रिकाम्या पोटी फळे खाणे पडू शकते महाग;

 

रिकाम्या पोटी फळे खाणे पडू शकते महाग;

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/04/2026 :

Fruit diet science | रिकाम्या पोटी फळे खाणे पडू शकते महाग; रक्तातील साखर वाढण्याचे हे आहे मुख्य कारण

आरोग्यदायी राहण्यासाठी फळे खाणे अत्यंत आवश्यक असले, तरी ती खाण्याची चुकीची वेळ आणि पद्धत शरीरातील इन्शुलिनची पातळी अचानक वाढवू शकते.

अनेकजण दिवसाची सुरुवात फळे खाऊन करतात; परंतु ही पद्धत इन्शुलिन स्पाईकला निमंत्रण देऊ शकते. फळांमध्ये नैसर्गिकरीत्या फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असते. जेव्हा आपण रिकाम्या पोटी फक्त फळ खातो, तेव्हा ही साखर अत्यंत वेगाने रक्तप्रवाहात मिसळते. यामुळे शरीरात रक्तातील साखर अचानक वाढते आणि ती नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंडाला मोठ्या प्रमाणात इन्शुलिन सोडावे लागते. परिणामी, थोड्याच वेळात रक्तातील साखर वेगाने खाली येते. यामुळे ३० ते ४५ मिनिटांत पुन्हा तीव्र भूक लागते, थकवा जाणवतो किंवा गोड खाण्याची इच्छा निर्माण होते.

फळे खाण्याची योग्य पद्धत

रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करणे फायदेशीर ठरते :

फळे कधीही एकटी खाण्याऐवजी ती प्रथिने किंवा निरोगी फॅटस्सोबत खावीत. उदाहरणार्थ, फळांसोबत मूठभर बदाम, अक्रोड, उकडलेले अंडे किंवा दही घेतल्यास त्यातील प्रथिने साखरेचे पचन संथ करतात. यामुळे साखर रक्तात हळूहळू मिसळते आणि इन्शुलिनची पातळी स्थिर राहते.

तुम्ही मुख्य जेवणानंतर (जसे की डाळ-भाजी, पोळी) फळ खाल्ले, तर पोटातील फायबर आणि प्रथिने एका संरक्षक थराप्रमाणे काम करतात. यामुळे फळातील साखरेचा रक्तावर होणारा परिणाम कमी होतो.

फळांचा रस पिणे हे सॉफ्ट ड्रिंक पिण्यासारखेच घातक ठरू शकते. कारण, या रसामध्ये फायबर नसते. त्याऐवजी संपूर्ण फळ चावून खाल्ल्याने त्यातील फायबर साखरेचे शोषण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

इतर महत्त्वाच्या बाबी :

फळांचा केवळ ग्लायसेमिक इंडेक्स न पाहता त्याचा ग्लायसेमिक लोड पाहणे अधिक महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, टरबूजाचा जीआय जास्त असला तरी त्यातील साखरेचे एकूण प्रमाण कमी असते. त्यामुळे ते मर्यादित खाणे सुरक्षित आहे.

फळे खाल्ल्यानंतर रक्तातील साखर स्नायूंद्वारे वापरली जाते. शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.

थोडक्यात, फळे आरोग्यासाठी उत्तम आहेत; पण ती चुकीच्या वेळी खाणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे नेहमी संतुलित आहाराचा भाग म्हणून किंवा प्रथिनांसोबत फळांचे सेवन करावे.

संकलन  : यशवंत वाघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या