महाराष्ट्र म्हणजे एक राज्य नाही ! महाराष्ट्र म्हणजे पराक्रमाची परंपरा !

 

महाराष्ट्र म्हणजे एक राज्य नाही !

 महाराष्ट्र म्हणजे पराक्रमाची परंपरा !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/05/2026 :

महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही. महाराष्ट्र म्हणजे पराक्रमाची परंपरा, स्वाभिमानाची ओळख आणि इतिहासाचा जाज्वल्य वारसा. महाराष्ट्र म्हणजे वीरांची भूमी. महाराष्ट्र म्हणजे शूरांची भूमी. महाराष्ट्र म्हणजे अन्याया समोर छाती ठोकून उभे राहणाऱ्या लढवय्या माणसांची भूमी.

या देशात अनेक राज्ये आहेत. प्रत्येक राज्याची एक वेगळी ओळख आहे. पण महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य आहे, ज्याचा समानार्थी शब्दच 'इतिहास' आहे. तुम्ही गोव्या ला जा. डोळ्या समोर उभे राहतात सुंदर समुद्रकिनारे, पर्यटन आणि आनंदाचा माहोल. तुम्ही पंजाब ला जा. पहिली आठवण येते ती पंजाबी लोकांची ऊर्जा आणि ढोल-ताशांवर रंगणारा भांगडा. तुम्ही गुजरात ला जा. डोळ्या समोर उभे राहतात व्यापारी, उद्योग आणि प्रगतीची वाट.

पण तुम्ही महाराष्ट्रात या. इथे पाय ठेवताच डोळ्या समोर उभे राहते एक तेजस्वी नाव. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण हा तोच महाराष्ट्र आहे, जिथे स्वराज्याची बीजे रुजली. जिथे अन्याया विरुद्ध तलवारी उगवल्या. जिथे स्वाभिमानासाठी मावळ्यांनी रक्त सांडले. आणि जिथे एका राजाने संपूर्ण जगाला शिकवले की, राजा हा प्रजेचा असतो.

हा तोच महाराष्ट्र आहे, जिथे प्रत्येक किल्ला इतिहास बोलतो. प्रत्येक मातीचा कण पराक्रमाची साक्ष देतो. आणि प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात स्वाभिमान धडधडतो. म्हणून एक क्षण थांबा आणि विचार करा. जर तुमचा जन्म या भूमीत झाला असेल, या शिवरायांच्या महाराष्ट्रात झाला असेल, तर यापेक्षा मोठं भाग्य जगात दुसरं कोणतं असू शकतं? कारण आपण फक्त एका राज्यात जन्माला आलो नाही. आपण शिवरायांच्या स्वराज्याच्या भूमीत जन्माला आलो आहोत.

चंद्रशेखर सकपाळ

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या