सारी जवानी में तूने, किये पाप भारे !

 

सारी जवानी में तूने, किये पाप भारे !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/05/2026 :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या लहरकी बरखा मध्ये एक अतिशय मार्मिक आणि जीवनाचे सत्य सांगणारे पद आहे. हे पद माणसाला वृद्धापकाळातही मोहामध्ये अडकलेल्या व्यक्तीला परमार्थाची, ईश्वर भक्तीची आठवण करून देते. संसार क्षणभंगूर आहे हे जाणून वृद्धापकाळात ईश्वर भक्ती आणि सत्कर्म करावे हे या लहरकी बरखातून राष्ट्रसंत मानवी स्वभावतील मुख्य सार आहे. महाराज अतिलोभ आणि मृत्यू विषयीच्या बेफिकीरीवर प्रहार करीत आहे.

कबतक रहे संसारमें? कुछ सोचलो जरा |

साठी हुई काठी लगी, तोभी न दिल निकले पुरा ||

लडकोंके लड़के भी भये, सब दाँत भी गिरने लगे |

सेवा नही करता धरमकी, कब करें मर जायेंगे ||

           राष्ट्रसंत म्हणतात, या संसारात (जगात) तू किती दिवस राहणार आहेस? अरे माणसा ! जरा तरी विचार कर. मृत्यू निश्चित आहे हे लक्षात घे. तुझे वय साठाव्या वर्षापर्यत पोहोचले, चालण्यासाठी हातात काठी लागली तरीही मनातील विषयांचा, मोहाचा आणि हवसेचा पूर अजून ओसरलेला नाही. तुला मुलांची मुले, पणतू सुद्धा झाली. आतातरी ईश्वराची, धर्माची किंवा सत्कर्माची सेवा करीत नाहीस, तर मग कधी करणार? असाच राहिलास तर मरण जवळ येईल आणि हातात काहीच मिळणार नाही.

सारी जवानी में तूने, किये पाप भारे 

अभी बुढापे में काहे, प्रभू को पुकारे ||टेक||

           राष्ट्रसंत म्हणतात, माणसाने आपल्या तरुणपणात, जेव्हा शरीरात जवानीची ताकद असते तेव्हा सर्व वाईट कामे, अनैतिक कृत्ये केली. जवानीत असताना पाप केले आणि आता  जेव्हा शरीर वृद्ध झाले, ताकद नाहिशी झाली आहे, तेव्हा पश्चाताप होऊन देवाला, प्रभुला आळवू लागला आहे. आयुष्याची खरी कमाई सत्कर्म करण्यात असते. म्हातारपणात केवळ फळ मिळते, वेळ निघून गेल्यावर केलेली भक्ती ही सोयीसाठी केलेली भक्ती मानली जाते. तरुणपणात भक्ती करीत नाही म्हातारपण आले की संसार करायचा आहे म्हणतो. संसारात रमलेले मन बाहेर निघत नाही. ईश्वर भजन करणे होत नाही. म्हणून भक्ती, सेवा, दुसऱ्याला मदत तरुणपणातच करा.

जमा किया सारी, पास में बुराई |

कभी भी किसी की, लिया ना दुहाई |

अब राम कैसे होगा, हाथ-पैर हारे ||1||

           माणसाने आयुष्यभर फक्त वाईट गोष्टी, पाप जमा केले. जेव्हा हिशोब करण्याची वेळ येते, तेव्हा सत्कर्माऐवजी फक्त दुष्ट कृत्यच हाती लागतात. जवानीच्या तोऱ्यात असताना अहंकार वृत्ती तुझ्यात बळावली आणि संताचे, देवाचे किंवा चांगल्या लोकांचे बोलणे कधीच ऐकले नाही. मदतीसाठी हात पसरले नाही आणि दुसऱ्याला मदत केली नाही. आता पश्चाताप होऊनही काही उपयोग नाही कारण आयुष्यात असे कोणतेही पुण्यकर्म केले नाही, ज्यामुळे ईश्वर प्राप्ती होईल. म्हातारपणात तुझे हातपाय थकले, आता राम (मोक्ष, परमेश्वर) कसा मिळेल.

चोरी और जारी, लचपतखोरी |

प्रेम से न बोला, किसी से पुकारी |

छींक रहे लोग सारे, मुख ना निहारे ||2||

         तरुण वयात असताना चोऱ्या, माऱ्या, अनैतिक कर्म (जारी) आणि लाचखोरी केली. आपल्याच तोऱ्यात लोकांशी प्रेमाने बोलत नव्हता किंवा कोणाला मदतीसाठी हाक मारत नव्हता. तसेच दुसऱ्याचे मदतीला धावून जात नव्हता. स्वार्थीपणाने वागत होतास. म्हणूनच गावातील सर्व लोक तुझा तिरस्कार करीत आहे. तुझ्या तोंडाकडे सुद्धा पाहत नाही. तू दुसऱ्याच्या भल्याचा विचार कधीच केला नाही. आज समाजात दुर्गुण वाढले, समाजात अनैतिकता पसरलेली आहे. लोकांमधील माणुसकी कमी झाली आहे. प्रेमाने बोलणे, एकमेकांना मदत करणे आता दुर्मिळ झाले आहे. 

बोल तेरे घरको सारे, पाप ना बढाओ |

सेवा करो सबकी, तबही शांति सुख पावो |

कहे दास तुकड्या तब ही, सुने प्रभू प्यारे ||3||

             हे माणसा ! तू तुझ्या शद्बावर ताबा ठेव, चांगले बोल, तुझ्या घरामध्ये किंवा संसारात पातक (पाप) वाढवू नकोस. सर्वांची सेवा कर. निस्वार्थी भावनेने सर्वाना मदत कर, तरच तुला खरी शांतता आणि सुख मिळेल. राष्ट्रसंत म्हणतात, जेव्हा तू अशी सेवा करशील तेव्हाच तुझे लाडके प्रभू तुझे म्हणणे ऐकतील आणि तुझी भक्ती सफल होईल. खरी भक्ती ही देवळात जाण्यापेक्षा गरजूंना, हीन दुबळ्यांना मदत करण्यात आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. केवळ पोपटपंची करून देव प्रसन्न होत नाही. जेव्हा आचरण शुद्ध असते आणि सेवाभावी वृत्ती असते तेव्हाच ईश्वर आपल्या प्रार्थनेला प्रतिसाद देतो.

दो दिन की जिंदगी | दो दिन का मेला |

क्या लेकर आया बंदे, क्या लेकर जायेगा ||

बोध:- हे मानवा तुझे आयुष्य खूप लहान म्हणजेच दोन दिवसांचे आहे आणि हे जग एका दोन दिवसांच्या मेळ्यासारखे क्षणिक आहे. तू या जगात येताना रिकाम्या हातानेच आला आणि जाताना रिकाम्या हातानेच जाणार आहेस. मातीपासून बनलेले हे शरीर शेवटी मातीतच मिसळून जाणार आहे. मग कशाचा गर्व करतैस? म्हातारपणात जे साध्य होत नाही ते तरुणपणीच प्रभुचे भजन, सत्कर्म, सेवा कर. लक्ष परमेश्वराचे चरणावर लाव. जसे- एक स्त्री विहीरीवरुन, नदीवरुन पाणी आणते, तिचे डोक्यावर दोन घागरी, एक कडेवर तसेच एक हातात असते. पण तिचे लक्ष तिच्या घागरीवरच असते. लक्ष परमेश्वराचे नामस्मरणात असावे.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर

(व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त)

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- 9921791677

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या