🟪 तामीळनाडूतील क्रांती-प्रतिक्रांती 💢 असंख्य क्रांतिकारी कायद्यांची प्रत्यक्षात अमलबजावणी! (भाग-2)

 

🟪 तामीळनाडूतील क्रांती-प्रतिक्रांती

💢 असंख्य क्रांतिकारी कायद्यांची प्रत्यक्षात अमलबजावणी! (भाग-2)

वृत्त एकसत्ता न्यूज 

 संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

अकलूज दिनांक 23/05/2026 :

ओबीसी नेते करूणानिधी व स्टॅलिन (नाभिक) यांनी तर पेरियार यांच्या ब्राह्मणविरोधी सांस्कृतिक संघर्षाला अधिक तीव्रपणे टोकदार केले. सामी पेरियार यांच्या क्रांतीकारक अ-ब्राह्मणी फुलेवादी चळवळीतून जे क्रांतीकारक राज्यकर्ते निर्माण झालेत त्यांनी आपल्या 59 वर्षांच्या कारकिर्दीत पुढीलप्रमाणे जाती-अंतक अ-ब्राह्मणी निर्णय घेतलेत-

DMK व AIADMK हे दोन्ही पक्ष सामी पेरियार यांना व त्यांच्या ‘अ-ब्राह्मणी’ तत्वज्ञानाला पक्षाचा मुख्य पाया मानतात. AIADMK चे एम.जी.आर. व जयललीता हे ब्राह्मण असले तरी त्यांचा पक्ष ओबीसींचे वर्चस्व असलेला आहे. तामीळनाडूत हे दोन्ही पक्षच आलटुन-पालटून सत्तेत येत असतात. या दोन्ही पक्षांनी आपापल्या कारकिर्दित ब्राह्मणवादी छावणीला पराभूत करण्यासाठी ब्राह्मण जातीच्या विरोधात अनेक क्रांतिकारक व आक्रमक कायदे केले आहेत. या दोन्ही पक्षांमुळेच 1) आरक्षणाची मर्यादा वाढत गेली व 69 टक्क्यांपर्यंत पोहोचली. 2) २६ जानेवारी १९५० पासून अमलात येत असलेल्या भारताच्या संविधानात धर्मावर आधारित आरक्षण देण्याची तरतूद नाही, परंतू तामीळनाडूच्या सरकारने भारतीय संविधानाला न जुमानता मुस्लीम आरक्षण आजही चालू ठेवले आहे व या धार्मिक आरक्षनाला रद्द करण्याची हिम्मत ना केन्द्र सरकारकडे आहे, ना सुप्रिम कोर्टाकडे 3) भारतीय संविधानात ओबीसींना आरक्षण नाही, फक्त ३४० व्या परिच्छेदानुसार आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे. तामीळनाडू सरकारने संविधानाला बाजूला ठेवून आपल्या 1921 व १९२७ च्या कायद्यानुसार ओबीसींना आरक्षण देणे चालूच ठेवले आहे 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानातील आरक्षण कायद्याचा सिद्धांतच सुप्रिम व हाय कोर्टाने असंवैधानिक ठरवून संपूर्ण देशातील दलित-आदिवासींचे आरक्षण रद्द केले, तेव्हा संपूर्ण देशातील दलित-आदिवासींचे आरक्षण वाचविण्यासाठी डी.एम.के. पक्षाने केन्द्र सराकारला झुकवले व पहिली घटनादुरुस्ती (1951) करायला भाग पाडून दलित-आदिवासींचे आरक्षण वाचविले. 5) राज्यघटनेत आरक्षणासाठी फक्त Sc, St व OBC या तीनच कॅटिगिरी केलेल्या आहेत. परंतू तामीळनाडूच्या क्रांतीकारी DMK पक्षाच्या सरकारने या कॅटेगिरींचे पोट-वर्गीकरण (Classification) आरक्षणाची विभागणी (Quota within Quota) करून दिलेली आहे. तामीळनाडूत सर्व अ-ब्राह्मण जाती-धर्मांच्या लोकांना आरक्षणाचा एकसमान फायदा मिळत असल्याने तेथे जाती-जातीत व धर्मा-धर्मात भांडने लावायचे संघ-भाजपाचे षडयंत्र यशस्वी होउ शकत नाही. 6) 50 टक्क्यांपेक्षा जास्त असलेले 69 टक्के आरक्षण टिकविण्यासाठी 1994 साली दुसरी घटना-दुरूस्ती करायला भाग पाडणे, 7) सुप्रिम कोर्ट, हाय कोर्ट, पार्लमेंट, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल यासारख्या संवैधानिक व शक्तीशाली संस्थांना झुकविणे 8) स्टॅलिन पुत्र उदयनिधी यांनी एका जाहीर कार्यक्रमात ‘सनातन (ब्राह्मणी) धर्म नष्ट करण्याची आवश्यकता’ सांगीतली. 9)  चेन्नईच्या चौकात गणपतीची मुर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करणार्‍यांना पळवून लावणे व मुर्ती तोडून फेकून देणे, 10) शासकीय पुजा-विधीच्या कार्यक्रमातून एका मंत्र्याने ब्राह्मणाला लाथ मारून हाकलून लावणे, 11) तामीळनाडू राज्यातून कॉंग्रेस, संघ, भाजपा यासारख्या ब्राह्मणवादी पक्ष-संघटनांना निर्जीव करून टाकले आहे, 12) हिन्दू मंदिरातून ब्राह्मण पुजार्‍यांची कायद्याने हकालपट्टी करण्यात आलेली आहे, 13) हिन्दी भाषा, क्रीमी लेयर, ब्राह्मण व क्षत्रीय जातींचे EWS आरक्षण, मेडिकल NEET परिक्षा या संदर्भातील केन्द्राने व सुप्रिम कोर्टाने लादलेले कायदे ठोकरून लावणे. अशा अनेक क्रांतिकारक घटना केवळ तामिळनाडूमध्येच घडू शकतात. कारण तामिळनाडू हे प्रदिर्घ सांस्कृतिक संघर्षातून ‘अ-ब्राह्मणी राष्ट्र’ म्हणून सिद्ध झालेले आहे. भारतातल्या या पहिल्या व एकमेव ‘अ-ब्राह्मणी राष्ट्राचे’ राष्ट्रपिता आहेत सामी पेरियार व प्रधानमंत्री आहेत स्टॅलीन! सामी पेरियार ह्यांनी फुलेवादाला निरिश्वरवादाची झालर लावून ‘ब्राह्मणी-अब्राह्मणीवादाची उच्चतर पातळीवर मांडणी केली व यशस्वीपणे अमलातही आणली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर होताच एका फेसबुक मित्राने पाठविलेली पोस्ट वाचणे आवश्य आहे. ही पोस्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. ती पुढीलप्रमाणे-

