'बरं चाललंय' च्या मागचं कटू वास्तव.!

'बरं चाललंय' च्या मागचं कटू वास्तव.!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/05/2026 :

"कसं चाललंय?" आजच्या जगात सगळ्यात जास्त विचारला जाणारा आणि तितकाच वरवरचा हा प्रश्न. समोरचा माणूस हा प्रश्न खरोखर काळजीपोटी विचारतो की केवळ एक औपचारिकता म्हणून, हे आताशा ओळखता येऊ लागलंय. म्हणूनच की काय, आजकाल मनात कितीही वादळ घोंगावत असलं, तरी आपसूकच तोंडातून शब्द निघून जातात, "बरं चाललंय."

​खरं सांगायला जावं तर समोरच्याला ते ऐकण्यात रस असेलच असं नाही, आणि खोटं बोलावं तर स्वतःच्या मनाला पटत नाही. पण तरीही, एक खोटा मुखवटा चढवून आपण स्वतःला आणि जगाला सांगत राहतो की सगळं कसं आलबेल आहे.

आयुष्यात जेव्हा संकटं येतात आणि एखाद्याच्या सोबतीची खरी गरज असते, तेव्हा अवतीभवती फक्त एकटेपणा उरतो. वादळात सोबत करायला कुणीच नसतं. पण गंमत बघा, जसं सगळं काही ठीकठाक दिसू लागतं, तशी हीच माणसं अचानक प्रकट होतात. "आम्हाला तुझी खूप काळजी आहे," असं म्हणत अगदी जवळ येऊन चौकशी करू लागतात.

​प्रश्न पडतो की, जेव्हा मी खचलो होतो, तेव्हा ही काळजी कुठल्या बिळात दडून बसली होती?

आजपर्यंत आपण अशा अनेक सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या माणसांच्या गराड्यातच जगत आलो आहोत आणि कदाचित पुढेही जगावं लागेल. या अनुभवांनी आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की शिकवली, ती म्हणजे स्वतःची लढाई स्वतःच लढायची असते.

आता तर एक सवयच झालीये. चुकून जरी कुणी वाटेत भेटलं आणि सहज विचारलं, "काय मग, कसं चाललंय सगळं?" तरीही मनातल्या भावनांना आवर घालून, चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आणून मी शांतपणे उत्तर देतो. "बरं चाललंय.

कारण, काही उत्तरं ही समोरच्याला समजण्यासाठी नसतात, तर स्वतःला सावरण्यासाठी असतात.

©ShradDhanesh's_Dairies

संकलन : प्रविण सरवदे, कराड

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या