मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/05/2026 :
दैनंदिन जीवनात आपले परस्परांशी मिश्र स्वरूपाचे संबंध असतात... काही घनिष्ठ, काही चांगले, काही बरे, तर काही तुटक. यांमधून मैत्री घट्ट होते किंवा साधारण संबंध तयार होतात. परंतु, हे संबंध बिघडण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत ठरतात, त्यातील मुख्य गोष्ट म्हणजे... 'गैरसमज'.
मैत्री किंवा नव्याने जोडलेले संबंधच नव्हे, तर केवळ गैरसमजामुळे रक्ताची नाती सुद्धा तुटतात. अगदी पती-पत्नी देखील एकमेकांपासून विलग होतात. हल्लीच्या काळात तर हे प्रमाण खूपच वाढले आहे.
प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले सत्य आणि कोणीतरी सांगितलेले ऐकून त्यावर ठेवलेला आंधळा विश्वास, यामधूनच गैरसमज निर्माण होतात. जर हे गैरसमज लगेच मोकळ्या मनाने एकत्र बसून, चर्चा करून सोडवले, तर नाती अखंड राहतात. मात्र, तेच गैरसमज मनात आणि डोक्यात साठवून ठेवले, तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही.
आजचा संकल्प
आपली सद्सद्विवेकबुद्धी नेहमी जागृत ठेवून, कोणाच्याही सांगण्यावर सहजासहजी विश्वास न ठेवता, आपण प्रत्यक्ष गोष्टीची खात्री करून घेऊया आणि सत्यावरच विश्वास ठेवूया. नात्यांमध्ये गैरसमजाला कोणतीही जागा ठेवणार नाही, असा प्रयत्न करूया.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या