‘‘तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि त्यांच्या द्रमुकचा कालच्या विधानसभा निकालात पराभव झाला. बंगाल आणि आसामचा निकाल काही प्रमाणात अपेक्षित होता. पण केरळ आणि तमिळनाडूचा निकाल माझ्यासाठी नक्कीच अनपेक्षित होता. 

एम. के. स्टॅलिन यांच्या पराभवाने एकूणच देशाच्या राजकारणातील एक मोठा खेळाडू  मैदानातून बाहेर (तात्पुरता का होईना) गेला.  

विजयच्या नेतृत्वाखालील नवख्या पक्षाने द्रमुकचा पराभव केला ही गोष्ट जास्त धक्कादायक आहे.

स्टॅलिन यांचं आणि माझं वैयक्तिक काही घेणं देणं नाही. पण या माणसाने भाषिक आणि आर्थिक मुद्द्यावर गेल्या ५ वर्षांत जे काम केलं त्यानंतरही पराभव होणार असेल तर मग एखाद्या मुख्यमंत्र्याने आणखी काय करणं अपेक्षित आहे हे कळत नाही...

स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील २०२४-२५ या आर्थिक वर्षात तमिळनाडूच्या GSDP मध्ये (राज्याचं सकल उत्पादन) १६% वाढ झाली. आणि गेल्या १४ वर्षांत पहिल्यांदाच तामिळनाडूने दोन अंकी वाढ गाठली. 

२०२१ ते २०२३ या दोनच वर्षांत स्टॅलिन सरकारने राज्यामध्ये ९.७४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आणि ३१ लाख रोजगार निर्माण केले. यामुळे तमिळनाडू हे देशात सर्वाधिक कारखाने आणि औद्योगिक कामगार असलेलं राज्य बनलं. तमिळनाडू २०३१ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतं असा अंदाज फेब्रुवारी २०२६ मध्ये तमिळनाडूच्या आर्थिक सर्वेक्षणाने वर्तवला होता .

मुख्यमंत्री म्हणून स्टॅलिन यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि महिलांसाठी मोफत बसपास अशा अनेक  योजना राबवल्या. "शिक्षण हे फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नसावी", हे अण्णादुराई यांचं स्वप्न होतं. स्टॅलिन कदाचित तेच काम पुढे चालवत होते.

 पण त्याहून सर्वात महत्त्वाचं स्टॅलिन यांची खरी ताकद दिसून येते ती केंद्र सरकारला कोणत्याही मुद्द्यावर विशेषतः भाषिक मुद्द्यावर फाट्यावर मारायची. वेगवेगळ्या काळात जेव्हा जेव्हा तमिळ भाषेवर (आणि इतर भाषांवरही) हिंदी नावाचं संकट आलं, तेव्हा स्टॅलिनने (आणि अर्थातच त्यांच्या पूर्वसुरींनी) जोरदार लढा दिला आणि ते संकट रोखलं. पण तीन भाषा धोरणाच्या नावाखाली हिंदी लादण्याचा धोका आजही सर्वांच्या डोक्यावर तलवारीसारखा टांगलेला असताना स्टॅलिन यांचा पराभव होणं म्हणजे इतर भाषांचा पाय आणखी खोलात जाण्यासारखं आहे. 

