"मीना - मौत मुबारक हॊ!"

 "मीना - मौत मुबारक हॊ!"

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/04/2026 :

'हॅपी बर्थडे '

'हॅपी अनिव्हर्सरी'

'हॅपी दिवाली'

'ईद मुबारक' 

अशा प्रकारच्या शुभेच्छा मी यापूर्वी अनेकदा दिल्या आहेत आणि मलाही अनेकांनी दिल्या आहेत. पण...

'मृत्यूबद्दल अभिनंदन!'

हे यापूर्वी मी ना कधी ऐकलंय ना कधी म्हटलंय.

पण मीना, तुझी एक मोठी बहीण म्हणून मी तुझं ,  मृत्यूबद्दल अभिनंदन करतेय! आता तुला एकच कळकळीची विनंती की पुन्हा कधी या निर्मम जगात पाऊल टाकू नकोस. या निष्ठुर जगात तुझ्यासारख्या व्यक्तींसाठी कोणतीही जागा नाही.

'मधुबाला' गेली तेव्हा तिला शेवटचं स्नान मीच घातलं होतं. तिच्या निष्प्राण चेहऱ्यावर कफनही मीच घातलं. निर्माता एस. यू. सनीने अंतिम श्वास घेतला त्या क्षणी मी त्याचे हात माझ्या हातात धरले होते. आजपर्यंत फिल्म लाईनमधल्या वा बाहेरच्या जगातल्या अनेकांचे मृत्यू मी पाहिले आहेत. पण  मीनाच्या निधनामुळे मी जशी 'हलले' तसं याआधी कधीच झालं नव्हतं . खरं म्हणजे ती गेली तेव्हा मी तिथे नव्हतेच. ना मी तिला अंतिम स्नान घातलं ना कफन चढवलं. मी जम्मूमधे होते त्यावेळी. मुंबईला परत आल्यावर तडक तिला जिथं दफन केलं होतं त्याजागी गेले. तिथं इतकी रडले की माझी आई गेली तेव्हासुद्धा इतकं रडले नव्हते. 'आता पुरे' असा मीनाचाच आवाज कानात घुमल्याचा भास झाला तेव्हाच मी रडायची थांबले. 

'मैं चूप रहूँगी'चं शूटिंग मद्रासमधे चालू होतं. माझे पती सुनील दत्त यांनी मला आणि मुलांना तिकडे बोलावलं होतं. माझ्या रूमच्या शेजारीच मीनाची खोली होती. खरं तर ती आमची दुसरीच भेट होती. पण मला बघताच ती म्हणाली, "मला तुमच्याविषयी खूप आदर वाटतो. मी तुम्हाला 'बाजी (मोठी बहीण)' म्हटलं तर चालेल ना? त्याच क्षणी आमचं मैत्र जुळलं.

मद्रासमधे एकदा चायनीज खायला जायचा बेत केला. मीनाला विचारलं. पण ती म्हणाली, "तुम्ही दोघं जा. मी तुमच्या मुलांना सांभाळते!" आम्ही रात्री 11 ला परतलो तेव्हा तिच्या एका बाजूला अडीच वर्षाचा संजय आणि दुसऱ्या बाजूला दोन महिन्यांची नम्रता शांत झोपले होते. आमच्या 'नानी'नं सांगितलं की दोन्ही मुलांचं सगळं मीनानं स्वतः आवरलं होतं. मीनाच्या निद्रिस्त चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. मला वाटलं की हिला स्वतःचं मूलबाळ झालं की हिचं जीवन परिपूर्ण होईल.

नंतर एका रात्री ती मला हॉटेलच्या बागेत फिरताना दिसली. तिला चालताना दम लागत होता. तिला विचारलं तर म्हणाली, 'मी तंबाखू खाते म्हणून मला दम लागतो.' पण मला दिसत होतं की ती अतीश्रमामुळे थकली होती. मी विचारलं, "तुला आई व्हावं असं वाटत नाही का?" ती म्हणाली, "अशी कोणती स्त्री असेल जिला मातृत्व नको आहे?" तिच्या डोळ्यांच्या भिंतीमागे साचलेलं पाणी मला दिसत होतं. त्या रात्री तिच्या खोलीतून जोरजोरात हिंसक भांडणाचे आवाज ऐकू आले. नंतर मी कमाल अमरोही साहेबांचे सेक्रेटरी बाकर अली यांना गाठून विचारलं, "तुम्ही तिला मारून टाकणार आहात का? तिनं किती कष्ट करायचे? तिला विश्रांतीची गरज आहे!" बाकर म्हणाले, "बेबी, तुला काही समजत नाही. 'योग्य वेळी' विश्रांती देऊ तिला!"

