📖✒️हिशोबाच्या पलीकडचं आयुष्यं ✍️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/05/2026 :
आयुष्याच्या एका वळणावर माणूस हिशोबी होतो असं म्हणतात, पण खरं तर त्याच वळणावर तो 'बेहिशोबी' व्हायला शिकतो. जोपर्यंत मन कच्चं असतं, तोपर्यंत प्रत्येक नात्याचा ताळेबंद मांडला जातो, कोणी किती वेळ दिला आणि कोणी ऐनवेळी हात सोडला. पण जेव्हा अनुभवांचे घाव सोसून मन टणक होतं, तेव्हा लक्षात येतं की, या जगात कायमस्वरूपी काहीच नाही. माणसांच्या येण्या-जाण्याचा हिशोब मांडणं ही आता निव्वळ वेळेची नासाडी वाटते.
जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जगण्याची कारणं बदलतात. सुरुवातीला आपण लोकांच्या मान्यतेसाठी जगतो, मग कर्तव्यासाठी आणि शेवटी स्वतःच्या समाधानासाठी. चांगल्या-वाईट अनुभवांची सवय झाली की एक प्रकारची तटस्थता येते. आपल्याला कळून चुकतं की, काही प्रश्न सोडवून सुटत नाहीत; ते फक्त 'सोडून' दिले की आपोआप निकाली निघतात. जोपर्यंत आपण अपेक्षांचं ओझं वागवतो, तोपर्यंतच आपल्याला लोकांच्या वागण्याचा त्रास होतो. ज्या दिवशी आपण 'स्वीकार' करायला शिकतो, त्या दिवशी हिशोबाची वही कायमची बंद होते.
शेवटी, आयुष्य म्हणजे रेल्वेचं प्लॅटफॉर्म नाही जिथे प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्या गाडीची नोंद ठेवली पाहिजे. जे प्रवासात सोबत आहेत त्यांच्याशी प्रामाणिक राहा आणि जे रस्ता बदलून गेले त्यांना आनंदाने निरोप द्या. स्वतःला विनाकारण प्रश्नांच्या जाळ्यात अडकवून ठेवून प्रवाहाविरुद्ध पोहण्यात कसलीही मर्दुमकी नाही. जुने हिशोब आणि न सुटणारे प्रश्न मागे सोडून दिले, तरच पुढचा प्रवास निर्विघ्न आणि आनंददायी होईल.
ShradDhanesh's_Dairies
✒️ संकलन : प्रविण सरवदे, कराड

0 टिप्पण्या