हॉर्मुझची धग अन् चीनचा 'मलक्का डायलेमा

 

हॉर्मुझची धग अन् चीनचा 'मलक्का डायलेमा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 08/04/2026 :

सध्या मध्यपूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गळाचेपी होत आहे. इराणने 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' (हॉर्मुझची सामुद्रधुनी) रोखून धरल्याने जगातील २० टक्के तेल पुरवठा धोक्यात आला आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि विकसित राष्ट्रांना रसद पुरवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.इराणने जे 'हॉर्मुझ'मध्ये केले, तेच भारत 'मलक्का'मध्ये करू शकतो, ही भविष्यातील भीती आता चीनला सतावत आहे.

इतिहासात देखील एका भारतीय राजाने अर्थकारणातून मलक्का सामुद्रधुनीवर पूर्ण वर्चस्व मिळवले होते.

भारतीय इतिहासाची पाने उलटली की अनेकदा आपल्याला उत्तर भारतातील साम्राज्यांचे आणि त्यांच्या जमिनीवरील लढायांचे वर्णन वाचायला मिळते. परंतु, १० व्या आणि ११ व्या शतकात दक्षिण भारताच्या भूमीतून एका अशा साम्राज्याचा उदय झाला, ज्याने केवळ भारतच नव्हे, तर समुद्र पार करून आग्नेय आशियावर आपला दरारा निर्माण केला होता. हे साम्राज्य म्हणजे 'चोल साम्राज्य' आणि या विजयाचा महानायक होता सम्राट राजेंद्र चोल प्रथम.

कोणतेही युद्ध केवळ जमिनीसाठी नसते, काही युद्धे अस्मितेसाठी असतात. राजेंद्र चोल आणि श्रीविजय साम्राज्य (आधुनिक इंडोनेशिया, मलेशिया) यांच्यातील संघर्षाला अशाच एका अपमानाची पार्श्वभूमी होती. श्रीविजयचा राजा 'संग्राम विजयातुंगवर्मन' याने चीनच्या दरबारात चोल सम्राटांना आपले 'मांडलिक' (जागीरदार) म्हणून संबोधले होते. हा केवळ शब्दच्छल नव्हता, तर तो एक 'जियोपॉलिटिकल' अपमान होता. याच बरोबर मलाक्का सामुद्रधुनीचे महत्त्व आणि अडवणूक या संघर्षाचे सर्वात मोठे केंद्र होते 'मलाक्काची सामुद्रधुनी' (Strait of Malacca). हा जलमार्ग आजही जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी एक मानला जातो. भारत आणि चीन यांच्यातील सागरी व्यापारासाठी हा एकमेव नैसर्गिक रस्ता होता. श्रीविजयच्या राजाने या मलाक्का खाडीवर आपले पूर्ण नियंत्रण मिळवले होते. तिथून जाणाऱ्या प्रत्येक तामिळ व्यापारी जहाजाकडून तो अवाजवी कर वसूल करू लागला आणि व्यापाऱ्यांची अडवणूक सुरू झाली. तामिळ व्यापाऱ्यांच्या संघांनी जेव्हा ही तक्रार राजेंद्र चोल यांच्याकडे केली, तेव्हा त्यांनी केवळ व्यापारासाठीच नव्हे, तर आपल्या साम्राज्याच्या सन्मानासाठी श्रीविजयला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

जगातील पहिले 'पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप' नौदल

राजेंद्र चोल यांची रणनीती थक्क करणारी होती. इतिहासकारांच्या मते, चोल राजांकडे कायमस्वरूपी अवाढव्य नौदल नव्हते. मग त्यांनी २००० किमी दूर हल्ला कसा केला? त्यांनी तत्कालीन 'तामिळ व्यापारी संघांशी' हातमिळवणी केली. व्यापाऱ्यांची अवाढव्य जहाजे आणि राजाचे कसलेले सैनिक, अशा युतीने जगातील एक शक्तिशाली नैदल तयार झाले.

इसवी सन १०२५ मध्ये चोल सैन्याने श्रीविजयच्या 'केदाह' (Kedah) बंदरावर अचानक हल्ला चढवला. श्रीविजयच्या राजाला वाटले की हा नेहमीचा व्यापारी ताफा आहे, पण जहाजांचे दरवाजे उघडताच तिथून मृत्यूचे तांडव करणारे चोल सैनिक बाहेर पडले. मलाक्काच्या खाडीत झालेल्या या आरमारी युद्धात चोल सैन्याने श्रीविजय साम्राज्याचा पूर्ण पराभव केला.

