करावे काय शिक्षण ते? कधी कामासी येईना !

 

करावे काय शिक्षण ते? कधी कामासी येईना !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/05/2026 :

संस्काराची पेरणी करणारे शिक्षण हवे. शिकल्यानंतर माणसाला नोकरी मिळेल, त्या नोकरीतून पैसा मिळेल आणि नोकरी आणि पैसा हेच आपल्या शिक्षणाचे ध्येय बनत चालले आहे. शिक्षणातून माणूस घडवायचा असतो. अलीकडच्या काळात खऱ्या शिक्षणाची नितांत गरज आहे, मात्र ते शिक्षण संस्काराची पेरणी करणारे असायला हवे. एकवेळ मुलाला अक्षराची ओळख उशिरा झाली तरी चालेल, पण माणूस बनवण्याची प्रक्रिया अधिक अधोरेखित होण्याची गरज आहे. उद्याच्या समाजाच्या दृष्टीने तो विद्यार्थी अधिक चांगला नागरिक कसा घडेल, त्या दृष्टीने त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. उत्तम संगती हा संस्कार आहे. त्यासाठी उत्तम काय आणि वाईट काय हे कळायला हवे. तेच तर या शिक्षणातून हरवत चालले आहे.

            शिक्षण कुठूनही मिळवता येत, पण संस्कार मात्र घरातूनच मिळतात. त्यासाठी घरातील लोक सुसंस्कारी असणे गरजेचे आहे. शिक्षण हे पुस्तकी ज्ञान देते पण माणसाला सुसंस्कारी  घरातील संस्कारच करतात. मूल जन्माला आल्यावर त्याचे पहिले शिक्षण आणि आचार विचार हे घरातूनच सुरु होतात. मोठ्यांचा आदर करणे, प्रामाणिकपणा, सहकार्य आणि सहानुभूती यासारखे गुण पुस्तकातून नाही तर घरातील वातावरणातून शिकायला मिळतात. लहान मुले नेहमी घरातील मोठ्या व्यक्तीचे अनुकरण करतात म्हणूनच घरातील लोक सुसंस्कारी असतील तर आपोआपच मुलांवर उत्तम संस्कार होतात. सुसंस्कारी वातावरणामुळेच एक उत्तम व्यक्ती आणि जबाबदार नागरिक घडतो.

करावे काय शिक्षण ते? कधी कामासी येईना |

पुस्तके पाठ करुनीही, लाभ अंती नसे कोणा ||धृ||

            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कामास न येणारे असे शिक्षण कशासाठी करायचे, जे प्रत्यक्ष जीवनात कधीच उपयोगी पडत नाही? सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी पुस्तकी ज्ञान पाठांतर करून परीक्षेपुरते लक्षात ठेवतात. पुस्तकातील माहिती केवळ पाठांतर करून डोक्यात भरवली, तरीही त्याचा अंतिम उपयोग किंवा लाभ कोणालाही होत नाही. ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या किंवा समाजाच्या विकासासाठी झाला नाही तर त्या शिक्षणाचा काहीच फायदा नाही. अशी खंत राष्ट्रसंतानी केली आहे. व्यावहारिक, जीवनोपयोगी आणि कौशल्यपूर्ण शिक्षण असणे गरजेचे आहे.

राम भजने बहू गाती, हटेना विषय-प्रवृत्ती |

वाचती दिवसभर पोथी, जीवनी अर्थ उमजेना ||1||

            अनेक लोक भक्ती भावाने किंवा दिखाव्यासाठी रामाची भजने गातात आणि दिवसभर धार्मिक पोथ्या वाचतात. तरीही त्यांच्या मनातील विषय-वासना (मोह, लोभ, काम, क्रोध इत्यादी ) आणि वाईट प्रवृत्ती कमी होत नाहीत. ते फक्त वरवरचे पठण करतात, पण त्या ग्रथाचा खरा अर्थ आणि मर्म त्यांच्या जीवनात कधीच उमजत नाही. पाठांतर करून, तोंडाने देवाचे नाव घेतल्याने माणसाचे जीवन बदलत नाही. खरी भक्ती ही आचरणात आणायची असते. भगवंताच्या शिकवणीचा खरा अर्थ आपल्या जीवनात उतरवत नाही तोपर्यंत केलेली पोथी - पुराणांची पारायणे व्यर्थ ठरतात. 

