कल्पसार प्रोजेक्ट
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/06/2026 :
समुद्राच्या छातीवर ६० किलोमीटर लांब भिंत बांधून तब्बल ७ हजार ८०० दशलक्ष घनमीटर गोड्या पाण्याचा महाकाय तलाव तयार करणं शक्य आहे का? भारताचे शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स आता निसर्गाच्या नियमांनाच आव्हान देणारा असा एक अद्भूत चमत्कार प्रत्यक्षात आणत आहेत.
मी बोलतोय गुजरातमधील खंबायतच्या आखातात आकारास येत असलेल्या कल्पसार प्रोजेक्टबद्दल. कल्पसार म्हणजेच कल्प सरोवर, ज्याचा अर्थ आहे मानवाच्या भविष्यातील सर्व गरजा पूर्ण करणारे विस्तीर्ण सरोवर. तब्बल १ लाख ३३ हजार २४६ कोटी रुपयांचा हा महाप्रकल्प केवळ भारताचाच नव्हे, तर जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित गोड्या पाण्याच्या तलावांपैकी एक ठरणार आहे.
पण समुद्राच्या खाऱ्या पाण्यात हे गोडं पाणी येणार कुठून? हेच तर या प्रोजेक्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. साबरमती, मही, धाढर आणि नर्मदा या नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारे कोट्यवधी लिटर पाणी अडवून ते या विस्तीर्ण जलाशयात साठवले जाईल. या प्रकल्पामुळे सौराष्ट्र आणि मध्य गुजरातमधील पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे मिटणार आहे.
पण विचार करा, भर समुद्रात एवढी मोठी भिंत कशी टिकून राहील? समुद्राच्या महाकाय लाटांसमोर हे बांधकाम कसे सुरक्षित राहणार?
या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते नेदरलँड्स या देशाच्या एका ऐतिहासिक प्रयोगात. नेदरलँड्सने अशाच प्रकारे समुद्रात अफस्लुइटडिजक नावाचा महाकाय डॅम यशस्वीपणे बांधला होता. त्यांच्या याच प्रगत तंत्रज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा घेण्यासाठी भारताने नेदरलँड्ससोबत थेट सहकार्य करार केला आहे. डच तंत्रज्ञान आणि भारतीय शास्त्रज्ञांची जिद्द एकत्र येऊन हा चमत्कार घडवत आहे. याच कारणासाठी पंतप्रधान मोदींनी नुकतीच नेदर्लंड्सला भेट दिली होती.
या आधी नर्मदा डॅम प्रोजेक्ट म्हणजेच सरदार सरोवर प्रकल्पामुळे गुजरातचा कायापालट कसा झाला, हे आपण सर्वांनी पाहिलेच आहे. नर्मदा प्रकल्पामुळे लाखो शेतकऱ्यांना पाणी मिळाले आणि दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम झाला. आता कल्पसार प्रकल्प तर या क्रांतीला पुढच्या पातळीवर घेऊन जाणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १०.५४ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा थेट फायदा होईल.
गोड्या पाण्याचा साठा तर होईलच, पण तुम्हाला माहित आहे का या ६० किलोमीटर लांब बांधावरून काय काय धावणार आहे?
या महाकाय बांधावर चक्क १६ पदरी हायवे आणि ४ पदरी रेल्वे कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. यामुळे सौराष्ट्र आणि मुख्य गुजरात मधील प्रवासाचे अंतर तब्बल २४० किलोमीटरवरून थेट ६० किलोमीटरवर येणार आहे. म्हणजे पैशांची आणि वेळेची प्रचंड बचत. तसेच पूर नियंत्रण आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठीही या प्रकल्पाचा मोठा उपयोग होणार आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी या प्रकल्पात एक खास बदल करण्यात आला आहे. नवीन डिझाइननुसार नर्मदा नदीचे मुख या जलाशयाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे, जेणेकरून पुराचे अतिरिक्त पाणी आणि गाळ थेट समुद्रात जाईल व धरणाची क्षमता वर्षानुवर्षे टिकून राहील.
भारताच्या विकासाला एक नवी दिशा देणारा हा कल्पसार प्रकल्प २०२८ मध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होऊन २०३५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून थेट देखरेख होत असलेला हा प्रकल्प भारताच्या आधुनिक इंजिनिअरिंगचे एक सुवर्णपान ठरणार आहे, यात शंकाच नाही.
अशा या महाकाय आणि अद्भूत राष्ट्रीय मिशनबद्दल तुम्हाला काय वाटते? आपल्या देशातील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्सच्या या क्षमतेबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
©️संतोष कारखानीस

0 टिप्पण्या