माळशिरस तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

 

माळशिरस तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/04/2026 :

इतिहासाची मोडतोड करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे, अपमानास्पद वक्तव्य करून अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा निषेध करीत त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माळशिरस तालुक्याचे तहसिलदार सुरेश विमल विठ्ठलराव शेजुळ यांना देण्यात आले. सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी तहसीलदार यांना निवेदन देताना माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत द्रोपदी लक्ष्मण नायकुडे,ॲड. भगवान दामोदर धाईंजे, सुभाष सत्यवान सरतापे, रमेश अंकुश नामदास, भरतराव रुपनवर इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. आपल्या आराध्य दैवतांचा अपमान कोणताही शिवप्रेमी सहन करू शकत नाही. धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करून आपले आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अत्यंत चुकीचे वक्तव्य करून श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री, रा. स्व. संघाचे नेते व सत्ताधारी पक्षाचे नेते हे सुद्धा उपस्थित होते. मात्र त्यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना विरोध न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली. 

श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल आणि हे अपमानास्पद कृत्य होत असताना त्यास विरोध न करता मूकपणे बसलेले रथी महारथी यांचा  श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या