काही दिवसांनी समजलं की तिनं कमाल अमरोही साहेबांचं घर सोडलं. तिचं मद्यपान वाढू लागलं. तिला कावीळ झाली. तिला दवाखान्यात भेटायला गेले तेव्हा तिची त्वचा पिवळी पडली होती. 'तू आता मुक्त आहेस ना, मग दारू का पितेस?' असं मी काकुळतीनं विचारलं. ती म्हणाली, 'माझ्या सहनशक्तीलाही मर्यादा आहे.'पिंजरे के पंछी' च्या सेटवर बाकरनी माझ्यावर हात उगारला. मी कमाल साहेबांना कळवलं. मला वाटलं ते धावत सेटवर येतील. पण त्यांचा निरोप आला की घरी आल्यावर चर्चा करून काय ते ठरवू. म्हणून मी घर सोडलं!' 

नंतर तिच्या जीवनात धर्मेंद्र आला. तिला जगातली सारी संपत्ती मिळाल्याचा आनंद झाला. तिच्या आयुष्यातला तो सर्वोत्तम काळ! पण लवकरच दोघांत बेबनाव झाला आणि धर्मेंद्र तिच्या आयुष्यातून निघून गेला. "एकाकी राहणं हेच माझ्या नशिबी आहे. मला आता माझी कीव वाटत नाही आणि तू ही माझी कीव करु नको!" असं ती मला म्हणाली. 

तरी 'पाकिझा'चं बंद पडलेलं शूटिंग पुन्हा सुरु करावं म्हणून दत्त साहेब आणि मी खूप प्रयत्न करून समझोता घडवून आणला. पाकिझाच्या प्रीमियरला ती थिएटरच्या द्वारापाशी उभी होती. मला पाहताच तिनं घट्ट मिठी मारली. पण दत्त साहेबांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी पिक्चर पूर्ण न बघताच उठले. 'पूर्ण पिक्चर पाहून तुला प्रतिक्रिया कळवते' असं मी तिला सांगितलं. पण अजून मी तो सिनेमा पूर्ण पाहिलेला नाही. आता ती गेल्यावर तर माझ्यात ते धाडसच नाही. पाकिझाची गाणी ऐकायचीही हिंमत नाही आता.

या प्रीमियर नंतर मी जम्मू - पठाणकोटला गेले. जाताना तिच्या बहिणीला - मधुला- सांगून गेले, '1 एप्रिलला परत आल्यावर भेटेन असं सांग तिला!' मधुनं माझा निरोप सांगितल्यावर मीना म्हणाली, "जेव्हा ती परत येईल तेव्हा मी नसेन!" पण मधुनं मला हे सांगितलंच नाही. नाहीतर मी तिला सोडून गेलेच नसते. 

नुकताच आम्ही आमच्या घरातल्या थिएटरमधे तिच्या 'गोमती के किनारे'चा ट्रायल शो बघितला. जणू मीनाचीच कहाणी पडद्यावर अवतरली होती. तिनं आयुष्यभर इतरांसाठी कष्ट केले पण 'आपलं म्हणावं' असं तिच्या आयुष्यात कुणी उरलं नाही. स्त्रीला केवळ 'मित्राची' नव्हे तर 'स्वतःच्या फॅमिलीची' फार गरज असते. पण तिच्या जीवनात ही पोकळी कायमच राहिली. ती एकाकीच जगली आणि एकाकी गेली. मृत्यूनं तिची सुटकाच केली एका अर्थी.. म्हणून तिचं अभिनंदन.

मीना, मौत मुबारक हॊ! 

('नर्गिस' यांनी मीनाकुमारीच्या निधनानंतर जून 1972 मधे लिहिलेला लेख)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या