राजेंद्र चोल यांनी तिथून सोन्या-चांदीपेक्षा मौल्यवान अशा दोन वस्तू भारतात आणल्या, त्या म्हणजे श्रीविजयच्या राजधानीचे 'विजयधारा' आणि 'श्रीविजय' हे दोन भव्य दरवाजे. हे दरवाजे त्यांनी आपल्या 'गंगईकोंडा चोलपुरम' या नवीन राजधानीत विजयाचे प्रतीक म्हणून लावले.

या विजयानंतर राजेंद्र चोल यांना 'कादाराम कोंडा' (केदाह जिंकणारा) ही पदवी मिळाली. आज १००० वर्षांनंतरही मलेशिया आणि सिंगापूरमध्ये चोल साम्राज्याच्या खुणा सापडतात. सिंगापूरमध्ये सापडलेला 'सिंगापूर स्टोन' हा चोल साम्राज्याच्या तिथल्या अस्तित्वाचा पुरावा मानला जातो.

आज जेव्हा भारत 'इंडो-पॅसिफिक' क्षेत्रात आपले स्थान मजबूत करत आहे, तेव्हा १००० वर्षांपूर्वी एका भारतीय राजाने मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत प्रस्थापित केलेले. या वर्चस्वाची लढाई आज देखील आहे 

मलक्काची सामुद्रधुनी'. भारत आणि चीन या दोन आशियाई महासत्तांमधील वर्चस्वाची खरी लढाई याच अरुंद समुद्री मार्गावर लढली जात आहे. हा मार्ग केवळ व्यापाराचा रस्ता नसून, तो चीनची सर्वात मोठी 'कमकुवत नस' आणि भारताचे सर्वात प्रभावी 'सामरिक अस्त्र' बनला आहे.​चीनची अर्थव्यवस्था प्रामुख्याने निर्यातीवर आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. धक्कादायक बाब म्हणजे चीनच्या गरजेच्या तब्बल ८० टक्के तेल आयात याच मलक्का सामुद्रधुनीतून होते. जर उद्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि भारताने आपल्या नौदलाच्या साहाय्याने हा मार्ग रोखला, तर चीनची ऊर्जा रसद पूर्णपणे तुटू शकते. माजी चिनी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांनी यालाच 'मलक्का डायलेमा' असे संबोधले होते. हा पेच सोडवण्यासाठीच चीन आता पाकिस्तानमधील सीपेक (CPEC) आणि म्यानमारमधील प्रकल्पांद्वारे पर्यायी मार्ग शोधण्यासाठी धडपडत आहे.

आज १००० वर्षांनंतर इतिहासाचे हे चक्र पुन्हा एकदा त्याच वळणावर येऊन उभे ठाकले आहे. इराणने 'हॉर्मुझ'मध्ये जे करून दाखवले, तेच सामर्थ्य भारत 'मलक्का'मध्ये बाळगून आहे..राजेंद्र चोल यांनी १०२५ मध्ये दाखवून दिले होते की, भारताचे लष्करी आणि व्यापारी हितसंबंध केवळ त्याच्या भूमीपुरते मर्यादित नसून ते अथांग सागरापर्यंत विस्तारलेले आहेत. आजचा भारत देखील 'इंडो-पॅसिफिक' क्षेत्रात त्याच 'चोल वारशाचा' आधुनिक हुंकार भरत आहे. अंदमान-निकोबार बेटांवरील भारताची लष्करी सज्जता ही केवळ संरक्षणासाठी नसून, ती चीनच्या 'मलक्का डायलेमा'ला दिलेले एक उत्तर आहे.

मलक्काची ही अरुंद सामुद्रधुनी भविष्यात आशियाचा 'कुरुक्षेत्र' ठरली, तर तिथे भारताचा विजय हा केवळ काळाचा महिमा नसून तो इतिहासाची पुनरावृत्ती असेल. 'कादाराम कोंडा' ही पदवी आजही भारतीय नौदलाच्या धमन्यांमध्ये संचारत आहे, याची जाणीव चीनला असणे, हेच भारताचे सर्वात मोठे राजनैतिक यश आहे.

समाधान वाघमारे 

8668239761

#China #india

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या