🟣 पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर माफी मागावी, काँग्रेस व महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांची पत्रकार परिषदेत मागणी
वृत्त एकसत्ता न्यूज
सोलापूर, दि. ११ मे २०२६
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करत, त्यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख प्रिया बसवंती यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे इथे स्त्रियांना सन्मानाने वागविले जाते. पण सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे ह्या केवळ राहुल गांधी यांच्या घरासमोरील रस्त्याचा विचार करतात असे आक्षेपार्ह, अवमानकारक वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य महिला सन्मानाला धक्का देणारे आहे. सोलापूरच्या महिला हा अवमान सहन करणार नाहीत. महिलांचा सन्मान हा केवळ राजकीय घोषवाक्याचा विषय नसून तो कृतीतून दिसला पाहिजे; अन्यथा “नारी शक्ती वंदना” ही घोषणा केवळ शब्दांपुरतीच मर्यादित राहील. म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढील दहा दिवसांत खासदार प्रणिती शिंदे यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्या सरचिटणीस संघमित्रा चौधरी यांनीही सांगितले की, भाजप महायुती सरकारच्या कार्यकाळात राज्यात महिला, तरुणी आणि चिमुकल्यांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे महाराष्ट्रातील जनतेत अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा संवेदनशील काळात राज्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अपेक्षित असताना विरोधकांवर वैयक्तिक आणि अवमानकारक टीका करण्याची प्रवृत्ती चिंताजनक आहे. रस्त्याच्या निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे आहे. हा केवळ एका महिला खासदारांचा अपमान नसून समस्त नारीशक्तीचा अवमान आहे. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींविषयी सत्ताधाऱ्यांच्या मनात एवढा आकस का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संघमित्रा चौधरी पुढे म्हणाल्या की, एखाद्या महिला लोकप्रतिनिधीच्या कार्यावर राजकीय टीका करण्याऐवजी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशा स्वरूपाची विधाने करणे ही अत्यंत खालच्या पातळीची राजकीय संस्कृती आहे. एकीकडे भाजपकडून “नारी शक्ती वंदना” आणि महिला सन्मानाच्या घोषणा दिल्या जातात; मात्र दुसरीकडे महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरली जाते, हा स्पष्ट दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेस महिला काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दक्षिण अक्कलकोट महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती, उत्तर मध्य महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल थोरात, महिला आघाडी शहर प्रमुख स्वातीताई रूपनर, युवती सेना शहर प्रमुख रेखाताई आडकी, काँग्रेसच्या महिला सरचिटणीस अँड संघमित्रा चौधरी, माजी अध्यक्षा हेमाताई चिंचोलकर, माजी नगरसेविका भारतीताई ईप्पलपल्ली, सचिव शुभांगी लिंगराज यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

0 टिप्पण्या