पुतळ्यांच्या अनाधिकृत उभारणीत एक पॉवर पॉलिटिक्स

पुतळ्यांच्या अनाधिकृत उभारणीत एक पॉवर पॉलिटिक्स 

वृत्त एकसत्ता न्यूज

सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात लोकांच्या भावनांचा वापर करून अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.त्यात सोशल मीडियात समाजाच्या नावाने अकाऊंट उघडून त्याला जातीचे नाव देऊन शिव्या देणारे आहेत. आणि ग्राऊंड लेव्हलला सोशल मीडियात व्हिडिओ टाकून एखादे बिजनेस मॉडेल उभारणारे पण अनेक आहेत.त्यात सगळ्यात हुशार निघाला बेवडा बाळ्या आवारे.या बाळ्याने महाराष्ट्रात १ लाख पुतळे बसवण्याचा निश्चय केला. त्यासाठी धर्मप्रतिष्ठान नावाचे सोशल मीडिया पेज काढले.त्यावरून वातावरण निर्मिती करणे.त्यासाठी मनोज जरांगेचा उल्लेख करणे. मनोज जरांगे सोबतचे फोटो वापरणे.मनोज जरांगे आपला गुरु आहे असे सांगणे.यात किती तथ्य आहे हे बाळ्या आवारे आणि मनोज जरांगेलाच माहिती असेल.

पण बाळ्या आवारेने ज्या चिखला गावात त्याच्या सोबत काम करणाऱ्या संजीवनी वाघच्या गावातही पुतळा दिलेला दिसतोय.तिथे मध्यरात्रीच पुतळा बसवल्यानंतर तिने गावकऱ्यांसोबत राडा केला.त्या राड्यानंतर लगेच सोशल मीडियावर आपल्या समाजाच्या महिलेचे कपडे फाडले अशी आवई उठवण्यात आली.लगेच तिथे वंजारी समाजाला छत्रपती शिवरायांना विरोध करणारा समाज अशी इमेज बनवून टार्गेट करण्यात आले.एका महिलेचे कपडे फाडणारा समाज म्हणून दाखवण्यात आले.पण प्रत्यक्षात व्हिडिओत चित्र वेगळेच होते.स्वतः संजीवनी वाघ लोकांच्या अंगावर धावून जात होती आणि तिच्याच जवळच्या एका महिलेने तिला आवरताना तिचे कपडे निघाले. स्वतः मनोज जरांगे तिथं जाऊन तिच्या बाजूने प्रक्षोभक भाषण केले.वंजारी समाजाला व्हीलन घोषीत करण्यात आले.मग गावचा मॅटर अख्ख्या महाराष्ट्रात गेला आणि वंजारी समाजाच्या नेत्यांनीही तिथे जाऊन तशीच प्रक्षोभक भाषणे केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे मध्यरात्रीच का बसवले जातात?

सोलापूर पोलिसांनी बाळ्या आवारेला अटक केल्यानंतर एक बाब समोर आली ती म्हणजे त्या जिल्ह्यात बसवलेल्या ८ अनाधिकृत पुतळ्यांच्या गुन्ह्यांत ४ अनाधिकृत पुतळ्यांच्या गुन्ह्यांत बाळ्याचा समावेश आहे. बाळ्याचा स्वतःचा पुतळे बनवण्याचा कारखाना आहे.तीस हजारांत विकला जाणारा पुतळा बाळ्या लाखभर रुपयांपर्यंत विकायचा.त्यात स्वतःच्या जबाबदारीवर पुतळा बसवण्याचे ट्रान्सपोर्ट चार्जेस ३५ ते ५० हजारपर्यंत घ्यायचा.म्हणजे एका पुतळ्याचे बजेट साधारणतः ४० हजार असेल तर बाळ्या त्याचे दिड लाख घ्यायचा. आणि मध्यरात्रीच गावातील मोक्याची जागा बघून गावकऱ्यांच्या साथीने तिथे स्टँडसहित पुतळा आणून बसवायचा कारण त्यामुळे पोलीस प्रशासनाला चकवा देता येत असे अन् गावकरीही झोपेत असल्याने विरोधाचा प्रश्नच नाही.एकदा पुतळा ठेवला की मग पुढे दंगल, गुन्हे आणि धमक्या यांचे सत्र सुरू व्हायचे.त्यात बाळ्या बाहेर आपण फुकट पुतळे देतोय असा आव आणायचा.पुतळ्याच्या स्टँडच्या खाली बाळ्याचे फोटो सगळीकडे दिसत आहेत.यांनी चौफुला गावातील भगवानबाबा चौकातही मध्यरात्री आणून छत्रपतींचा पुतळा बसवला.

