मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/05/2026 :
मोठी माणसे नेहमी पाप-पुण्याच्या गोष्टी करत असतात. त्यांच्याकडे जणू काही एक यादीच असते (जी कुठेही लिखित स्वरूपात नसते) की काय केले की पुण्य लाभते आणि काय केल्यावर पाप लागते.
लहान मुलांना नेहमी सांगितले जाते, "खोटे बोललात तर पाप लागेल, देवबाप्पा कान कापेल." पण आपण पाहतो की सगळेच कधी ना कधी खोटे बोलतात, तरीही सगळ्यांना दोन कान असतातच. मग खोटे बोलण्याचे पाप नक्की कोण करते?
अर्थात, मुले भीतीपोटी तरी खोटे बोलणार नाहीत, हाच त्यामागील मुख्य हेतू असतो. वास्तव पाहता, दुसऱ्याचे ओरबाडून किंवा हिसकावून घेणे आणि कोणाचे मन दुखावणे म्हणजे 'पाप'; तर आपल्या कृतीतून कोणाच्या चेहऱ्यावर हसू उमटणे, कोणाचे मन समाधानी आणि आनंदी होणे म्हणजे 'पुण्य'.
आजचा संकल्प
आपल्या वागण्यातून कोणाला आनंद देता आला नाही तरी चालेल, पण कोणाला दुःख न देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. पदरात पुण्य पडले नाही तरी हरकत नाही, पण आपल्याकडून कोणतेही पाप घडणार नाही याची काळजी घेऊया.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या