आमचा देश शहाणा ; आम्ही मात्र मुर्ख?

 

आमचा देश शहाणा ; आम्ही मात्र मुर्ख?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/06/2026 :

*आज परिसरात फिरतांना इंग्रजांनी बांधलेल्या इमारती दिसल्या. त्यातच कोणीतरी म्हणालं की किती सुंदर स्थापत्य. जे स्थापत्य आज कितीतरी दिवस झाले तरी टिकून आहे. नाहीतर आपलं बांधकाम. आपल्या हयातीतच आपलं बांधकाम पाडावं लागतं. कारण आपल्या हयातीपर्यंत आपण बांधलेलं घर जीर्ण होतं. याला कारण काय? खरंच आपल्याला फक्त समृध्द स्थापत्य इंग्रजांच्याच काळातील दिसतं का? त्यापुर्वीचं दिसत नाही काय? त्यापुर्वीही आपल्या भारतात स्थापत्य कला अस्तित्वात होती. ज्यात खजुराहोतील मंदिराचं बांधकाम आजही तेवत आहे. अजिंठा, वेरुळ, एलिफंटा येथील लेणी आजही शाबूत आहेत. ग्या स्थापत्याला कितीतरी वर्ष झाली. त्यातच महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रज वा मुस्लिमांच्या काळातीलही बांधलेल्या इमारती या भारतातीलच तंत्रज्ञानीच बांधल्या. इतरांनी बांधल्या नाहीत. हेही कोणी विसरु नये.*

          भारत...... भारत माझा देश आहे. असे आपण सर्वजण म्हणतो. तसा भारत हा सुजलाम व सुफलाम आहे. तो आज सृजलाम सुफलाम झालेला नाही, तर तो आधीच सृजलाम सुफलाम झालेला आहे. त्याचं कारण येथील संशोधन. या भारतात कितीतरी वर्षापुर्वी समृद्ध अशी संस्कृती होती. ज्या संस्कृतीत हडप्पा आणि मोहेंजोदारो ही शहरे होती व ती शहरे समृद्ध अशी होती. आज ती शहरे पाकिस्तानात आहेत. याचाच अर्थ भारत हा स्थापत्यशास्त्रात पारंगत होता. असे म्हणायला काहीच हरकत नाही. एवढंच नाही तर पुर्वीच्या काळात भारतात वसलेल्या चंवर, चोल, चंदेल, होयसळ, वर्धन, गुप्त, मौर्य या सर्वच घराण्यांनी ज्या वास्तूंचं स्थापत्य केलं. त्या इमारती त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्यकलेची आज साक्ष देतात. याचाच अर्थ भारत हा काल म्हणजे अगदी प्राचीन काळापासून समृद्ध होता. एवढंच नाही तर हा भारत त्या काळात सोन्याचं व चांदीचं नाणं त्या काळात व्यवहारात वापरत होता. हा झाला व्यवहार व स्थापत्यकलेचा भाग. आजही अजिंठा व वेरुळची लेणी पाहिली तर असं दिसतं की आपला भारत त्याही काळात आजच्या काळापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात समृद्ध होता. कारण आज आपण बांधलेली इमारती या आपल्या हयातीपर्यंतही टिकत नाही. त्या इमारतीच्या बांधकामातून कोणाला क्षती पोहोचू नये म्हणून त्या इमारती पाडाव्या लागतात. परंतु पुर्वीच्या काळातील बांधलेल्या  इमारती या आजही चांगल्या पद्धतीनं डौलात उभ्या आहेत. याचाच अर्थ आजच्यापेक्षा त्या काळातील लोकं हे आजच्या लोकांपेक्षा स्थापत्यशास्रात पारंगत होते. 

