li.आनंदी°जीवनाचा°मंत्र.il

 

li.आनंदी°जीवनाचा°मंत्र.il

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 14/05/2026 :

आयुष्य क्षणभंगुर, अनिश्चित, कधी आनंदाने तर कधी दुःखाने भरलेलं. प्रत्येकाच्या वाट्याला चिंता, वेदना, संघर्ष येतातच. पण या सगळ्यातून एक प्रश्न कायम उभा राहतो आपण आनंदी कसे राहू शकतो.

कदाचित उत्तर फार मोठं नाही, ते खूप साधं आहे. जसं आहे तसं आयुष्य स्वीकारायचं. वांझोट्या चिंतांना मनात जागा द्यायची नाही. कारण शेवटी, आपल्या हातात किती आहे.?

मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, हे कळलं की आयुष्य हलकं वाटायला लागतं. मग उगीच राग, द्वेष, अहंकार का बाळगायचा,

सगळ्यांशी मैत्री ठेवायची, रागाला दूर ठेवायचं आणि आवश्यक तेथे तडजोड शिकायची. मोठ्या स्वप्नांच्या ओझ्याखाली दबून जाण्यापेक्षा, छोट्या छोट्या क्षणांत आनंद शोधायचा. आयुष्याचे तुकडे करून जगायचं.

"आजचा दिवस, आजचा आनंद".

नेहमी विद्यार्थी राहायचं, शिकत राहायचं, चुका मान्य करून सुधारत राहायचं.

हसणं, विनोद, साधा नमस्कार हीच खरी जादू आहे आयुष्यातली. गंभीरतेच्या ओझ्यापेक्षा हलकं मन जास्त सुंदर असतं.

दुःख टाळता येत नाही. मग त्याच्याशी लढण्यापेक्षा त्याला स्वीकारायचं, त्याच्याशी मैत्री करायची. एकदा का सवय झाली की, तेही जड वाटत नाही. छंद जोपासा, रिकामं मन ठेवू नका, चांगल्या मित्रांच्या सहवासात रहा.

वाचन, संगीत, खेळ, प्रवास, निसर्ग यातच आयुष्याचं खरं सौंदर्य दडलं आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिभेवर नियंत्रण ठेवा. बोलताना आणि खाताना विचार करा. कारण नंतर विचार करून काहीच उपयोग होत नाही.

बस्स..

इतकंच जर जपलं, तर आनंद शोधावा लागणार नाही. तो आपोआप तुमच्याकडे येईल.

✍️ प्रा. एस. एम. पाटील 

      देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

   ✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या