शक्तिपीठ महामार्गा बाबत बाधित शेतकऱ्यांची मते जाणून घेऊन निर्णय घेण्यात येणार - खासदार धर्यशिल मोहिते पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/05/2026 :
शक्तिपीठ महामार्ग माढा मतदारसंघातील ज्या ज्या गावांमधून जात आहे त्या त्या गावात प्रत्यक्ष जाऊन बाधीत शेतकऱ्यांची मते जाणून घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मत खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग नवीन आराखड्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील सुमारे ४३ गावातून १२९ किलोमीटरचा रस्ता जात असून त्याबाबतची सखोल माहिती दिली.
🟣 यावेळी आमदार उत्तम जानकर यांनी शक्तिपीठ महामार्ग ज्या तालुक्यातून जातो त्या तालुक्यातील आमदार, खासदारांना व स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा अन्यथा या तालुक्यातून महामार्ग जाऊ दिला जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले.
यावेळी मगराचे निमगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडून कोणत्याही परिस्थितीत निमगाव मधून रस्ता जाऊ देऊ नका अशी विनंती केली. त्याचबरोबर अरण येथील शेतकऱ्यांनी शक्ती पीठ महामार्गास विरोध केला परंतु जाणारच असेल तर विमानतळाप्रमाने दर मिळावे अशी मागणी केली. करकंब येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायत उध्वस्त होत असल्याचे कारण सांगून शक्तिपीठास विरोध दर्शविला.
🔵 मतदान नाव नोंदणी (एसआयआर)
प्रत्येकाला मतदान नाव नोंदणी (एसआयआर) करणे अनिवार्य असून प्रत्येक तालुक्यातून सुमारे ५० हजार पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केलेली नाही तरी सर्वांनी आपापली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आमदार मोहिते पाटील यांनी केले.
यावेळी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी रस्ते अपघात व वाहतूक कोंडी बाबत विविध आकडेवारी देत शहरासारखी वाहतूक कोंडी टाळायची असेल तर वाहतुकीला शिस्त महत्त्वाचे असून ती स्वतःपासून प्रत्येकाने सुरू करावी असे आवाहन केले.
याच बैठकीत निरा कालव्याच्या पाण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पंढरपूरला दुसरे आवर्तन मिळणे गरजेचे असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितले तर माळशिरस तालुक्यातील पहिल्या आवर्तनातीलच भरणे झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. या सर्वांवर योग्य उपायोजना करण्याचे निर्देश आमदार मोहिते पाटील यांनी दिले.


0 टिप्पण्या