📖✒️आयुष्याचा कोडे आणि वेळेचे गणित.✍️


📖✒️आयुष्याचा कोडे आणि वेळेचे गणित.✍️

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 07/05/2026 :

​घड्याळ सर्वांकडे असते, पण वेळ मात्र कोणाकडेच नसते. हे आजच्या धावपळीच्या युगाचे एक कटू सत्य आहे.

आपण भिंतीवर घड्याळ टांगतो, मनगटावर बांधतो, पण खरं तर ते घड्याळ नसून आपल्या आयुष्यातील क्षणांची मोजणी करणारं एक साधन आहे.

​माझ्या अनुभवातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की, वेळ ही जगातील सर्वात महागडी वस्तू आहे. कारण ती तुम्ही एकदा गमावली की, जगातील सर्व संपत्ती देऊनही एक सेकंदही परत विकत घेता येत नाही.

आपण म्हणतो की काम असो वा आराम, घड्याळाशिवाय शक्य नाही. पण घड्याळाच्या काट्यासोबत चालणे म्हणजे केवळ धावणे नव्हे, तर ते नियोजन आहे. ज्याला वेळेचे नियोजन जमले, त्याला आयुष्याचे गणित सुटले. योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय, भविष्यातील मोठ्या संकटांना टाळू शकतो.

अनेकदा संधी समोर असताना आपण ती ओळखत नाही आणि वेळ निघून गेल्यावर जर-तर च्या भाषेत बोलतो. "त्यावेळी असे केले असते तर.?" हा प्रश्न म्हणजे वाया गेलेल्या वेळेचा केवळ पडसाद असतो. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणावर दयाही दाखवत नाही. ती निर्दयी वाटत असली तरी ती अत्यंत न्यायप्रिय आहे; जो तिचा आदर करतो, तिलाच ती यशाचे फळ देते.

वेळ ही वाळूसारखी असते, आपण जितकी घट्ट पकडण्याचा प्रयत्न करू, तितकी ती हातातून निसटते. त्यापेक्षा त्या वेळेच्या प्रवाहात नियोजनाची नौका वल्हवत राहणे, हेच यशस्वी जीवनाचे सूत्र आहे.

ShradDhanesh's_Dairies

✒️ संकलन : प्रविण सरवदे, कराड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या