स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला थेट वेळोवेळी प्रश्न विचारले होते. हल्लीचे त्यांचे प्रश्न बघितले उदा. "NEET परीक्षेचा प्रश्न असेल, तमिळनाडूला न मिळालेल्या विशेष निधीचा प्रश्न असेल आणि परिसीमन विधेयकाचा प्रश्न असेल. 

यात राजकारण, त्यांचा स्वार्थ नक्कीच आहे पण द्रविड चळवळीचा वारसा ते टिकवू पाहत होते यात दुमत नसावं.

अण्णादुराई यांनी १९५०-६० च्या दशकात भाषेचा खऱ्या अर्थाने वापर केला. त्यानंतर करुणानिधींनीही वापर केला आणि स्टॅलिन यांनी याच भाषेचा वापर २१व्या शतकाच्या राजकारणात अत्यंत प्रभावीपणे करून केंद्र सरकारला गुडघे टेकायला भाग पाडलं.

त्यांनी NEET मधून राज्याला सूट मिळवण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा धोरणाला प्रखर विरोध केला. शिक्षण हा राज्याचा विषय असायला हवा आणि तो समवर्ती सूचीमधून बाहेर काढावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. राज्याची स्वायत्तता जपण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीदेखील स्थापन केली होती. 

ऑगस्ट २०२५ मध्ये व्हिएतनामी इलेक्ट्रिक वाहन कंपनी VinFast ने तुतीकोरिनमध्ये २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून मोठा कारखाना सुरू केला. यातून तब्बल ३,५०० नोकऱ्या निर्माण होणार आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये टाटा मोटर्स आणि Jaguar Land Rover ने राणीपेटमध्ये १.१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून नवीन प्रकल्पही सुरू केला.

इतकं करूनही एखाद्या माणसाचा पराभव होत असेल तर त्याने नक्की काय करावं हा सामान्य माणूस म्हणून मला पडलेला प्रश्नच आहे.

पण हा प्रश्न मला पडलेला आहे स्टॅलिनना नाही. पराभव झाला असला तरी काल त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट लिहून आपलं निवेदन जाहीर केलं, त्याचा सारांश पुढीलप्रमाणे-

"विधानसभेच्या निवडणुकीत DMK आघाडीवर विश्वास ठेवून मतदान केलेल्या सर्व १.५४ कोटी जनतेचे मी मनापासून आभार मानतो. जिंकलेल्या पक्षाला आपल्यापेक्षा फक्त ३.५२ टक्के मते जास्त मिळाली आहेत. हा जनतेचा आपल्यावरचा भक्कम विश्वासच आहे. मी द्रमुकच्या सर्व विजयी उमेदवारांना विनंती करतो की त्यांनी थेट जनतेत जाऊन त्यांचे आभार मानावेत.

    द्रमुकने आजवर अनेक विजय आणि पराभव पाहिले आहेत. पण आपले धोरण आणि विचार कधीही डगमगले नाहीत. पक्षाचे कार्यकर्ते हीच आमची खरी ताकद आणि रक्तवाहिन्या आहेत. तुमच्या साथीमुळेच मला बळ मिळतं.

      सत्तेत असताना आपण लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. आता एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून आपण जनतेच्या हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी नक्की लढू.

   पेरियार, अण्णा(दुराई) आणि कलैग्नार (एम. करुणानिधी) यांच्या विचारांचा वारसा जपत, आपली संस्कृती (द्रविड), भाषा आणि राष्ट्र वाचवण्याची ही चळवळ आपण अशीच पुढे नेऊ. आपण खचणार नाही आहोत, आपण पुन्हा नक्की जिंकू!"

पराभव झाला असला तरी एम. के. स्टॅलिन यांनी राज्याच्या विकासासाठी आणि हक्कांसाठी दिलेला लढा आणि त्यांची दूरदृष्टी तमिळनाडूच्या इतिहासात कायम लक्षात राहील.’’

भारतातील एकमेव अशा या जातीअंतक क्रांतीकारक पक्षाला पराभुत करण्यासाठी संघ-भाजपा ने काय काय काटस्थाने केलीत व या ब्राह्मणी कारस्थानात विजय नावाच्या दलित-ख्रिश्चन नेत्याची नेमकी काय भुमिका आहे, हे आपण लेखाच्या तिसर्‍या भागात पाहु या!    

लेखक - प्रोफे. श्रावण देवरे,

ओबीसी राजकीय आघाडी,                                                  81 77 86 12 56 


या लेखाच्या मराठी pdf ची फाईल पुढील लिंकवर मिळेल.

https://drive.google.com/file/d/1REtFsgroYgvOdc23YX-vP79gfM2yuKuJ/view?usp=drive_link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या