🔰 ई-पेपर म्हणजे काय ?

 🔰  ई-पेपर म्हणजे काय ? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/04/2026 :

वर्तमानपत्र ही आपल्यापैकी बहुतेकजणांची गरजच बनलेली आहे. त्यामुळे आता टीव्हीवरून वार्तापत्र सुरू झाली, दिवसाचे चोवीस तास ब्रेकिंग न्यूज येऊ लागल्या, तरी सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैन पडत नाही. कधी कधी सुट्टीमुळे एखादे दिवशी वर्तमानपत्र प्रकाशित होत नाही, त्या दिवशी चुकल्या चुकल्या सारखे काहीतरी हरवल्या सारखे वाटत राहते. याचीच भरपाई आता ई पेपर करू पाहत आहे. 

ई पेपर हा नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार तर आहेच पण तंत्रज्ञानातील प्रगतीपायी आपल्या जीवनशैलीत जे बदल नकळत होत असतात त्याचीच प्रचिती देणारा आहे. गेली काही शतके वर्तमानपत्र मुद्रित स्वरूपात प्रकाशित होत आहेत. याचा अर्थ त्यात बदल झाले नाहीत असा नाही. सुरुवातीला वर्तमानपत्र शिळाप्रेसवर छापले जात. त्यातील मजकुराची जुळवाजुळव हातांनी करावी लागे. त्यातील वार्तासंकलन मर्यादित असे. कारण दूरवरच्या जागी झालेल्या घटनांची माहिती वर्तमानपत्राच्या कचेरीत पोचवण्याची साधनेही मर्यादित होती. पण टपाल, तार, दूरध्वनी, फॅक्स यासारखी साधने उपलब्ध होत गेली, तसा वर्तमानपत्रातील वार्तांचा आवाकाही विस्तारात गेला. नुसत्याच मजकुरा ऐवजी छायाचित्र येऊ लागली. बघता बघता ती रंगीत झाली.

पण संगणक आले तशी वर्तमानपत्रांची जुळवा जुळवही संगणकाच्या माध्यमातून होऊ लागली. संपूर्ण पानाची जोडणी संगणकाकरवी होऊन ती त्याच्या पडद्यावर दिसू लागली. असे तयार झालेले पान इतर आवृत्त्यांच्या कचेरीत पाठवून तिथे त्याची छपाई करणे शक्य झाले. पण असे जर सगळे पान किंवा सगळे वर्तमानपत्रच संगणकाच्या पडद्यावर दिसते तर मग ते तसेच थेटच्या थेट वाचकापर्यंत का नाही पोचवता येणार, असा विचार सुरू झाला. तोपर्यंत अर्थात इंटरनेटच्या जाळ्याने सारे जग व्यापून टाकले होते. मोबाइल फोनवरही इंटरनेट उपलब्ध होऊ लागले होते. आय पॅड सारखी जगभरातील कोणतेही मुद्रित नियतकालिक, कोणतेही दृश्य, चलचित्र, संगीत वगैरे घरबसल्या उपलब्ध करून देणारी साधने येऊ लागली होती. त्यामुळेच मग अशा प्रकारे संगणकाच्या पडद्यावर सहजगत्या दिसू शकणारा आणि वाचता येऊ शकणारा ई पेपर तयार झाला. आता अनेक आघाडीच्या वर्तमानपत्रांची ई पेपर आवृत्ती प्रकाशित होत असते. कागदावर छापलेले वर्तमान पत्र जसे दिसेल, जसे हाताळता येईल तसेच दिसणारे, तशाच प्रकारे हाताळत असल्याचा अनुभव देणारे, ई वर्तमानपत्र आता उपलब्ध झालेले आहे.

डॉ. बाळ फोंडके यांच्या 'काय?' या पुस्तकातून

संदर्भ : दिनविशेष आणि विज्ञान

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या