✍️ सत्य काय आहे ?

 संपादकीय पान.......✍️

✍️  सत्य काय आहे ?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक :  भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

अकलूज दिनांक 29/04/2026

समर्थ रामदास यांचा जन्म १६०८ला झाला. वयाच्या १२व्या वर्षी म्हणजे १६२०ला ते लग्नमंडपातून पळून गेले. त्यांनतर ते १२ वर्षे म्हणजे १६३२-३३ पर्यंत नाशिकला (टाकळी गाव) राहिले. नाशिकनंतर त्यांनी १२ वर्षे भारताची तीर्थयात्रा केली. म्हणजे १६४५ पर्यंत ते फिरतच होते. तोपर्यंत म्हणजे वयाच्या ३६ पर्यंत त्यांचे काही विशेष कार्य नाही. त्यांनतर त्यांनी मठ आणि मंदिरे स्थापण्याच्या कार्याची सुरुवात केली. त्यांनी एकूण ११ मारुती मंदिरे स्थापन केली. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे चाफळ येथील मंदिर १६४८ला स्थापन केले (शिवाजी महाराजांनी १६४६ लाच तोरणा घेतला होता). इथपर्यंतही रामदास काही प्रसिद्धीस पावले नव्हते. दासबोध त्यांनी लिहिला तो १६५४ला. दासबोधनंतरच ते समर्थ रामदास स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणजे किमान १६५४ पर्यंत शिवाजी राजेंना समर्थ रामदास हे माहीतही असण्याचे काही कारण नव्हते.

आता थोडे उपलब्ध पुरावे पाहू.

शिवाजीराजे आणि रामदास स्वामींची भेट १६४९ला झाली होती असा उल्लेख समर्थांच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी त्यांच्या वाकनिसाने (म्हणजे आजच्या भाषेत रेकॉर्ड किपरने) लिहून ठेवलेल्या एका नोंदीत आहे. त्यात त्यांनी '१६४९ला समर्थांचा शिवाजी राजांस चाफळ येथे अनुग्रह झाला' असे लिहिले आहे. अनुग्रह म्हणजे भेट असा अर्थ होऊ शकतो. किंवा नुसतेच शिवाजी राजांविषयी त्या ठिकाणी समर्थांना कुणीतरी सांगितले आणि ते ऐकून समर्थांच्या मनात शिवाजी राजांविषयी कृपाभावना निर्माण झाली असाही अर्थ होऊ शकतो. पण हे समर्थांच्या मृत्यूनंतर आणि ते देखील ही तथाकथित भेट घडून गेल्याच्या तब्बल ३१ वर्षांनंतर लिहीले गेले आहे. समर्थ हयात असतानाच्या कागदपत्रांत १६४९च्या अशा कोणत्याही भेटीचा उल्लेख नाही. त्यामुळे ३१ वर्षानंतर वाकनिसांची तारीख लिहिताना गफलत झाली असावी, किंवा इतर कुणाशी झालेल्या भेटीला त्यांनी शिवाजी राजांशी झालेली भेट असे चुकून लिहिले असावे हीच दाट शक्यता आहे. कसे ते पुढे पाहू.

समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या संभाव्य पहील्या भेटीचा उल्लेख हा रामदासांचे शिष्य केशव गोसावी यांनी दुसरे शिष्य दिवाकर गोसावी यांना १६७२ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात आहे. तोही भेट झाल्याचा नाही तर होणार असल्याचा उल्लेख आहे. त्यात ते लिहीतात की "ही समर्थ आणि राजे यांची पहीलीच भेट आहे, त्यामुळे त्यापूर्वी साफसफाई करणे, वाढलेली झाडेझुडपे कापणे इत्यादी कामासाठी वाडीच्या लोकांना बोलावून घ्या". या पत्रात ही दोघांची पहीलीच भेट होणार आहे असे स्पष्ट लिहीलेले आहे. या तारखेपर्यंत शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आलेले होते, आणि त्यांनी सुरतची दुसऱ्यांदा लूटही केलेली होती. म्हणजे थोडक्यात काय की या पहिल्या भेटीपर्यंत शिवाजी राजांनी ऑलरेडी स्वराज्य स्थापन केलेले होते, फक्त राज्याभिषेक बाकी होता. म्हणजे त्यांना स्वराज्यस्थापनेसाठी रामदासांची प्रेरणा होती वा मार्गदर्शन होते असे समजण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भेटच नाही तर मार्गदर्शन कसे होईल?

ही भेट मात्र नक्की झाली असावी. कारण १६७२च्या चाफळच्या दोघांच्या या भेटीनंतर शिवाजी महाराजांनी दत्ताजीपंत यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, “चाफळ येथे रामदास गोसावी आहेत. श्रींचे देवालय केले आहे. तेथे कटकीचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती, चोरा चिलट्यांचा उपद्रव होऊ न देणे.” या पत्रावरूनही हे स्पष्ट कळते की शिवाजी राजांना रामदास हे तेव्हाच माहीत झाले असावेत. एव्हढेच नाही तर दत्ताजीपंत (हे शिवाजी महाराजांचे वाकनीस म्हणजे रेकॉर्ड किपर होते-अष्टप्रधान मंडळातील एक) यांना रामदास कोण हे माहीत नसणार म्हणून राजेंनी ते गोसावी आहेत आणि त्यांनी मंदिर स्थापन केले आहे अशी त्यांची ओळख सांगितली आहे. जर रामदास शिवाजी राजांचे गुरु असते किंवा निदान शिवाजी राजे त्यांना आधी चांगले ओळखत असते तर अष्टप्रधानातील एका महत्वाच्या प्रधानास त्यांची अशी इंट्रो द्यावी लागली असती का?आणि जर १६४९ लाच खरेच दोघांची भेट झाली असती तर त्यांच्या मंदिरास होणारा चोरा चिलटांचा उपद्रव रोखावा हे सांगण्यासाठी शिवाजी राजांनी १६७२पर्यंत (म्हणजे तब्बल २३ वर्षे) वाट पाहीली असती का?

