🔵 तामीळनाडूतील क्रांती-प्रतिक्रांती 🟢 विधानसभा निवडणूकांचे वैचारिक विश्लेषण



 🔵 तामीळनाडूतील क्रांती-प्रतिक्रांती

🟢 विधानसभा निवडणूकांचे वैचारिक विश्लेषण  (भाग-1)

वृत्त एकसत्ता न्यूज 

 संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

अकलूज दिनांक 23/05/2026 :

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकांचे विस्ताराने विश्लेषण करायची वेळ येईल असे मला वाटले नव्हते, कारण या निवडणूकीत वैचारिक उलथा-पालथ अजिबात होणार नाही, याची खात्री होती. एका ब्राह्मणी विचाराच्या पक्षाची सत्ता जाउन दुसर्‍या ब्राह्मणी विचारांच्या पक्षाची सत्ता येईल, एवढाच काय तो राजकीय बदल होईल असे मला वाटले होते. परंतू या निवडणूकीच्या निकालाने तामीळनाडूत वैचारिक उलथापालथ झाल्याचे समोर आले आणी हे वैचारिक विश्लेषण लिहीण्याची गरज भासली. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल कॉंग्रेसची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता येणे किंवा केरळमधील डाव्यांची सत्ता जाऊन कॉंग्रेसची सत्ता येणे यात कुठेही वैचारिक उलथा-पालथ नसल्याने त्यावर काही वैचारिक लिहीण्याची गरजच नाही. एका ब्राह्मणी पक्षाची सत्ता जाऊन दुसर्‍या ब्राह्मणी पक्षाची सत्ता आली एवढ्या एका वाक्यात हे विश्लषण संपते. परंतू तामीळनाडूमध्ये क्रांतीकारी अब्राह्मणी पक्षाची सत्ता जाऊन ब्राह्मणी षडयंत्राचा एक भाग असलेल्या पक्षाची सत्ता येणे हे निश्चितच वैचारिक उलथा-पालथीचे एक मोठे व आगळे-वेगळे उदाहरण म्हटले पाहिजे.

1916 पासून ते आजतागायत या 110 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात सत्ताधारी ब्राह्मणी छावणीच्या पक्षांच्या विरोधात कोणतीही तडजोड न करता, जीवाची बाजी लावून अत्यंत प्रामाणिकपणे आपापल्या तत्वज्ञानाशी निष्ठा राखत संघ-भाजपाच्या ब्राह्मणी छावणीच्या विरोधात लढणारे जे मोजके राजकीय नेते या देशात आहेत, त्यात जस्टीस पार्टीचे संस्थापक थिगरय्या चेट्टी, डॉ. टी. एम. नायर, ए. सुब्बरायलू रेड्डीयार (पहिले मुख्यमंत्री), कर्पूरी ठाकूर, करूणानिधी (स्टॅलिन), राम नरेश यादव, लालू यादव (तेजस्वी), मुलायम सिंग यादव (अखिलेश) ही मोजकीच नावे येतात. ही केवळ व्यक्तींची नावे नाहीत तर जातीअंताच्या क्रांतिकारक राजनैतिक विचारप्रवाहाचे ते प्रतिनिधी आहेत. सत्ता सोडावी लागली, तुरूगात जावे लागले किंवा प्राण गमवावे लागले तरी कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणी छावणीचे मुख्य सूत्रधार असलेल्या संघ-भाजपाशी सतत लढत राहणे हेच एकमेव ध्येय्य असलेल्या नेत्यांची ही नावे आहेत.

इतिहासात जेवढे सम्राट अथवा पराक्रमी राजे झाले आहेत, ते बहुतेक सर्व अशा समाजघटकातून आलेले आहेत, ज्या समाजघटकाला आज ‘ओबीसी’ म्हणून ओळखले जाते. त्यात आद्य सम्राट बळीवंशातील सर्व राजे, सम्राट धनानंद, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू, यशवंतराव होळकर अशी बरीच नावे घेता येतील. हे केवळ राज्यकर्ते नव्हते तर ब्राह्मणी छावणीला पराभूत करून नव्या समतावादी समाजव्यवस्थेचे जनक व प्रतिपालक होते. याच समतावादी राज्यकर्त्यांची क्रांतिकारक परंपरा कर्पूरी ठाकूर, आण्णा दुराई, रामनरेश यादव, करूणानिधी, स्टॅलिन, लालू व मुलायम यांनी आजही जिवंत व कार्यरत ठेवलेली आहे. ओबीसी समाजघटकातून आलेल्या स्वयंभू राज्यकर्त्यांना प्रचलित सरळ मार्गाने पराभूत करणे केवळ अशक्य असते. म्हणून अशा क्रांतिकारी राज्यकर्त्यांचा पराभव करण्यासाठी ब्राह्मणी छावणी नेहमीच अनैतिक, हिंसक व षडयंत्रकारी कारवाया करत असते.