          भारत ज्याप्रमाणे स्थापत्यशास्त्रात पारंगत होता. त्याच अनुषंगाने भारताला ग्रंथाचा समृद्ध वारसा व इतिहास लाभला होता. इथं एवढ्या विपूल प्रमाणात ग्रंथनिर्मीती घडली होती की जे ग्रंथ अभ्यासायला नव्हे तर त्याच ग्रंथाचा अभ्यास करायला विदेशी लोकं यायचे. हे चीनवरुन भारतात अभ्यासासाठी आलेल्या फाहियान व ह्युएनत्संग या लोकांवरुन लक्षात येतं. त्यांनी येथूनच कितीतरी ग्रंथ अभ्यासासाठी आपल्या देशात नेलं. त्यातच त्याही पुर्वी भारताचा समृद्ध इतिहास पाहण्यासाठी आलेला ग्रीक व्यक्ती मेगस्थनीस याने येथीलच ग्रंथांचा अभ्यास करुन त्याचं ज्ञान आपल्या देशात जावून जगाला दिलं. दुसरी महत्वपुर्ण गोष्ट ही की हा झाला ग्रंथनिर्मितीचा इतिहास. हाच समृद्ध वारसा नष्ट करण्यासाठी नालंदा विद्यापीठ जाळण्यात आलं. त्याला कारणं काहीही असो. ते विद्यापीठ सहा महिनेपर्यंत जळत होतं. ज्यातून कितीतरी ग्रंथ जळले. जर ते ग्रंथ असते तर आपला भारत किती समृद्ध होता. हे आजच आपल्या लक्षात आलं असतं.

         भारत हा पुर्वीपासूनच समृद्ध होता. ज्यात स्थापत्य आणि समृद्ध ग्रंथच नाही तर त्या काळात झालेले सुश्रूत व चरक औषधशास्राचे जनक. जे त्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या शस्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध होते. शुन्याचा शोध लावणारे शास्रज्ञ याच देशात होते. त्यातच खगोलीय संकल्पना मांडणारे शास्रज्ञ याच देशात होवून गेले. या देशात झालेला आर्यभट्ट, याने खगोलीय घटना व त्या संदर्भातील संकल्पना अगदी त्याच काळात मांडल्या. 

         आपला भारत समृद्ध होता. परंतु आपण त्या गोष्टी मान्य करीत नाही आज. कारण आज आपण कळसुत्री बाहुल्यासारखे वागतो. आपण आपला समृद्ध इतिहास विसरलेलो असून आजच्या काळात आपण दुसऱ्यावर अवलंबून असल्यासारखेच दाखवतो. आजच्या काळात आपली त्या काळजी भाषा ही जरी समृद्ध असली तरी तिला पाहिजे तेवढ्या प्रमाणात महत्व न देता आपण परकीय भाषेला महत्व देतो. आम्ही आमचा समृद्ध इतिहास विसरलेलो असून आपल्याला आपल्याच भारतातील आर्यभट्ट, वराहमिहिर, चार्वाक, शुश्रूत आठवत नाहीत. याचाच अर्थ आज आपण स्वतः खूप बुद्धू झालो आहोत. असं मानायला हरकत नाही. याबाबतीत एक लेख नव्हे तर कथानक व्हाट्सअपवर फिरत आहे.

          एका गावात एका व्यक्तीकडे एकोणवीस उंट होते. एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली. त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले. ज्यामध्ये असे लिहिले होते की, 'माझ्या एकोणवीस उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, एकोणवीस उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि एकोणवीस उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.' अर्थात ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला. एकोणवीस उंटापैंकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल. त्यात एक कट झाला म्हणजे अठरा बाकी राहीले. त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात.  मग सगळेच खूप गोंधळले होते. तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले. तो शहाणा त्याच्या उंटावर बसून आला. समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला. मग म्हणाला ठिक आहे या एकोणवीस उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या. प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा. जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे. तो म्हणतो की त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या. तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही. असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला. आता एकूण उंट १९+१=२० झाले. वीस उंटापैकी अर्धे मुलाला दिले. उरले दहा उंट. वीस उंटापैकी एक चतुर्थांश  हिस्सा मुलीला म्हणजे पाच उंट तिला दिले. वीस उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे चार उंट नोकराला दिले. असे एकूण १०+५+४=१९ होतात. त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता. तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला. अशा प्रकारे एक उंट मिसळल्या नंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या एकोणवीस उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले. 

