🔵 आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे - पालकमंत्री जयकुमार गोरे 🟢 आषाढी वारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली विविध ठिकाणांची पाहणी


🔵 आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला  प्राधान्य द्यावे -            पालकमंत्री जयकुमार गोरे

🟢 आषाढी वारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली विविध ठिकाणांची पाहणी

वृत्त एकसत्ता न्यूज     

पंढरपूर (दि.२८):-आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी असून, या यात्रा सोहळ्यानिमित्त  श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत प्रशासनाने वारकरी भाविकांना  पायाभूत सुविधा देण्याबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

  आषाढी वारी 2026 अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखीतळ, 65 एकर व वाळवंट येथे पाहणी केली, त्या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी  जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार,पोलिस उप विभागीय अधिकारी प्रशांत डगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, अन्न धान्य पुरवठा अधिकारी ओंकार पाडोळे, वीज वितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

     यावेळी  पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले,  गतवर्षी आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाने वारकरी भाविकांसाठी यात्री पालखीतळ, भक्ती सागर (65 एकर), येथे चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्याचप्रमाणे आताही चांगल्या व अधिकच्या सुविधा उपलब्ध कराव्यात.  वाखरी पालखी तळावर कायम असणाऱ्या शौचालय परिसरात काँक्रिटीकरण करून घ्यावे. पालखी तळावरील खड्डे बुजवावेत तसेच मुरमीकरण करून सपाटीकरण करावे. प्रकाश व्यवस्था करावी. पालखी तळावर पाणी साठू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

     कॉलेज चौकातील पुलाचे काम अपूर्ण असून ते तात्काळ पूर्ण करावेत सदरच्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडाराड पडल्याने अपघात होण्याची शक्यता असून, संबंधित ठेकेदाराने ते काम तात्काळ व वेळेत पूर्ण करावे. अन्यथा  संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच ते काम करण्यासाठी कार्यक्षम ठेकेदार नेमून तात्काळ पूर्ण करावे. शहरातील रस्ते व डिव्हायडर स्वच्छ करावे. आवश्यक ठिकाणी डिव्हाइडरला रंगकाम करावे.  आषाढी यात्रेत भाविकांच्या मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता केली असून, जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी  सर्व सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. सरगम चौकातील पुलाखालून वाळवंटापर्यंत रस्ता नगरपालिकेने करावा.  65 एकर येथे स्वच्छता, पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, वैद्यकीय सुविधा उपलब्धता बरोबर स्वच्छता ठेवावी. चंद्रभागा पत्राच्या काठावरील काटेरी झाडे झुडपे काढावीत तसेच मातीचे  ढिगारे काढून सपाटीकरण करावे अशा सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी दिल्या.

     यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखीतळ,  भक्ती सागर (६५ एकर), चंद्रभागा नदीपात्र येथील पाहणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या