आता सवय झाली… वय पुढे सरकत गेलं…

 

आता सवय झाली… वय पुढे सरकत गेलं… 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/05/2026 :

आता सवय झाली… वय पुढे सरकत गेलं… बघता बघता आयुष्याने चाळीशी गाठली. एक काळ असा होता, जेव्हा लग्न या विषयात उत्सुकता होती, स्वप्नं होती, मनात कुठेतरी आपलंही घरटं होईल अशी आशा होती. पण काळ जसजसा पुढे गेला, तसतशी त्या आशेची जागा अनुभवांनी घेतली… आणि आता अनुभवांचीच सवय झाली आहे.

लग्न या विषयावर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कथा असतात. कुणाच्या सुखाच्या, कुणाच्या संघर्षाच्या… तर कुणाच्या न सांगितलेल्या वेदनांच्या.

हल्ली तर विवाहाच्या नावाखाली दलालांचा अक्षरशः सुळसुळाट झालेला दिसतो. त्यांना दोन जीव जुळण्यापेक्षा व्यवहार जुळण्यातच अधिक रस असतो. समोरच्या व्यक्तीचं आयुष्य, भावना, मानसिक अवस्था… याच्याशी त्यांना काही घेणंदेणं नसतं. पैसे मिळाले की काम संपलं.

विवाह संस्थांवर स्थळांची काही कमी नसते. दररोज नवीन प्रोफाइल्स, नवीन अपेक्षा, नवीन अटी.

आजकाल विधवा आणि घटस्फोटीत स्थळंही मोठ्या प्रमाणावर दिसतात आणि खरं सांगायचं तर त्यात काहीच चुकीचं नाही. प्रत्येकाला आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण खटकतं ते वेगळंच… प्रत्यक्ष भेटणं तर दूरच, साधा संवाद होण्याआधीच समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण मोजमाप केलं जातं.

उत्पन्न किती?

घर किती मोठं?

गाडी कोणती?

भविष्यात किती सुरक्षितता?

अपेक्षा पूर्ण होत असतील तरच पुढे बोलायचं… अन्यथा सरळ “रिजेक्टेड”.

कधी कधी वाटतं, माणूस म्हणून ओळखून घेण्याची प्रक्रिया आता संपत चालली आहे.

मन, स्वभाव, संघर्ष, प्रामाणिकपणा… या गोष्टी दुय्यम झाल्या आहेत. नात्यांमध्ये समजून घेण्यापेक्षा “सेटल” हा शब्द मोठा झाला आहे.

सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहिती आहे? तर सतत नाकारलं जाण्याची सवय होण्याचा…

सुरुवातीला प्रत्येक नकार मनाला लागतो. नंतर मन प्रश्न विचारतं — “आपल्यातच काही कमी आहे का?” आणि मग एक वेळ अशी येते, जेव्हा माणूस बाहेरून हसायला शिकतो… पण आतून अपेक्षा ठेवणंच सोडून देतो.

आता खरंच सवय झाली आहे…

विचारण्याची…

थांबण्याची…

आणि शेवटी शांतपणे “रिजेक्टेड” स्वीकारण्याची

93 26 36 53 96

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या