ग्रामगीता नव्हे पारायणासी |

वाचता वाट दावी जनासी ||

          तुम्हाला ग्रामगीतेच महत्व वाढवायचे असेल तर त्यातील ओव्यांचा अर्थ समजून तो आपल्या आचरणात आणायला हवा. चाळीस दिवसाच्या अनुष्ठानातून जर गावातील लोकांचे जीवन सुधारले तरच ग्रामगीतेचे पारायण सार्थकी लागते.

वैद्यकी पास जरी केली, न कळती लक्षणे काही |

लाभ तरी का कुणा सांगा? असा हा रोज धिंगाणा ||2||

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पुस्तकी ज्ञान असूनही वास्तवात अडचणी का येतात याचे सुंदर वर्णन केले आहे. वैद्यकीय शिक्षण किंवा परीक्षा उत्तीर्ण केली तरीही प्रत्यक्षात आजारांची, संकटांची लक्षणे ओळखता येत नाहीत. मग अशा ज्ञानाचा कोणाला काय उपयोग होतो? जर ज्ञान असूनही परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर तो रोजचा गोंधळ किंवा संघर्षच आहे. जीवन समजून घेताना केवळ माहिती असणे पुरेसे नसते, तर माहितीचा योग्य वेळी योग्य वापर करण्याचे शहाणपण असणे गरजेचे आहे.

शेतकी शिकुनिया आले, नोकरी नाही घरी बसले |

लाज वाटे स्वतः करण्या, बघा हा शेतकी-बाणा ||3||

          शेतीचे उच्च शिक्षण पूर्ण करूनही हाताला योग्य नोकरी किंवा काम न मिळाल्यामुळे, त्या सुशिक्षित तरुणांना घरी रिकामे बसावे लागत आहे. शेतकी पदवीधर सध्या घरची शेती करण्याऐवजी नोकरी शोधतात आणि नोकरी न मिळाल्यास घरी बसणे पसंत करतात. शेती आणि शेतकरी हा आपल्या संस्कृतीचा कणा आहे. शेतांत काम करण्याची लाज वाटते किंवा कमीपणा वाटतो हा शेतकी-बाणा कसा मानावा. शेतीत राबणे अभिमानास्पद गोष्ट आहे. आजकाल शेती असणाऱ्या मुलाला मुलगी देतात पण त्याला नोकरी सुद्धा असावी लागते. नोकरी व शेती असेल तर मुलगी लग्नाला तयार होते कारण नोकरी गेल्यावर शेती करून उदर निर्वाह करता येतो.

कसे जगतील जन सांगा? तया ना कर्म ना नेकी |

म्हणे तुकड्या हवे पैसे, कष्ट सहवे न इतरांना ||4||

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कष्टाचे महत्व सांगतात, जे लोक प्रामाणिक कर्म (नेकी) करत नाहीत आणि फुकटचे पैसे मिळण्याची अपेक्षा करतात. त्यांना कष्टाशिवाय जगणे अशक्य असल्याचे ते सांगतात. समाजात असे अनेक लोक असतात की, "आयत्या पिठावर रेघोट्या" जे स्वतःच्या घामाचा एक थेंबही न गाळता फुकटचे यश, धन किंवा सन्मान मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. राष्ट्रसंत ग्रामगीतेत श्रमप्रतिष्ठा (कामाचे महत्व ) शिकवितात. फुकटची अपेक्षा न बाळगता प्रामाणिक कष्ट करण्याची कृती अंगी बाणावी लागेल, तोपर्यंत त्याला खरा आनंद आणि प्रगती मिळत नाही.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर

(व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त)

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- 9970404180

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या