अजून एक पत्र उपलब्ध आहे जे रामदासांचे एक शिष्य भास्कर गोसावी यांनी दुसरे शिष्य दिवाकर गोसावी यांना १६५८ला लिहिले आहे. त्यात ते सांगतात की आम्ही भिक्षेसाठी शिवाजीराजांकडे गेलो आणि आम्ही रामदासस्वामी यांचे शिष्य आहोत असे सांगितले. त्यावर शिवाजी राजांनी त्यांना विचारले की "हे रामदासस्वामी कोण आहेत? कुठे राहतात आणि त्यांचे मूळ गाव कोणते?" याचा अर्थ हा होतो की १६५८ पर्यंत शिवाजीराजे यांस रामदासस्वामी कोण हे माहीतही नव्हते (नेमका हा काळ कोणता याच्या संदर्भासाठी लक्षात घ्या की शिवाजीराजांनी अफझल खानाला १६५९ला ठार मारले होते). यावर काही लोक असा युक्तिवाद करतात की शिवाजी महाराज या शिष्यांची परीक्षा पाहत होते. हे किती हास्यास्पद आहे..!! जर रामदासस्वामी खूप प्रसिद्ध असते वा शिवाजी राजांचे गुरु असते तर महाराजांचे हेरखाते इतके सक्षम होते की त्यांना या शिष्यांची आधीच माहीती असती. आणि अशी परीक्षा पाहण्याऐवजी त्यांनी उलटपक्षी त्यांचे आधीच प्रचंड स्वागत केले असते.

मात्र १६७२नंतर शिवाजी राजेंचा रामदासांशी चांगला परिचय झाला असावा असे दिसते. कारण यानंतर शिवाजी राजांनी रामदासांना सढळ हाताने त्यांच्या अनेक मठांसाठी मदत दिलेली आहे. त्यांना वास्तव्यासाठी सज्जनगड दिलेला आहे. राज्याभिषेकानंतर १६७८ च्या एका पत्रात शिवाजी राजांनी समर्थांस लिहिले आहे की "तुम्ही मला धर्मस्थापनेसाठी राज्य चालवा, देवाब्राह्मणांची सेवा आणि प्रजेची पीडा दूर करा असे सांगितले होते ते मी आपण सांगितल्याप्रमाणे करत आहे. तसेच मी मागे एकदा आपल्या चरणी माझे राज्य अर्पण करत होतो तेव्हा तुम्ही ते नाकारून आपले राजकर्तव्य निभावणे चालू ठेवा तीच खरी सेवा आहे असे मला सांगितले होते". 

अर्थात मी माझे राज्य तुम्हाला अर्पण करतो असे म्हणणे ही खरेतर एक राजकारणी चातुर्याची मखलाशी आहे. ती हुशार राजकर्त्यांनाच जमते. या अशा ऑफर्स खऱ्या नसतात मात्र त्या दोन्ही पार्टीजला प्रचंड महान ठरवण्यास नक्की कारणीभूत होतात. आणि मी माझे सर्वस्वच तुम्हाला देतोय असे म्हंटले की समोरच्यालाही आपोपाप तुलनेने छोट्या छोट्या तक्रारी वा मागण्या रेटून धरण्यास लाज वाटते. समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज हे दोघेही बुद्धिमान होते, मात्र शिवाजी महाराज बरेच जास्त बुद्धिमान होते.

याच पत्रात शिवाजी राजांनी समर्थांस तब्बल ३३ गावे, ४१९ बिघे जमीन, १ कुरण आणि १२१ खंडी धान्य दिले असल्याचा उल्लेख आहे. म्हणजे दोघांत घनिष्ठ परिचय झाला असावा, पण केव्हा? तर दोघेही स्वतंत्रपणे आणि वैयक्तिकरित्या कर्तृत्वसिद्ध झाल्यावर. आणि दोघांतले हे संबंध गुरुशिष्याचे नव्हते तर एक प्रकारचे म्युच्युअल फायद्याचे होते. म्हणजे शिवाजी राजांशी स्नेह ठेवल्यामुळे रामदासांना त्यांच्या मठ आणि मंदिरांच्या देखभालीसाठी वरीलप्रमाणे भरपूर मालमत्ता व सुरक्षा मिळत होती, आणि रामदास स्वामी हे सामान्यांसोबत कर्मठ वर्गातही विशेष आदराचे स्थान धरून असल्यामुळे शिवाजी राजांना त्यांच्याकरवी राज्याभिषेकापासून नाराज वा विरोधात असलेल्या कर्मठ आणि सनातनी मंडळींस शांत ठेवण्याचे काम साध्य होत होते. म्हणजे दोघांतील संबंध हे पारस्पारिक हिताचे आणि एकप्रकारचे व्यावहारीक अन्योन्य संबंध होते. दोघांपैकी कोणी कुणाचे गुरु नव्हते आणि कुणी कुणाचे शिष्य नव्हते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या