          आपल्या सर्वांच्या आयुष्यातही एकोणवीस उंट आहेत. पाच ज्ञानेंद्रिये. अर्थात डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा. पाच कर्मेद्रिंये. जसे, हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुद्द्वार.  पाच पंचप्राण. जसे, व्यान, समान, अपान, उदाम व प्राण आणि कार अंतःकरण चतुष्टय. जसे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. असे एकूण एकोणवीस उंट आहेत.

          माणूस आयुष्यभर या एकोणवीस उंटांच्या वाटणीत अडकून राहतो. आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात  "मित्र" रुपी उंट त्यात जोडा. अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा "मित्र" रूपी उंट सोबत ठेवा. जोपर्यंत मित्र रुपी उंट आपुल्या आयुष्यात जोडत नाही. तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाहीत.

          हा व्हाट्सअपवरील मेसेज.  यात आपल्याला ज्याप्रमाणे आधी एकोणवीस उंट वाटताच येत नव्हते. त्यासाठी ज्ञानी माणसांची गरज पडली. अशाप्रकारची ज्ञानी माणसं त्या काळात होती. परंतु तद्नंतर आलेल्या शासकांनी भारताची समृद्ध असलेली संस्कृती नालंदा नावाच्या विद्यापीठातील आपल्याच पुस्तकाना जाळून टाकून आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हे तर केलाच. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

           आज त्याच नालंदानंतर आपण खऱ्या अर्थानं गुलाम झालो. आपण आपला समृद्ध इतिहास विसरलो. तथाकथित शासकानं आपल्यालाच केवळ शरीरानं गुलाम केलं नाही तर आपल्याला मानसिकरित्याही गुलाम केलं. ज्यातून आज आपल्याला आपली भाषा, आपली संस्कृती, आपले त्याकाळातील डॉक्टर, आपले त्याकाळातील शास्रज्ञ फोल वाटतात. त्यातच आपण त्या काळातील आपली स्थापत्यकला विसरतो. एवढंच नाही तर अलिकडील काळातील शिवाजी महाराजांच्या काळातील स्थापत्यकला, आपल्याच भारतातील हिरोजी इंदूरकर विसरतो. अन् इंग्रजांच्या आपल्या भारतीय स्थापत्यकलेला मानतो. त्यांच्या विद्यापीठांना महत्व देतो. तिथं शिकायला जातो. तिथंच नोकरी करायला जातो. त्यातच आपण आपल्याच भारतातील मुस्लिम शासकांच्या स्थापत्य कलेला मानतो. म्हणतो की त्यांनी किती जोरदार बांधकामं केली. जी बांधकामं आजही टिकून आहेत. जसा, आग्ऱ्याचा ताजमहाल, कुतुबमिनार, जामा मशिद. म्हणतात की किती सुंदर स्थापत्य कला. इंग्रजांच्याही स्थापत्य कलेची प्रशंसा करतो. म्हणतो की किती सुंदर स्थापत्य. परंतु हे सगळं बांधकाम ज्या कोणत्या अभियंत्यानं केलं. तो भारतातीलच होता. 

          महत्वाचं सांगायचं झाल्यास आज आमचा भारत महान असतांना व आम्ही भारतातीलच रहिवाशी असतांना आणि आमची संस्कृती महान असतांना आपण स्वतःला मुर्ख का मानावं? मुर्ख का समजावं? दुसऱ्याची संस्कृती का स्विकारावी? त्यांच्या संस्कृतीला महान का समजावं? हे अनुत्तरीत प्रश्न आहेत. याचाच अर्थ आमचा देश जरी शहाणा असेल तरी आम्ही स्वतः मुर्ख आहोत. हे दिसून येते.

   विशेष म्हणजे आम्ही मुर्ख नाही. आमचा जर देश शहाणा आहे तर.......त्यामुळंच कोणीही स्वतःला मुर्ख समजू नये. मानू नये नव्हे तर देशाच्या समृद्धतेचा वारसा जोपासावा. म्हणजेच आमचा देश त्यावेळेस जसा महान होता. तसाच आजही करता येईल यात शंका नाही. आमचा देश महान आहे आणि तेवढाच समृद्ध सुद्धा आहे. तशीच आमची भाषा महान आहे. तेवढीच समृद्धही आहे, यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे, नागपूर. ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या