🟩 यंदाचा ऊस गाळप हंगाम संपला; सर्वाधिक साखर उत्पादन व उताऱ्यात कुणी मारली बाजी?
🟦 २०२६-२७ या आर्थिक वर्षात १ हजार लाख टन ऊस गाळपास उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज
डिजिटल शेतकरी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/04/2026 : हंगामाच्या सुरुवातीला १०६ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज असताना हंगामाच्या अखेरच्या काळात उसाला आलेले तुरे यामुळे उत्पादनात घट झाली. परिणामी साखर उतारा चांगला असतानाही प्रत्यक्ष साखर उत्पादन सात लाख टनांनी घटले आहे. मात्र, गेल्या गाळप हंगामाच्या तुलनेत यंदा १८ लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.
यंदा देशात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ८९ लाख टन, तर कर्नाटकमध्ये ४७ लाख टन साखर उत्पादित झाली. राज्यात यंदा एक नोव्हेंबर रोजी ऊस गाळप हंगामास सुरुवात झाली. त्यात १०३ सहकारी व १०७ खासगी अशा २१० कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली.
साधारण पाच महिन्यांच्या काळात राज्यात १ हजार ४५ लाख टन ऊस गाळपास उपलब्ध झाला. त्यातून ९.४९ टक्के उताऱ्यातून ९९ लाख १८ हजार टन साखर उत्पादित झाली.
सर्वाधिक २३ लाख टन साखर कोल्हापूर विभागातून तर त्या खालोखाल पुणे विभागात २२ लाख टन तर सोलापूर विभागात १९ साखर उत्पादित केली आहे.
अहिल्यानगर विभागात ११ लाख टन, संभाजीनगरमध्ये १० व नांदेड विभागात ११ लाख टन साखर उत्पादित केली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या आकडेवारीनुसार साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे.
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशात ८९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात ९० लाख टन तर महाराष्ट्रात ८० लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते. यंदा महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला मागे टाकले आहे. यंदा उत्तर प्रदेशानंतर कर्नाटकात ४७ लाख टन साखर उत्पादित झाली.
अंदाज असा आहे
◼️राज्यात साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाची उपलब्धता बघता १०६ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला होता.
◼️मात्र, हंगामाच्या अखेरीस मराठवाड्यात उसाला आलेल्या तुऱ्यांमुळे उत्पादनात घट झाली.
◼️प्रत्यक्षात साखरउतारा चांगला मिळत असला तरी ऊस उत्पादन घटल्याने साखर उत्पादनही घटले.
0 टिप्पण्या