क्यो करता शैतानी? करेगा वही भरेगा तू..!

 क्यो करता शैतानी? करेगा वही भरेगा तू..!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 21/06/2026 :

मानव जीवन खरोखरच एक अनमोल आणि सुंदर भेट आहे. आपल्या आयुष्यातील सुख दुःख, अनुभव आणि मानवी नातेसंबंध हे या प्रवासाला अर्थपूर्ण बनवतात. प्रेम, मैत्री आणि आपुलकी हे मानवी जीवनाचे सर्वांत मोठे धन आहे. जीवनात येणारे संकट आपल्याला एक नवीन धडा शिकवते आणि आपल्याला अधिक मजबूत बनवते. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तुम्हाला ते चांगल्या मार्गाने जगता यायला हवे. जनावर सुद्धा जगतात. मनुष्य जन्म मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. मग आपण वाईटाचा विचार न करता, अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग स्विकारावा. जीवन सुंदर बनविण्यासाठी कृतज्ञता बाळगा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, चांगल्या सवयी जोपासा, ध्येयावर लक्ष केंद्रित करा.

क्यो करता शैतानी? कितनी है जवानी तेरी?

खोल आँखे खोल, सीधा होगा की नही ||टेक||

            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जवानीचा तोरा मिरवत फिरणाऱ्या तरुणास म्हणतात, तू का मस्ती (खोड्या) करत आहेस? जवानीच्या भरात तू काहीतरी त्रासदायक किंवा खोडकर गोष्टी करत असतोस. जवानीत अंगात उत्साह, जोश भरल्यामुळे अहंकाराने वागतोस. तुझ्या जवानीचा जोश किती आहे? आतातरी डोळे उघड, जागे हो, नीट वागणार आहेस की नाही? डोळे उघडून वास्तवाकडे बघ आणि शहाण्या सारखा नीट वाग, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी सज्जड दमदाटी महाराज तरुणांना या ओवीतून करतात.

चलते किसके बहुबेटीका, क्यो अपमान करेगा तू?

याद नही आती है तुझको, करेगा वही भरेगा तू ||

पकडाही तो जाये, सरपे डंडा खाये तू |

खोल आँखे खोल ||1||

          राष्ट्रसंत म्हणतात, दुसऱ्यांच्या घरच्या स्त्रियांचा, मुलींचा अपमान करण्याचे धाडस कोणी कसे करु शकते? व्यक्तीने स्त्रियांचा किंवा मुलीसुनांचा अपमान करणे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे. समाजातील सर्वांनी प्रत्येक स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे. महाराजांनी कर्माच्या सिद्धांतावर जोर दिला आहे. जर कोणी वाईट कृत्य केले, अपमान केला तर निसर्गाच्या नियमानुसार त्याला भविष्यात स्वतःच्या त्या कर्माचे वाईट परिणाम भोगावेच लागतात. असे वाईट कृत्य करतांना शेवटी तू पकडला जातो आणि डोक्यावर फटके (मार) तुला खावे लागतात. बऱ्याचदा अज्ञानामुळे, चुकीच्या संगतीमुळे किंवा आंधळेपणाने केलेल्या कृतीमुळे माणूस संकटात सापडतो. हे मानवा! आतातरी डोळे उघड, स्वतःचे भले-बुरे काय आहे ते ओळख आणि अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर ये.

यही है क्या शिक्षण पानेका, आज नतीजा आया |

गुरुओंपरभी छुरा निकाले, पास कराने लाया है ||

वाहरे तेरी बानी, यही करे जिंदगानी |

खोल आँखे खोल ||2||

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आजच्या परीक्षेत किंवा निकालामध्ये विद्यार्थी जे वर्तन करतात ते समोर आले आहे, ते पाहून शिक्षण व्यवस्थेवर आणि संस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्वीच्या काळी शिक्षकाला गुरु मानले जायचे परंतु आजचे विद्यार्थी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा अपयशाच्या रागातून शिक्षकांवरच खंजीर किंवा सुरा उपसत आहेत, ही अतिशय दुदैवी आणि संतापजनक गोष्ट आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ पास होणे किंवा पदवी मिळवणे नसून एक चांगले नागरिक बनणे हा आहे. मात्र आजच्या पिढीत आदर आणि नैतिकतेचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे. वाहरे तुझी वाणी (शद्ब आणि विचार) किती चमत्कारिक आहे. याच वाणीमुळे तुझी संपूर्ण जिंदगी (जीवन) घडत आहे. आपण चांगले बोलतो, चांगले विचार करतो तसे जीवन आनंदी बनते. वाणी वाईट असेल तर आयुष्य दुःखाने भरुन जाते. मनुष्य आपल्या बोलण्याने आणि वागण्याने स्वतःचे आयुष्य घडवतो किंवा बिघडवतो. अज्ञानाचा पडदा दूर करुन आत्मपरीक्षण कर आणि जागे हो. मानवाने मोहात, लोभात आणि सांसारिक दुःखात अडकून न राहता, ईश्वरी भक्ती आणि सत्संगाव्दारे जीवनाचे खरे सत्य समजून घेतले पाहिजे.

कष्ट नही करता है जाकर, जेब काटना सीखा है |

समय निकल जायेगा, होगा जीवन तेरा फीका है ||

किसकी संगत पाये, सारा जनम गमाये तू |

खोल आँखे खोल ||3||

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कष्ट न करता दुसऱ्यांची फसवणूक (खिसे कापणे) तू शिकला आहेस. जर अशीच वेळ निघून गेली तर तुझे संपूर्ण आयुष्य निरर्थक बनेल. वाईट संगत धरुन तू आपले संपूर्ण जीवन वाया घालवले आहेस. चुकीच्या मार्गाने (उदा- चोरी) मिळवलेले यश टिकत नाही. आयुष्यात चांगल्या लोकांसोबत राहणे गरजेचे आहे. डोळे उघडे ठेवुन सत्याची जाणीव करुन घ्यावी. आळस आणि वाईट मार्ग सोडून वेळीच सावरण्याचा सल्ला महाराज देतात.

दिनदहाडे गुंडागर्दी करके, धूम मचाता है |

बिना टिकटके रेलपे चढता, शराब पीये रहता है ||

तुकड्या बात सुनाये, कैसा भला कराये तू?

खोल आँखे खोल ||4||

            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, व्यक्ती दिवसाढवळ्या दादागिरी किंवा गुंडगिरी करुन तो कोणालाही न जुमानता परिसरात दहशत निर्माण करतो आणि नियमबाह्य वागतो. तो रेल्वेगाडीत तिकीट न काढता फुकट प्रवास करुन रेल्वेच्या नियमाचे उल्लघन करतो आणि नेहमी दारुच्या किंवा मद्याच्या नशेत राहून बेजबाबदार वर्तन करतो. हे ईश्वरा मनुष्याचे खरे भले (कल्याण) कसे होणार? तो चांगल्या मार्गाला कसा लागणार? संतांचे विचार स्वतःच्या आचरणात आणत नाही. तोपर्यंत त्याचे जीवन सुधारणार नाही. स्वतःचे खरे कल्याण साधण्यासाठी मानवाने डोळे उघडून वास्तवाकडे पाहण्यास महाराज सांगतात.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर

(व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त)

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- 9921791677

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या