संत गर्जूनिया सांगे, जावे त्यांच्या मागे मागे !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/04/2026 : माणूस हा अनुकरणशील आहे, पण कोणाच्या मागे जावे आणि कोणाच्या मागे जाऊ नये हे कळलं पाहिजे. संतांच्या मागे मागे जावे, कारण ते आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे, आत्मज्ञानाकडे आणि निजसुखाकडे नेतात. "देव इच्छी रज चरणांची माती" या संत तुकारामांच्या वचनानुसार देव स्वतः संतांच्या चरणाची धूळ इच्छितो. म्हणून संतांच्या मागे गेल्यास देव सहज मिळतो.
संताचे संगती मनोमार्ग गती |
आकळावा श्रीपती येणे पंथी ||
संत ज्ञानेश्वरांची ही ओवी सांगते की, संतांच्या सहवासात मनाला योग्य दिशा मिळते आणि विठ्ठल, परमात्मा सहज प्राप्त होतो. उदाः- एका साधूला खूप तहान लागली म्हणून रस्त्यावरील कुंभाराच्या घरी गेले. कुंभाराने साधूला पाणी पाजले. साधू कुंभाराला म्हणाला, मडक्याच्या मोठ्या ढिगाऱ्याच्या बाजूला एकच मडके का ठेवले. कुंभार म्हणाला, ते मडके खालून फुटले आहे. साधू म्हणाला, मला फुटलेले मडके विकत दे. कुंभार म्हणाला, तुम्ही मडके घेऊन जा, पैसे नको. साधूने ते मडके शिवलिंगावर बांधले आणि त्यातून थेंब थेंब पाणी पडायला लागले. फुटलेले मडके साधूचे सहवासात येऊन त्याच्या जगण्याचा मार्ग बदलला. तसेच संतांच्या मागे गेले तर आपलं जीवन सुंदर घडणार. "याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे |" संत तुकाराम भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या साधकाला म्हणतात, देवाच्या भेटीची इच्छा असेल तर माझ्या मागे या. मी आज तुम्हाला भक्तीचा निखळ आनंद पोटभर देईल.
संत गर्जूनिया सांगे |
जावे त्यांच्या मागे मागे ||धृ||
संतांनी जे उपदेश किंवा शिकवण मोठ्या आवाजात (गर्जून) सांगितली आहे. संत हे भोंदू नसून आत्मज्ञानी असतात. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन त्यानुसार आचरण करावे. ते जगाला खरा रस्ता दाखवतात. संतांनी दाखविलेल्या सत्य, भक्ती आणि माणुसकीच्या मार्गांवर निष्ठापूर्वक चालणे म्हणजेच त्यांच्या मागे मागे जाणे होय. संतांनी सांगितलेल्या तत्वांचे श्रवण न करता प्रत्यक्ष जीवनात पालन करावे.
तेथे ठेवुनी विश्वास |
चित्ती करावा अभ्यास ||1||
संतांनी आत्मज्ञानाचा, सत्याचा मार्ग सांगितल्यावर त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करावे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत जगावे. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून अंत:करणात (चित्ती) त्या ज्ञानाचा अभ्यास करावा. याचाच अर्थ गुरु किंवा संतांच्या मार्गांवर श्रद्धेने चालून साधना करणे. ज्यातून आत्मज्ञान प्राप्त होते. संताच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा.
पाळू नये आळसासी |
मिती-निद्रा-भोजनासी ||2||
आळस हा माणसाचा शत्रू आहे. जीवनात आळस, अति झोप आणि अति खाणे कधीही ठेवू नये. अति झोपणे किंवा अति खाणे आरोग्यासाठी आणि यशासाठी हानिकारक आहे. कामात आळस किंवा टाळाटाळ करु नये. राष्ट्रसंत म्हणतात, जर तुम्ही तुमचे जीवन आळसमुक्त आणि शिस्तप्रिय (नियंत्रित) ठेवले तर स्वतः तुमच्या पाठीशी राहतो. म्हणजे तुमचे काम सोपे होते. कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची गरज असते. स्वामी विवेकानंद म्हणतात, एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईट प्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची, कानाकोपऱ्यातली वस्तू देखील स्पष्ट दिसते. संत तुकाराम म्हणतात, "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान" देवाने जसे ठेवले तसेच राहावे व त्यातच समाधान मानावे. आपल्या वाट्याला आलेले भोग आपल्याला भोगावे लागतातच.
तुकड्या म्हणे ऐसे करा |
देव होत असे सोयरा ||3||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, शिस्तबद्ध व्यक्ती ज्याच्याकडे कष्टाळू वृत्ती आहे. त्यांना ईश्वरी मदत मिळते, कामे यशस्वी होतात असे महाराजांचे मत आहे. देव हा भक्तांचा केवळ स्वामी नसून तो अत्यंत जवळचा नातेवाईक बनतो. जो शरण आला आहे त्याच्या दुःखात धावून येणारा, मदतीला उभा राहणारा आणि मनातील भाव (प्रेम) ओळखणारा देव म्हणजे दीनाचा सोयरा होय. देवाला भौतिक वस्तूपेक्षा भक्ताचे भाव, अंत:करणातील निर्मळ प्रेम आणि भाव हवा असतो, ते मिळताच तो भक्ताचा सोयरा होतो. देवाला बाहेर शोधण्यापेक्षा तो आपल्या अंतरात आहे आणि तो आपल्यावर आपल्या नातेवाईका प्रमाणे प्रेम करतो, ही भावना देव होतसे सोयरा या ओवीतून व्यक्त होते. संत तुकाराम म्हणतात, "तुका म्हणे आंधळे जन, गेले विसरून खऱ्या देवा" हे जन आंधळे आहेत. मीच जग निर्माण केलं आणि मलाच विसरले. मायेच्या पडद्या आड लपलेले हे जन, लोक कसा माझ्यावर अविश्वास करतात आणि फक्त पोट भरण्याच साधन मला करून ठेवलं आहे. संत जे सांगतात तसे आचरण करा.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन: 9970404180


0 टिप्पण्या