अंजनगावचा धडा

आता अंजनगावात धनगर समाजाच्या मंदिराच्या जागेतच पुतळा बसवल्याने तिथे बाळ्या उघडा पडला.त्यानंतर मनोज जरांगे इकोसिस्टमने हात वर केले. बाळ्याला शिवीगाळ सुरू केली. कालपर्यंतचा स्मारकयोद्धा आज गुन्हेगार झाला. मनोज जरांगेच्या पाळीव सोशल मीडियाने त्याला शिवद्रोही ठरवायला सुरुवात केली.त्याआधीच मनोज जरांगे आणि काळकुटेसोबत सावलीसारखा फिरणाऱ्या ज्ञानदेव काशीदने हर्षद बागल या पत्रकाराची पोस्ट कॉपी करून खेळोबा देवस्थानाची जागा ४५ गुंठे आहे आणि ताबा ६८ गुंठे क्षेत्रावर आहे अशी पोस्ट केली होती. म्हणजे देवस्थानावरच अतिक्रमण केल्याचे आरोप यांनी आधी केले होते.आणि आता डाव उघडा पडल्यावर दुधात पडलेल्या माशीसारखे यांनी बाळ्या आवरेला काढून फेकले आहे. चिखला गावची संजीवनी वाघ मात्र बाळ्याला जेलमधून बाहेर सोडा नाहीतर महाराष्ट्रात आंदोलन करू म्हणून अजूनही बाळ्याशी एकनिष्ठ आहे.

मुळातच आवारेसारख्या लोकांना गावातच असलेल्या एका गटाकडून मदत केली जाते.गावातल्या फुटीचा फायदा आवारेसारखे लोक घेतात.जेव्हा देवस्थानच्या जागेची मोजणी झाली तेव्हा जागा देवाची निघाली.मग यांनी राजन पाटील आणि इतर आपल्याच समाजाच्या नेत्यांना तोडगा निघाला म्हणत श्रेय द्यायला सुरुवात केली.मुळात तो तोडगा नव्हता ते एका देवस्थानाच्या जागेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वापर करून जागा बळकावण्याचे कुटील अतिक्रमण होते जे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान न होता काढण्यात आले.

भूमची घटना!

धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे एका मोक्याच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यावरून शासन दरबारी प्रस्ताव होता.दोन्ही बाजूंचे दावे प्रतिदावे होते.त्यामुळे तो विषय धूळखात पडलेला होता.अचानक रात्रीच तिथेही छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला.चिडलेल्या दलीत समाजातील लोकांनी भरदिवसा त्याच पुतळ्याच्या समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणून बसवला. पोलिसांना दंगल रोखण्यासाठी भर उन्हात मेहनत घ्यावी लागली.आणि याचे फलीत म्हणजे दोन्ही पुतळे झाकण्यात आले.

"अनाधिकृत पुतळे आणि गावगाड्यातील वर्चस्ववादाची लढाई"

पुतळ्यांच्या अनाधिकृत उभारणीत एक पॉवर पॉलिटिक्स आहे. हि गावातल्या राजकारणातील वर्चस्ववादाची लढाई होऊन जाते.अधिकृत सर्वसंमतीने पुतळा उभारला तर त्याला पॉलिटिकल मायलेज मिळत नाही.पण एखाद्या अतिक्रमित, खाजगी किंवा रहदारीच्या जागी गावकऱ्यांच्या विरोधात पुतळा उभारला तर एक गट आपल्या बाजूने राहतो हे पुतळा बसवणारा गावातला मास्टरमाईंड जाणून असतो.तो बाळ्यासारख्या लोकांची मदत घेतो.सोशल मीडियाचा वापर वातावरण निर्मितीसाठी केला जातो.त्यामुळेच बाळ्यासारखे लोक पोलीसांची वर्दी उतरवण्याची भाषा करतात. 

बाळ्या त्याच्या एका व्हिडिओत राज्यातील एका मोठ्या नेत्याचे नावही घेतो आणि आपल्याला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने धमक्या देतो.गावातील दुसरा समाज शिवद्रोही ठरवला जातो.वंजारी, दलीत, धनगर, माळी आणि मुस्लिम आजपर्यंत लक्ष्य करण्यात आले आहेत.यासाठी स्थानिक आमदार किंवा वजनदार नेत्याची मदत घेतली जाते.त्यानंतर तोच नेता मध्यस्थ म्हणून आतून बाळ्याच्या बाजूने मदतीला असतो.कारण त्याला समाजाच्या बाजूने दिसायचे असते.

याचा शेवट कधी?

बाळ्याच्या अटकेनंतर हे सत्र थांबेल अशी अपेक्षा आपण करू शकतो. पण एक इकोसिस्टम बनलेली आहे ती नवनवीन प्रॉडक्ट मार्केटला आणून छोटे छोटे कॉन्फ्लिक्ट चालूच ठेवणार.यात अनेक युवकांवर गुन्हे दाखल होणार, अनेक समाज लक्ष्य होणार आणि प्रत्येक समाजाला आमच्या तालावर नाचा नाहीतर तुम्हाला धडा शिकवू अशा धमक्या अव्याहत चालूच राहणार यात शंकाच नाही पण त्यामुळे लोकांनी अशा प्रवृत्तीविरोधात लढणे सोडून द्यायचे का? तर नाही. संविधानिक मार्गाने, कायद्याने आणि महापुरुषांचा आदर करत आपला लढा सुरूच ठेवायचा.तुम्हाला बाळ्यासारखे असंख्य लोक तुमची काहीही चूक नसताना संघर्षात ओढणार आहेत हे लक्षात ठेवूनच मार्गक्रमण करावे लागेल.

© रविकुमार सुभाषराव.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या