मैत्रीचा हप्ता आणि आपला भावनिक इन्शुरन्स.!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/05/2026 :
आपण आयुष्यात गाडीचा हप्ता (EMI) चुकत नाही, घराचा हप्ता वेळेवर भरतो, कारण आपल्याला माहिती असतं की हप्ता चुकला तर बँक जप्ती आणेल. पण आपण सगळ्यात मोठी चूक कुठे करतो? आपण आपल्या हक्काच्या माणसांना, म्हणजेच मित्रांना Taken for granted धरायला लागतो. आणि मैत्रीचाही हप्पा असतो हेच विसरतो.
आजकालच्या धावपळीच्या दुनियेत आपण सगळेच 'बिझी' आहोत. करिअर, कुटुंब, कर्ज आणि जबाबदाऱ्या यांच्या चक्रव्यूहात आपण इतके अडकतो की, कधीकधी महिन्यान् महिने मित्रांशी बोलणं होत नाही. आपण विचार करतो, "अरे, तो तर माझा जिगरी दोस्त आहे, त्याला काय सांगायचं? तो समजून घेईल."
पण नीट विचार करा, जर रोपट्याला रोज पाणी घातलं नाही, तर ते एका रात्रीत वाळत नाही. ते हळूहळू कोमेजतं. मैत्रीचंही तसंच असतं. जेव्हा संवादाचा हप्ता थकायला लागतो, तेव्हा मैत्रीत 'अंतर' पडायला लागतं. आणि एक दिवस असा येतो की, एकमेकांना फोन करायलाही अवघडल्यासारखं वाटू लागतं.
आता हा हप्ता भरण्यासाठी तुम्हाला खिशातून पैसे खर्च करावे लागत नाहीत. यासाठी लागते ती फक्त दोन मिनिटांची इच्छा.
एक छोटा मेसेज : "कसा आहेस भावा?" किंवा "फक्त तुझी आठवण आली म्हणून मेसेज केला."
एक लहानसा कॉल : प्रवासात असताना किंवा चहाच्या ब्रेक दरम्यान लावलेला एक ५ मिनिटांचा केला.
आपल्या ग्रुपवरची उपस्थिती : ग्रुपवर फक्त 'Good Morning' चे फॉरवर्ड टाकण्यापेक्षा, एखाद्याच्या सुखा दुखात हक्काने दोन शब्द लिहिले तरी तुम्ही एक प्रकारे मैत्रीचा हप्ता भरत आहात इतके निश्चित.
आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण मागे वळून बघू, तेव्हा आपल्याकडे किती बँक बॅलन्स आहे यापेक्षा, आपल्या खांद्यावर हात ठेवून 'मी आहे ना तुझ्यासोबत' असं म्हणणारे किती मित्र आहेत, यावरून आपल्या आयुष्याची श्रीमंती मोजली जाईल.
हा लेख वाचून झाल्यावर लगेच अशा एका मित्राला फोन करा किंवा मेसेज करा, ज्याच्याशी बऱ्याच दिवसांत बोलणं झालेलं नाही. त्याला सांगा "बघ, आज मी माझ्या मैत्रीचा हप्ता भरलाय, आता तुझी पाळी"
© ShradDhanesh's_Dairies
संकलन : प्रविण सरवदे, कराड,
.

0 टिप्पण्या