सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट संपन्न

 


सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

शंकरनगर/प्रतिनिधी, दिनांक 06/05/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयाची विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ५ मे २०२६ रोजी पदवी सिव्हिल,कॉम्प्युटर,ए.आय.डी.एस, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची औद्योगिक भेट बारामती येथील AIC-ADT बारामती फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटर तसेच व्ही.पी.'स शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला भेट देण्यात आल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे  यांनी दिली.   

या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, नवकल्पना (Innovation) आणि स्टार्टअप संस्कृती यांची ओळख करून देणे हा होता. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध स्टार्टअप्सची सविस्तर माहिती देण्यात आली. इन्क्युबेशन सेंटरमध्ये नवउद्योजकांना कशा प्रकारे मार्गदर्शन केले जाते, त्यांना निधी, तांत्रिक सहाय्य आणि व्यवसाय विकासासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, याचे मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी केली व त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. तसेच व्ही.पी.'स शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन प्रक्रिया आणि उद्योग-शिक्षण समन्वय याबाबत माहिती देण्यात आली. तज्ञांनी विद्यार्थ्यांना नवकल्पना, उद्योजकता आणि करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.

या औद्योगिक भेटीमुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीलाच उद्योग क्षेत्राची ओळख झाली. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून उद्योगातील आव्हाने, संधी आणि भविष्यातील दिशा समजून घेतली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना व उद्योजकतेबद्दलची आवड निर्माण होण्यास मदत झाली.

महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आणि इन्स्टिट्यूट इनोव्हेशन सेलच्या पुढाकारातून या भेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या भेटीचा उत्साहाने सहभाग घेतला आणि ती त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले.

एकूणच, ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि भविष्यातील करिअरसाठी मार्गदर्शक ठरली.

या औद्योगिक भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे  मार्गदर्शन लाभले व पदवी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. सावंत वाय. एच., कोकरे ए.जे.,रिसवडकर एस. ए., फडे ए.जी. व भोसले एस.डी. यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या