सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/05/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयाची विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ मे २०२६ रोजी पदवी द्वितीय व तृतीय वर्षातील मेकॅनिकल विभागाची औद्योगिक भेट कोल्हापूर येथील रॉकेट इंजिनिअरिंग प्रा. लि. ला भेट देण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, नवकल्पना (Innovation) आणि स्टार्टअप संस्कृती यांची ओळख करून देणे हा होता.
भेटीदरम्यान कंपनीतील तज्ज्ञ अभियंत्यांनी विद्यार्थ्यांना डिझेल इंजिन निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. कच्च्या मालाच्या तपासणीपासून मशिनिंग, असेंब्ली, चाचणी आणि अंतिम गुणवत्ता तपासणीपर्यंतच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्पादन विभागातील विविध यंत्रसामग्रीचे कार्य प्रत्यक्ष पाहून त्याबाबत माहिती घेतली.
या औद्योगिक भेटीतून विद्यार्थ्यांना उत्पादन अभियांत्रिकी, गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक सुरक्षा आणि उत्पादन व्यवस्थापन यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. तसेच उद्योगातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि तांत्रिक अचूकतेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजले.
ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरली. महाविद्यालयाच्या वतीने रॉकेट इंजिनिअरिंग प्रा. लि. व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले.
या औद्योगिक भेटीमुळे द्वितीय व तृतीय वर्षातील मेकॅनिकल विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीलाच उद्योग क्षेत्राची ओळख झाली. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून उद्योगातील आव्हाने, संधी आणि भविष्यातील दिशा समजून घेतली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना व उद्योजकतेबद्दलची आवड निर्माण होण्यास मदत झाली.
महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली भेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या भेटीचा उत्साहाने सहभाग घेतला आणि ती त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले.
या औद्योगिक भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पदवी मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. गौरव देशपांडे व इंडस्ट्रियल व्हिजिट समन्वयक म्हणून प्रा. रविकांत देशमुख यांनी काम पाहिले.

0 टिप्पण्या