🟣 टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा 🔵 खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

🟣 टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

🔵 खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/05/2026 : माढा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचा प्रश्न असलेल्या टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५६१एच्या चौपदरीकरणाला अखेर गती मिळाली असून फलटण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या पाहाणी दौऱ्यावर असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी या महामार्गाच्या फोरलेन टेंभुर्णी पंढरपूर फोरलेन महामार्गाची घोषणा केली.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी टेंभुर्णी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. वाढती वाहतूक, वारकऱ्यांची मोठी संख्या, अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक कोंडी यामुळे हा मार्ग फोरलेन करण्याची मागणी त्यांनी दिल्ली येथे नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे  भेटून केली होती.

या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना पाठविलेल्या पत्रात टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले होते. डीपीआर अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही नमूद केले होते.

पंढरपूर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून आषाढी व कार्तिकी वारीदरम्यान लाखो भाविक येथे येतात. तसेच हा मार्ग NH-65 आणि NH-965 यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून अनेक गावं, बाजारपेठा आणि साखर कारखान्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहतूक सुलभ होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाला चालना मिळाल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या