आद्य सम्राट बळीराजाला ठार मारण्यासाठी बटू वामन नावाच्या ब्राह्मण सेनापतीने भिकार्‍याचे सोंग घेतले व बळीराज्याचा घात केला. क्रांतिकारक बौद्ध धनानंद राज्याला चाणक्याने हिंसक व अनैतिक षडयंत्र करुन ठार केले. चाणक्याने चंद्रगुप्त या दुसर्‍या ओबीसीच्या नेतृत्वाखाली ही प्रतिक्रांती केली. या ब्राह्मणी प्रतिक्रांतीचे रुपांतर अब्राह्मणी क्रांतीत करण्यासाठी स्वतः चंद्रगुप्तानेच पुढाकार घेतला. चाणक्याच्या ब्राह्मणी छळाला शह देण्यासाठी चंद्रगुप्ताने अ-ब्राह्मणी जैन धर्माची दिक्षा घेतली व ब्राह्मणी छावणीला मात दिली. मौर्य साम्राज्य नष्ट करण्यासाठी ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शृंगाला बृहद्रथ मौर्याचा खून करावा लागला. छत्रपती शिवाजी या कुणबी (गवळी) राज्याने ब्राह्मणांना शह देण्यासाठी अब्राह्मणी जात्यंतक शाक्त धर्माची दिक्षा घ्यावी लागली, ज्याची परिणीती शिवाजी महाराजाच्या खूनात झाली. क्रांतिकारक होळकर (धनगर) घराण्याला पराभूत करण्यासाठी ब्राह्मण पेशवा व मराठा सरदारांनी अनैतिकपणे खून व हिंसाचाराचा मार्ग पत्करला.

ओबीसी समाजघटकातील क्रांतीकारक राज्यकर्त्यांना कपटनितीने ठार मारण्याची परंपरा ब्राह्मणी छावणीने आजही लोकशाही युगात सुरू ठेवलेली आहे. माननीय गोपीनाथजी मुंडे हे महाराष्ट्राचे नजीकचे भावी मुख्यमंत्री होते. म्हणजे ते निर्विवादपणे फडणवीसऐवजी महाराष्ट्राचे राज्यकर्ते बनणार होते. परंतू त्यांनी स्वतःच्याच मदर ऑर्गनायझेशनच्या विरोधात क्रांतीकारक वैचारिक भुमिका घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी संसदेत एक तासाचे भाषण दिले. मुंडेसाहेब मुख्यमंत्री झालेत तर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना होणारच या भीतीपोटी ब्राह्मणी छावणीच्या संघ-भाजपाने षडयंत्राने त्यांचा खून केला. मुंडेसाहेब सोडलेत तर बाकी सर्वच देशपातळीवरील ओबीसी नेते हे ओबीसी जनमान्यतेतून व चळवळीतून निर्माण झालेले नेते होते व आहेत.

लोकशाहीच्या काळात नेत्यांचा खून करणे सोपे नसते. म्हणून विरोधी राजकीय नेत्यांना राजकारणातून बाद करण्यासाठी सोपे मार्ग निवडले जातात. ओबीसी जनगननेसाठी दिल्लीला धडक मारणारे भुजबळसाहेब देशपातळीवरचे एकमेव ओबीसी नेते बनलेले होते. भुजबळसाहेबांनी देशभरात केलेली ओबीसी जनजागृती दिल्लीला झुकवू शकते व देशभर ओबीसी जातनिहाय जनगणना घ्यायला भाग पाडू शकते, याभीतीपोटी भुजबळ साहेबांना साडेतीन वर्षे जेलमध्ये टाकले व त्यांचे देशपातळीवरचे ओबीसींचे राजकारण कायमचे संपवून टाकले. एकेकाळी ओबीसींचा ढाण्या वाघ म्हणून देशभर डरकाळ्या फोडणारे भुजबळ आज ब्राह्मणांच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत.

मात्र लालू प्रसाद यादव यांना अनेकवेळा जेलमध्ये टाकूनही त्यांचे ओबीसी राजकारण ते संपवू शकले नाहीत. त्यांच्याच पक्षातील दलित नेते रामविलास पास्वान व ओबीसी नेते नितीश कुमार  यांना फोडून लालूजींची राजकीय सत्ता काढून घेण्यात आली. संघ-भाजपाने मुलायमसिंग यांना संपविण्यासाठी आधी मायावतींच्या खांद्यावर बंदूक ठेवली व नंतर मायवतींना संपवून संघ-भाजपा उत्तर प्रदेशात सत्ताधारी झालेत.

