यांना बोलावून सभा भरविली. राजाने घडलेली हकीकत सर्वाना सांगगितली. त्यावर एक प्रधानजी म्हणाला, आपल्याकडे वेगवान घोडा आहे, त्यावर कोणालाही न सांगता गुपचूप हे राज्य सोडुन दूर एका सुरक्षित ठिकाणी काही दिवस आश्रय घ्यावा. राजा घोड्यावर स्वार झाला आणि घोडा वेगाने निघाला. पूर्ण दिवस निघून गेला. राजा कुठेही मुळीच थांबला नाही. रात्रीच्या समयी एका नदीच्या काठावर येऊन तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी गेला असता तिथे त्याचा मृत्यू आला आणि म्हणाला हे राजा तू येवढी मेहनत घेऊन येथे आला, तुझा मृत्यू याच समयाला होता. मृत्यूपासून कोणी पळू शकत नाही. म्हणून मृत्यूला न घाबरता सामोरे गेले पाहिजे.

क्यो मरने घबडाता बंदे |

मरना एक खुशाली है |

सुख की निंद लगेगी मीठी |

दुनिया मरनेवाली है ||टेक||

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हे मानवा तू मरणाला का घाबरतोस? मृत्यू तर एक प्रकारचा आनंद (सुखद स्थिती) आहे. त्यामुळे तुला सुखाची आणि शांत झोप लागेल. कारण ही दुनिया तर नश्वर आहे. येथे प्रत्येकाला एक दिवस मरावचं लागते. मृत्यू हा काही दुःखाचा क्षण नसून ती एक खुशहाली आहे. जीवन जगताना माणसाला सतत संघर्ष करावा लागतो, म्हणूनच मृत्यूच्या कवेत गेल्या नंतरच सर्व संकटे संपून जीवनाला चिरंतन शांती लाभेल आणि सुखद व गाढ झोप लागेल.

बिना मरे चैन कहाँसे?

जीना ही दुखदायी यहाँ |

उछल उछल कर जी घबडाये |

कहीं न शांती कहाली है ||1||

            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मृत्यू शिवाय कुठेही शांती किंवा समाधान मिळत नाही. कारण जीवंतपणी केवळ सांसारिक मोह-माया आणि दुःखाचाच अनुभव येतो. मन सतत अस्वस्थ होऊन सैरभैर होते आणि या धकाधकीत कुठेही मनाला  शांती मिळत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुविचार स्मरणी मध्ये म्हणतात, "मृत्यू हा मनुष्याला त्याच्या चांगल्या वा वाईट इच्छेच्या कार्याकरिता ताजातवाना करुन देणारी विश्रांती आहे. म्हणूनच ज्ञानी लोक मृत्यूला आपली शुभ वेळ समजतात."

काम-क्रोध, मद-मत्सर, माया |

जी भर जाल बिछाया है |

बिन झंझट एक पल नहीं जाये |

नाहक की ही हमाली है ||2||

           राष्ट्रसंत म्हणतात, कामवासना, क्रोध, मद म्हणजे अहंकार, मत्सर म्हणजे ईर्षा आणि माया (संसाराचे खोटे आकर्षण) यांनी मिळून हे मानवी जीवनाचे जाळे विणले आहे. या विकारामुळे माणसाला एका क्षणाचीही शांतता लाभत नाही. हा सगळा खटाटोप केवळ व्यर्थ आणि निरुपयोगी मेहनत (हमाली) आहे.

गर जीना ही है हमको |

कुछ जीने जैसा काम करो |

अलग रहे, सुख-दुख को छोडे |

साक्षी रहे वनमाली है ||3||

            राष्ट्रसंत म्हणतात, मानवी जीवन केवळ खाणे-पिणे आणि जगणे इतकेच मर्यादित नाही. जर खऱ्या अर्थाने जीवन जगायचे असेल तर परोपकार, भक्ती किंवा चांगले कर्म केले पाहिजेत. जेणेकरून आपले जीवन सार्थकी लागेल. संसारातील सुख-दुःख या दोन्ही गोष्टीचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. सांसारिक मोह (माया) आणि द्वंव्द (लाभ-हानी, मान-असन्मान) यामधून वेगळे राहण्याचा प्रयत्न करा. वनमाली म्हणजे वनांची माळा धारण करणारे भगवान श्रीकृष्ण. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार ते स्वतः आहेत. त्यामुळे सर्व चिंता भगवंतावर सोपवून आपण फक्त साक्षीभावाने आपले कर्तव्य करत राहावे.

जीते जी मरना जो जाने |

उसको तो है मौज यहाँ |

तुकड्यादास कहे नहीं तो फिर |

फोकट की ही दलाली है ||4||

           येथे मरणाचा अर्थ शारीरिक मृत्यू असा नाही, तर आपल्या मनातील मीपणा, माझे, राग, लोभ, वासना यांचा त्याग करणे होय. जेव्हा माणूस जिवंतपणी स्वतःच्या अहंकाराचा बळी देतो म्हणजेच मी काहीतरी वेगळा आहे हा भाव विसरून सर्वाभूती भगवंत मानून जगतो. तेव्हा त्याला जीवनातील नश्वर आनंद प्राप्त होतो. अहंकार आणि स्वार्थ संपल्यामुळे मनुष्य निरिच्छ आणि निष्पाप बनतो. त्याला कोणत्याही गोष्टीची हाव किंवा चिंता उरत नाही. हा आंतरिक शांततेचा व समाधानाचा आनंद केवळ जिवंतपणी अहंकार संपवणाऱ्यालाच मिळते. जर एखाद्याने फक्त वरवर संतत्व धारण केले, भजने केली किंवा आपण खूप मोठे भक्त किंवा ज्ञानी असल्याचा आव आणला, परंतु आतमध्ये स्वार्थ, अहंकार आणि लोभ तसाच शिल्लक राहिला तर ती केवळ फुकटची दलाली किंवा दिखाऊगिरी ठरते. अशी भक्ती किंवा कर्म व्यर्थ असते आणि हे देवाला अजिबात मान्य नसते.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर

(व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त)

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- 9970404180

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या