याचीच पुनरावृत्ती आता तामीळनाडू राज्यात होते आहे. आज संपूर्ण देशात तामीळनाडू हे एकमेव राज्य होते की जे ब्राह्मणी छावणीला गेल्या 110 वर्षांपासून पराभुत मानसिकतेत जगायला भाग पाडते आहे. इंग्रजांच्या काळात झालेल्या पहिल्याच प्रांतिक निवडणुकांमध्ये (1920) मद्रास प्रांतात ओबीसींचे वर्चस्व असलेला राजकीय पक्ष (जस्टीस पार्टी) सत्तेत आला व 1921 पासून सर्व जाती-धर्मांसाठी आरक्षणाची तरतूद केली. त्यानंतर सामी पेरियार यांनी ब्राह्मणी छावणीचा हिरो असलेल्या रामाला खलनायक ठरविले व रावणाला नायक! ब्राह्मणी छावणीच्या कमरेत लाथ घालणारा हा सांस्कृतिक संघर्ष आजही तामीळनाडूच्या अस्मितेचे प्रतिक बनला आहे. आधी जस्टिस पार्टीवर अ-ब्राह्मण जमीनदार (क्षत्रिय) जातींचे वर्चस्व होते, त्यामुळे ते ब्राह्मणांच्या विरोधात फक्त आरक्षणाची सामाजिक लढाई करीत होते. मात्र ओबीसी नेते सामी पेरियार यांनी कॉंग्रेसला लाथ मारून जस्टीस पार्टीचे नेते झाल्यानंतर पक्षात ओबीसींचे वर्चस्व वाढले. त्यामुळे आरक्षणाच्या सामाजिक संघर्षाकडून अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्षाकडे आगेकूच सुरू झाली.* त्याचे राजकीयकरण करण्यासाठी 1948 साली ओबीसी नेते आण्णा दुराई (विणकर-कोष्टी) यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) या पक्षाची स्थापना केली. या पक्षाने 1951 साली उग्र आंदोलन करून दिल्लीला झुकवले व नष्ट झालेले संविधानिक आरक्षण पुन्हा परत मिळविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, आदिवासी व ओबीसींना संविधानातून दिलेले आरक्षण सहा महिन्याच्या आतच सुप्रिम कोर्टाने रद्द केले होते. 1951 साली तामीळनाडूच्या ओबीसी वर्चस्वाच्या डी.एम.के. पक्षाने तीव्र आंदोलन करून नेहरूंच्या दिल्ली सरकारला झुकवले व दलित-आदिवासी-ओबीसींचे आरक्षण पुन्हा परत मिळविले. डीएमके पक्षाने ही देशातील पहिलीच घटना-दुरूस्ती घडवून आणली होती.

1967 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत ब्राह्मण-वर्चस्वाच्या कॉंग्रेस पक्षाला धूळ चारून डी.एम.के. पक्ष सत्तेत आला व तेव्हापासून आज 2026 पर्यंत तेथे सामी पेरियार यांच्या विचारांचेच राज्यकर्ते राज्य करीत आलेले आहेत. दरम्यान सिने-अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांनी डी.एम.के. पक्षात फूट पाडून नवा पक्ष स्थापन केला. एम. जी. रामचंद्रन हे ब्राह्मण असल्याने देशभरातील ब्राह्मणांना तामीळनाडूत पुन्हा ब्राह्मण-राज येइल अशी आशा वाटत होती. मात्र रामचंद्रन हे ब्राह्मण असलेत तरी ते ओबीसी नेते आण्णा दुराई (विणकर-कोष्टी)* यांचे कट्टर व एकनिष्ठ अनुयायी होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या पक्षाला आण्णा हे नाव जोडले. रामचंद्रन यांचे निधन झाल्यानंतर आण्णा डीएमके या पक्षाच्या प्रमुख त्यांच्याच पत्नी जयललिता झाल्यात. अनेकवेळा त्या मुख्यमंत्री झाल्यात. जयललिता जातीने ब्राह्मण असूनही त्यांनी सामी पेरियार यांच्या क्रांतिकारक अब्राह्मणी विचारांची कास कधीच सोडली नाही. त्यांनी ब्राह्मण जातीच्या विरोधात जाऊन दलित-आदिवासी-ओबीसी हिताचे कायदे केलेत व प्रामाणिकपणे राबविलेत सुद्धा!

अशा या बहुजन हिताय काम करीत असलेल्या तामीळनाडू राज्याच्या विरोधात ब्राह्मणी छावणी अनेक कारवाया करीत असते व आता विजय थलपतीच्या माध्यमातून कॉंग्रेस-संघ-भाजपाची ब्राह्मणी छावणी कशी यशस्वी होते आहे, याचा आढावा आपण पुढील भागात घेतू या! तोपर्यंत जयजोती, जयभीम व जय पेरियार!

लेखक - प्रोफे. श्रावण देवरे,

ओबीसी राजकीय आघाडी,

  मोबा. 81 77 86 12 56   


महत्वाची सूचना- इस आर्टिकल की मराठी pdf फाइल के लिए आगे दि हुयी लिंकपर क्लीक करे- https://drive.google.com/file/d/1XerP4PD1XKYnJwS_0pCWXYqaEKLXYMGn/view?usp=sharing 

3) इस आर्टिकल की हिन्दी pdf फाइल के लिए आगे दि हुयी लिंकपर क्लीक करे- https://drive.google.com/file/d/1zGqAuc8f5y8A3hXmT2FwhrSbuFgWiVh5/view?usp=sharing

=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या